चित्रपटातील वडील

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
22nd June 2019, 11:56 am
चित्रपटातील वडील


-
‘आई माझा गुरू, आई कल्पतरू...’ म्हणत आईवर बरेच काही लिहिले गेले. परंतु ‘वडील’ कळत - नकळत उपेक्षित राहिले. त्यांच्याविषयी असलेली आदरयुक्त भीती वा अन्य कुठल्याही कारणाने असावे, पण वडिलांपासून ‘चार हात लांब’ च धोरण मुलांनी अवलंबिले. असे असले तरी वडिलांचे प्रत्येक मुलाच्या जीवनातील महत्त्व काही कमी झाले नाही. आई इतकेच प्रेम त्यांच्यावरही असले, तरी ते सांगण्याचे धाडस कधी झाले नाही, किंबहुना ते सांगण्याची गरजच भासली नाही. त्यामुळे ‘शब्दांच्या पलीकडले’ एक नाते वडिलांशी निर्माण झाले.
पूर्वीच्या तुलनेत आज वडिलांची प्रतिमा बदलू लागली आहे. किंबहुना आईच्या तुलनेत आता वडिलांशी मुलांची ‘जवळीक’ वाढू लागली आहे. या बदलाची कारणे अनेक असतील, पण हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. मग अशा बदलांना घेऊन चित्रपट निर्मितीची कल्पना चित्रपटसृष्टीला सुचली नसती तरच नवल... त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ‘फादर्स डे’ च्या निमित्ताने रुपेरी पडदा गाजवलेल्या अशाच काही ‘मोजक्या’ वडिलांचा हा आढावा...
चित्रपटसृष्टीत ‘बाबुल की दुवाए लेती जा...’ म्हणून लेकीची सासरी पाठवणी करणारा बलराज सहानीचा पिता जितका गाजला, तितकाच ‘आईना मुझसे मेरी...’ म्हणत आपली व्यथा मांडणारा ‘डॅडी’ चित्रपटातील अनुपम खेरचा पिताही गाजला. कधी ओमप्रकाश भाव खाऊन गेला तर कधी कादरखान गाजला. एकूणच काय रुपेरी पडद्यावर अनेक पिता गाजले. पण, उल्लेखनीय म्हणावे अशा वडिलांच्या भूमिकांची सुरुवात ही ‘सारांश’ चित्रपटाशिवाय होऊच शकत नाही. १९८४ मधील ‘सारांश’ ने विदेशात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या अस्थी मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पित्याचा प्रवास रेखाटला. अनुपम खेर यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड म्हणावा, असा हा चित्रपट. यात व्यक्त न होता मुलाचे अखेरचे दर्शन तर सोडाच, त्याच्या अस्थी मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाने अतोनात व्यथित झालेला पिता अनुपम खेरनी इतका सुरेख उभा केला की, युवावस्थेत क्वचितच कुणी अशा ज्येष्ठ भूमिकेचे ओझे यशस्वीपणे पेलले असेल.
अनुपमच्या या वृद्ध पित्यानंतर उल्लेखनीय पित्याची भूमिका साकारली ती अभिषेक बच्चनने. अभिषेकची चित्रपट कारकिर्द पाहता, त्याच्या नावे एखादी सक्षम भूमिका असेल असे क्वचितच कुणाला वाटेल... परंतु ‘गुरू, युवा’ चित्रपटात चांगले काम केलेल्या अभिषेकने ‘पा’ चित्रपटात कमालच केली. आपल्या नजरेसमोर वयोवृद्ध होत मृत्यूच्या दिशेने वाटचाल करणारा पुत्र पाहताना एका युवा पित्याला होणाऱ्या वेदना त्याने इतक्या उत्कृष्टपणे मांडल्या की, अभिषेकला अभिनयाची ‘अ, आ, इ, ई’ येत नाही असे म्हणणाऱ्यांना ती एक चपराक होती.
रुपेरी पडद्यावरील उत्कृष्ट बापांची यादी इथेच थांबत नसून, या यादीत पुढे नाव सहभागी होते ते म्हणजे कमल हसनचे... ‘चाची ४२०’ मध्ये विभक्त झालेल्या पत्नीसोबत राहणाऱ्या मुलीच्या प्रेमाखातर ‘आया’ बनून आलेला कमल काही औरच... हा चित्रपट प्रथमदर्शनी विनोदी असला, तरी मुलीच्या प्रेमाखातर एक पिता कुठले दिव्य करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण ठरेल. वेळेसोबत जुळवून घेणाऱ्या अजयनेही अनेक चित्रपटांमध्ये पित्याची भूमिका साकारली आहे. ‘में ऐसा ही हूँ’ तील त्याच्या पित्याला तोड नाही. यात अजयने मानसिक रुग्णाची भूमिका पार पाडली होती. रुग्ण असूनही आपल्या मुलीला मिळवण्याची त्याची धडपड थेट प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालते.
पूर्वीच्या काळातील चित्रपटातील पिता-पुत्र वा कन्या यांचे संबंध बहुतेक संघर्षमयच असायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘शराबी’ चे देता येईल... प्राण व अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात पिता-पुत्र संघर्ष प्रकर्षाने जाणवतो. तर नायिकेच्या बाबतीत पित्याचा कठोर स्वभाव प्रामुख्याने दाखवला जात असे. तिच्यासाठी योग्य-अयोग्य आपल्याशिवाय अन्य कुणीच निवडू शकत नाही, असा गोड गैरसमज केलेले पिता अनेकदा पहावयास मिळाले. खास करुन ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील अमरिश पुरी. हळूहळू पित्याची ही प्रतिमा बदलू लागली. ‘दिल धडकने दो’ तील अनिल कपूर, ‘पटियाला हाऊस’ मधील ऋषी कपूर, ‘वेक अप सिद’ मधील अनुपम खेर , ‘वक्त : रेस अगेन्स्ट टाईम’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बागबान’ मधील अमिताभ हे रुपेरी पडद्यावरील ‘वडील’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले ते त्यांच्या वेगळेपणामुळे...
रुपेरी पडद्यावर आजतागायत अनेक ‘पिता’ झाले... सगळ्यांचा आढावा इथे घेणे शक्य नसले, तरी एक मात्र नक्की ज्यांनी-ज्यांनी रुपेरी पडद्यावर पिता साकारला, त्या प्रत्येक कलाकाराने त्या भूमिकेला न्याय दिला. कारण शब्दात विशेष मांडले गेले नसले तरी, ‘माँ सबकुछ सही, पर पिताभी कुछ कम नही...’

(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)