बिहारमध्ये कोवळी पानगळ

कव्हर स्टोरी

Story: शिवचरण यादव |
22nd June 2019, 11:54 am
बिहारमध्ये कोवळी पानगळ


-
देशात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. दर वर्षी आठ लाखांहून अधिक बालकांचा या ना त्या कारणानं बळी जाणं, भारताच्या दृष्टीनं नक्कीच चांगलं नाही. एकीकडे आपण जगातली पाचवी आर्थिक महासत्ता होण्याची गोष्ट करतो, दुसरीकडे आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे वेध लागले आहेत. असं असताना देशाचं भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या मुलांच्या आरोग्याची मात्र हेळसांड होत आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात बालमृत्यूचं प्रमाण चांगलंच चर्चेत आलं होतं. रुग्णालयाला प्राणवायूचे सिलिंडर पुरवणाऱ्या ठेकेदाराचे पैसे दिले गेले नव्हते. संबंधित ठेकेदारानं वारंवार मागणी करूनही पैसे दिले न गेल्यानं त्यानं प्राणवायूचे सिलेंडर पुरवले नाहीत. त्यामुळे प्राणवायू पुरवता न येऊन तीसहून अधिक बालकांचे बळी गेले. उत्तर प्रदेशमध्ये बालकांचे बळी जात असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये जाऊन तिथल्या आरोग्य व्यवस्थेवर टीका करत होते. जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणं, उपचाराची सरकारी रुग्णालयात चांगली व्यवस्था करणं, हे आरोग्यमंत्र्यांचं कर्तव्य असतं. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी असताना आरोग्यमंत्रीच बालकांचं जगणं नशिबाच्या हवाली करत असतील तर त्याला काय म्हणावं?
बिहार पुन्हा बिमारू
बिहारला आतापर्यंत ‘बिमारू’ राज्य म्हटलं जायचं. गेल्या दशकात नितीशकुमार यांनी या राज्याची प्रतिमा बदलली; परंतु सध्याची परिस्थिती पाहता बिहार पुन्हा ‘बिमारू’ राज्य बनलं आहे अशी शंका येण्याजोगी स्थिती आहे. बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये अॅक्युट इन्सेफेलाईटीस सिंड्रोम (आयईएस) या आजारानं अलिकडेच शंभरहून अधिक मुलांचा मृत्यू झाला. मागील आठवड्याभरात या आजारानं इथे थैमान घातलं आहे. मुजफ्फरपूरमध्ये या मेंदूज्वरामुळे आजारी असलेल्या शेकडो मुलांवर उपचार सुरू आहेत. सातत्यानं मृत्यूच्या बातम्या येतच आहेत. बिहारमध्ये अॅक्युट इन्सेफेलाईयटीस सिंड्रोम आणि जपानी इंन्सेफोलायटीस हे आजार ‘चमकी बुखार’ या नावानं ओळखले जातात.
प्रशासनाचे दुर्लक्ष
या आजारात मुलांना सडकून ताप येतो. बिहारमध्ये असंच घडलं आहे. तिथल्या मुलांवर सध्या अनेक रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुलं या इन्सेफेलाईटीस तापानं दगावतात. गेल्या वर्षीही या आजारानं २२ मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होतो. तरीही त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजले जात नाहीत, असेही लोकांचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतीच मुझफ्फरपूरला भेट देऊन यापुढे चमकी तापामुळे बालकांचे मृत्यू होणार नाहीत, अशी ग्वाही दिली. मुजफ्फरपूरमधल्या श्रीकृष्ण रुग्णालयातही ते गेले. यावेळी त्यांनी या समस्येवर लवकरात लवकर कायमचा उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व आर्थिक व तांत्रिक मदत राज्य सरकारला करेल, असं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री रुग्णालयात असतानाच त्या ठिकाणी दोन मुलांचा मृत्यू झाला.
खरं कारण गुलदस्त्यात
डॉक्टरांसह शासकीय अधिकारी इन्सेफेलाईटीस हे या मृत्यूमागील कारण असल्याचं स्वीकारायला टाळाटाळ करत आहेत. या तापामुळे पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार दरवर्षी चर्चेत असत; मात्र याचं खरं कारण अद्याप कळलेलं नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कुपोषण, कचरा, जास्त आर्द्रतेचा उन्हाळा आणि क्षीण पचनशक्ती असणाऱ्यांना याची लवकर लागण होते. उत्तर प्रदेश आणि बिहारपुरताच मर्यादित न राहिलेल्या इन्सेफेलाईटीसचा जवळपास १९ राज्यांमध्ये प्रसार झाला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये याचा जास्त परिणाम जाणवतो. मुख्यत्वे लहान मुलंच याला बळी पडत आहेत. मान्सून आणि मान्सूननंतरच्या काळात या आजाराचा जास्त फैलाव होताना दिसत आहे. या आजारानं गेल्या तीस वर्षांमध्ये जवळपास ५० हजार मुलं दगावली आहेत.
१९७८ मध्ये पहिला रुग्ण
१९७८ मध्ये पहिल्यांदा या तापाचा रुग्ण आढळल्याची नोंद आहे; मात्र सरकारला याचं गांभीर्य २००५ मध्ये झालेल्या १४०० मृत्यूनंतर कळलं. त्यानंतर २००६ मध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आसाममधल्या या तापानं सर्वाधिक ग्रस्त असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये इन्सेफेलायटीस लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली. लिची हे फळ खाल्ल्यानं बिहारमध्ये शंभर लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १७९ या तापाचे संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्यानं मुलं या रोगाला बळी पडल्याचं सांगितलं जातं.
अॅक्युट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम म्हणजे शरीरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्यानं त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जोरदार ताप येतो. यानंतर शरीर दुखणं, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, बेशुद्ध होणं, आकड्या येणं, भीती, कोमामध्ये जाणं अशी लक्षणं दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबरदरम्यान बळावतो. हा आजार पाच ते दहा वर्षं वयोगटातल्या मुलांना होतो. ताप येणं, डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
नशीब, हवामानाला दोष
राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी यासाठी नशिबाला जबाबदार धरलं आहे. त्यांच्या मते, यासाठी सरकार किंवा प्रशासन जबाबदार नाही, तर संबंधित मुलांचं नशीब तसं होतं. सोबतच, हवामानालाही त्यांनी दोष दिला. या व्यतिरिक्त मुझफ्फरपूरच्या खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा उपचार सुरू आहेत. राज्यातल्या आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. त्यामध्ये पीडित रुग्णांना तातडीनं रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास आणि रुग्णालयांमध्ये अतिरिक्त बेडसह विशेष विभाग स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये या रोगानं डोकं वर काढलं आहे. त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. सोबतच, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संसर्ग पसरलेल्या जिल्ह्यांमध्ये दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अद्यापपर्यंत पीडित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची भेट न घेतल्यानं नाराजी व्यक्त होत आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शक्य तितक्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या आजारामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये दिले जाणार असल्याचंही सांगितलं आहे.
या व्याधीसंदर्भात अधिकाऱ्यांचं मत आहे की, बहुतांश मुलं ही हाइपोग्लाइसेमियानं त्रस्त होती. मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांचं वय हे दहा वर्षांच्या आतलं होतं. १ जूननंतर असा त्रास जडलेल्या एसकेएमसीएच रुग्णालयात १९७ मुलांना तर केजरीवाल रुग्णालयात ९१ मुलांना दाखल करण्यात आलं आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यावर लवकरात लवकर नियंत्रण न ठेवल्यास येणाऱ्या काळात चमकी ताप देशभरात फैलावण्याची भीती नाकारता येत नाही.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
-------------------------------------------------------
तापाचे परिणाम भीषण
-
रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं (हायपोग्लाइसेमिया) हे मृत्यू झाले आहेत. आजारी मुलांमध्ये रक्तातलं साखरेचं प्रमाण घटलेलं किंवा सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता दिसून आल्याचं मुजफ्फरपूरचे सिव्हिल सर्जन डॉ. शैलेश सिंह यांनी सांगितलं. बहुतांश प्रकरणात दिवसभर उन्हात राहून रात्री व्यवस्थित न जेवल्यानं किंवा उपाशी राहिल्यानं मुलं या तापाच्या तावडीत सापडत आहेत. या आजारातून रुग्ण वाचला, तरी तो कोमा किंवा पॅरालिसीसचा बळी ठरतो, हा या तापाचा सर्वाधिक भीषण परिणाम. वाचलेला रुग्ण शांतपणे जीवन जगू शकत नाही.