मान्सूनचे आगमन पुन्हा लांबणीवर

१७ जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याचा अंदाज; ‘वायू’चा धोका टळला


13th June 2019, 02:25 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अरबी समुद्रात तयार झालेले ‘वायू’ चक्रीवादळ पुढे सरकल्याने या वादळाचे गोव्यावरील संकट टळले आहे; पण या वादळामुळे मान्सूनचे आगमन आणखी दोन दिवसांनी रखडले आहे. गोव्यात १७ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी बुधवारी व्यक्त केला आहे. यापूर्वी १५ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, राज्यात बुधवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
वायू चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास गोव्यातील समुद्रात दाखल झाले. त्यानंतर ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकले. आता हे वादळ गुजरातच्या दिशेने आगेकूच करीत आहे. त्यामुळे वादळाचा गोव्यावरील धोका टळला आहे. मान्सून १५ जूनपर्यंत गोव्यात दाखल होईल, असा अंदाज यापूर्वी राज्य हवामान खात्याने व्यक्त केला होता; पण वायू चक्रीवादळामुळे वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम होऊन मान्सून दोन दिवस म्हणजेच १७ जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असे पडगलवार म्हणाले. वादळामुळे समुद्रात ताशी १४५ ते १५५ किमी वेगाने वारे वाहतात. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांसाठी दिलेला सावधानतेचा इशारा पुढील ४८ तास कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वायू चक्रीवादळ गोव्यापासून पुढे सरकले असले, तरी बुधवारीही राज्यभरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन काही ठिकाणच्या शेती, बागायतींचेही नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.