दोनहून जास्त विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय

शालांत मंडळासमोर प्रस्ताव, २१ रोजी निर्णय शक्य


13th June 2019, 02:24 am

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : दरवर्षी नववी आणि अकरावीत सरासरी १२ ते १३ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यात दोनपेक्षा जास्त विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असून, त्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील प्रस्तावावर गोवा शालांत मंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या फक्त दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुरवणी परीक्षा देता येते.
गोवा शालांत मंडळाच्या कार्यकारी मंडळाची २१ जूनला बैठक होणार आहे, त्यात दोनपेक्षा जास्त किंवा सर्व विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यालाही पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. अनेक पालकांनी शालांत मंडळाकडे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्या मागणीनुसार एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, तो कार्यकारी मंडळासमोर ठेवला जाईल, अशी माहिती मंडळाचे सचिव भागिरथ शेट्ये यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
नववीत सुमारे ९ ते १० हजार विद्यार्थी दरवर्षी अनुत्तीर्ण होतात. अकरावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली, तरी दोनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. दोन्ही इयत्तेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ही संख्या कमी होऊ शकते. दोनपेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचा प्रस्ताव मंजूर झाला, तरीही हजारो विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची पुन्हा संधी मिळू शकते. २१ जून रोजी होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा अजेंडा निश्चित झाला असून, त्यात हा विषय समाविष्ट केला आहे. येत्या एक-दोन दिवसांत सर्व सदस्यांना त्याची प्रत जाईल. या प्रस्तावाबाबत अनेक सदस्य सकारात्मक असल्यामुळे २१ जूनच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.