बाबूश यांच्याकडून आरोप निश्चितीला आव्हान

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण; गोवा खंडपीठात याचिका दाखल


13th June 2019, 02:24 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आरोप निश्चितीच्या आदेशाला पणजीचे आमदार अातानासियो (बाबूश) माॅन्सेरात यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. त्या संदर्भातील याचिका खंडपीठात दाखल केली आहे.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी सत्र न्यायालयाने ३ जून रोजी बाबूश माॅन्सेरात यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. तसेच या गुन्ह्यात साथ दिल्याबद्दल दुसरी संशयित रोझी फेरोझ हिच्या विरोधातही आरोप निश्चितीचा आदेश दिला होता. या प्रकरणी बुधवारी आरोप निश्चितीच्या आदेशावर शिक्कामोर्तब होणार होते; मात्र तत्पूर्वी बाबूश माॅन्सेरात यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून गोवा खंडपीठात आरोप निश्चितीच्या आदेशाला आव्हान देणार असल्याची माहिती दिली. हा अर्ज मान्य करून न्यायालयाने पुढील सुनावणी २६ जुलै रोजी ठेवली आहे.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने संशयित बाबूश माॅन्सेरात यांनी गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप २०१६ मध्ये केला होता. त्याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी माॅन्सेरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सत्र न्यायालयात २५० पानी आरोपपत्र दाखल केले होते. तसेच त्यात सुमारे ४० साक्षीदारांची साक्ष नोंदही केली होती. दरम्यान, या प्रकरणी बाबूश माॅन्सेरात यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.