राज्यातील सर्वच धर्मियांना आरक्षणाचा लाभ : सावईकर


13th June 2019, 05:27 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाचा गोव्यातील सर्वधर्मियांना मोठा फायदा होईल, असा विश्वास भाजपचे सरचिटणीस तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी बुधवारी व्यक्त केला.            

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपल्या मागील कार्यकाळात खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना सरकारी नोकऱ्या, सेवा आणि शिक्षणातील प्रवेशात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावास संसदेच्या दोन्ही सभागृहांतही मंजुरी मिळाली. त्यानंतर देशातील विविध राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. आता गोवा सरकारनेही या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आनंद आणि समाधान पसरले आहे, असे सावईकर म्हणाले.             

राज्यातील विविध धर्मियांना सद्यस्थितीत अशा आरक्षणाची नितांत गरज होती. हे ओळखूनच मुख्यमंत्री सावंत यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे प्रदेश भाजप स्वागत करीत असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारने आता ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ असा नारा दिला असून, त्यानुसारच सरकार काम करीत आहे. देशात राहणाऱ्या सर्वांचाच विकास साधण्याचा ध्यास मोदी सरकारने घेतला आहे. त्यातूनच सरकारने हे आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.