मुसळधार पावसाचा कुंकळ्ळीला तडाखा

परिसरातील वीज पुरवठा खंडित; अनेक ठिकाणी वाहतुकीचाही खोळंबा

13th June 2019, 05:26 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता

कुंकळ्ळी : सोसाट्याचा वारा आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी मंगळवारी रात्रीपासूनच कुंकळ्ळी परिसराला झोडपून काढले. या वादळी पावसामुळे कुंकळ्ळी परिसर, बाळ्ळी, फातर्पा, श्री बाळ्ळीकरीण मंदिर परिसर, आकामळ आंबावली या भागांत लहानमोठे वृक्ष उन्मळून पडले. या पडझडीमुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. तर काही भागात वाहतुकीची कोंडी झाली.

प्राप्त माहितीनुसार, बाळ्ळी येथील चार रस्ता भागात निलगिरीची प्रचंड मोठी फांदी तुटून वीजतारांवर कोसळली. बाळ्ळी-फातर्पा मार्गावर काजूवाडा येथे महाकाय आम्रवृक्ष कोसळून वीज तारांचे नुकसान झाले. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. भिवसा येथे भेंडीचा वृक्ष रस्त्यावर  कोसळून वाहतूक बंद झाली. अग्निशामक दलाची वाट न पाहता  गावकऱ्यांनी स्वतःच हा वृक्ष हटवून रस्ता मोकळा केला. याशिवाय आकामळ, आंबावली येथेही रस्त्यांत अनेक लहानसहान झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. मात्र, विशेष हानी झाली नाही.

धोकादायक वृक्ष  कापण्याची मागणी

‘महामार्ग क्र. ६६’ तसेच जिल्हा मार्गावर अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष धोकादायक स्थितीत उभे आहेत. कुंकळ्ळी पोलिस स्थानकासमोर दोन वटवृक्ष असेच धोकादायक स्थितीत आहेत. कुंकळ्ळी-केपे जिल्हा मार्गावरही अनेक ठिकाणी पावसाळी झुडूपे रस्ता व्यापून आहेत. ‘महामार्ग क्र. ६६’वर देमानी, नवा बांद, बाळ्ळी हॉस्पिटल परिसरातील रस्त्याच्या कडेला अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत उभे आहेत. हे वृक्ष त्वरित तोडावेत, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हाला नाही का ?

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कँटीन कंत्राटदार रंजन मयेकर यांचा सवाल Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more