दोन दिवसांत जोरदार वर्षा व

‘वायू’ची कूच गुजरातच्या दिशेने; गोव्यावरील धोका टळला


12th June 2019, 06:14 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने मंगळवारी गुजरातच्या दिशेने कूच केल्याने गोवा किनारपट्टीवरील धोका टळला आहे. हे चक्रीवादळ १३ जून रोजी ताशी ११० ते १३५ किमी वेगाने गुजरात किनारपट्टीवर पोरबंदर आणि महुवा दरम्यान धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवल्याची माहिती गोवा हवामान खात्याचे संचालक डॉ. के. व्ही. पडगलवार यांनी दिली. गोव्यात वादळाचा धोका टळला असला तरी राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे आगमन होईल, असे डॉ. पडगलवार यांनी सांगितले.  मंगळवारी दक्षिण गोव्यात अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष करून सांगे, काणकोण भागांत मोठा पाऊस पडल्याचे ते म्हणाले. ‘वायू’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल आणि त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न उतरण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.             

‘वायू’ चक्रीवादळाच्या अनुषंगाने राज्य प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. गोव्यापासून हे चक्रीवादळ २०० किलोमीटर दूर असून ते उत्तर भारताच्या दिशेने सरकत आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यात जोरदार पावसाने धडक दिली. अनेक भागांत सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे पडझड झाली. या वाऱ्याचा थेट संबंध चक्रीवादळाशी नसून तो नियमित वारा असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.