बाबूश यांच्याविरोधात आज आरोप निश्चिती

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण


12th June 2019, 02:11 am


प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी पणजीचे आमदार अातानासियो (बाबूश) माॅन्सेरात यांच्या विरोधात बुधवार दि. १२ जून रोजी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त माॅन्सेरात यांना या गुन्ह्यात साथ दिल्याबद्दल दुसरी संशयित रोझी फेरोझ हिच्या विरोधातही आरोप निश्चित करण्यात येणार आहे.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने संशयित बाबूश माॅन्सेरात यांनी गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप २०१६ मध्ये केला होता. त्याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी माॅन्सेरात यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३४२, ५०६ कलमाखाली तसेच बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पोक्सो)चे कलम ४ नुसार आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ बी नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात २५० पानी आरोपपत्र दाखल केले. तसेच त्यात सुमारे ४० साक्षीदारांची साक्ष नोंदही केली आहे. या प्रकरणी बाबूश माॅन्सेरात यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.
या प्रकरणी ३ जून रोजी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने बाबूश माॅन्सेरात आणि रोझी फेरोझ हिच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार बुधवारी न्यायालयात आरोप निश्चित करण्यात येणार आहे.