पर्रातील वीजवाहिनीप्रश्नी अंतरिम स्थगितीस नकार

गोवा खंडपीठाचा निर्णय; याचिकेच्या निकालावर ठरणार भवितव्य; १४ जूनला पुढील सुनावणी


12th June 2019, 02:11 am


प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : थिवी, म्हापसा ते नागोवा दरम्यान नागोवा वीज उपकेंद्राची क्षमता वाढवून कळंगुटमधील वीज समस्या दूर करण्यासाठी शेतातून नेण्यात येणाऱ्या अतिरिक्त ३३ केव्ही वीजवाहिनीला (ओव्हर हेड) पर्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी वीजवाहिन्या घालण्यासाठी दिलेल्या परवानगीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणी अंतरिम स्थगिती देण्यास खंडपीठाने नकार देऊन या याचिकेच्या निकालावर संबंधित प्रकरणाचे भवितव्य ठरणार असल्याचा निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार दि. १४ जून रोजी होणार आहे.
या प्रकरणी सुझी लोबो, कास्मिरो डिकुन्हा, जेनिव्हिव फर्नांडिस आणि लिंकन ब्रागांझा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, वीज खाते आणि राज्य सरकारला प्रतिवादी केले आहे. कळंगुटमधील वीज समस्या सोडविण्यासाठी वीज खात्याने नागोवा वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी पर्रा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत खांब टाकून अतिरिक्त वीजवाहिनी नेण्यात येत आहे. या अतिरिक्त ३३ केव्ही वीजवाहिनीला (ओव्हर हेड) पर्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. असे असताना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी ४ जून रोजी आदेश जारी करून संबंधित वीजवाहिन्या टाकण्याची परवानगी वीज खात्याला दिली. या आदेशानुसार वीज खात्याने वीजवाहिन्या टाकण्याचे काम ७ जूनपासून सुरू केले आहे. या वीजवाहिनी टाकण्याच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध करून गोवा खंडपीठात धाव घेतली. तसेच या कामाला अंतरिम स्थगिती देऊन इतर मार्गाचा वापर करून वीजवाहिनी टाकण्याची मागणी खंडपीठाकडे केली होती. या याचिकेच्या मागणीनुसार खंडपीठाने अंंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे; परंतु या याचिकेच्या निकालावर वीज वाहिन्यांच्या कामाचे भवितव्य ठरविणार असल्याचा निर्देश खंडपीठाने दिले आहे.  

हेही वाचा