कॅसिनो बंद करू, असे कधीच म्हटलेले नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वक्तव्य; कुठलीही गोष्ट सहज बंद करणे अशक्य

12th June 2019, 03:10 Hrs

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : कॅसिनो बंद करणार असे सरकारने कधी म्हटलेलेच नाही. काही पर्यटक हे कॅसिनोसाठीच येतात. सरकार चालवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ज्या काही गोष्टी सुरू आहेत, त्या बंद करू शकत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी म्हटले.
गोव्याचा पर्यटन प्रसार करण्यासाठी तयार केलेला व्हिडिओ मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी मंगळवारी पाहिला. या व्हिडिओत कॅसिनोही दाखविण्यात आला आहे. गोव्याचा पर्यटनासाठी प्रसार करायचा असल्यास पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी व्हिडिओत येणे आवश्यक आहे, त्यात गैर काही नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चांगल्या पर्यटनात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. काही पर्यटक हे कॅसिनोसाठीही येतात. पर्यटन स्थळ म्हणून पर्यटनासाठी चांगल्या गोष्टींचा प्रसार केला जाईल, पर्यटकांना काय आवडते ते पाहूनच काम केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही कधीच कॅसिनो काढून टाकू असे म्हटलेले नाही. कुठलीच गोष्ट सहज काढून टाकता येत नाही. सरकार चालविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चालत आलेल्या कुठल्याच गोष्टी सहज काढून टाकू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मांडवीत सध्या सहा तरंगते कॅसिनो आहेत, तर राज्यातील तारांकित हॉटेल्समध्ये सुमारे दहा कॅसिनो आहेत. मांडवीतील कॅसिनो हटविण्याची मागणी होत आहे. तसेच लोकांकडून ज्या मागण्या आल्या आहेत, त्या मुख्यमत्र्यांना सादर केल्या, असे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. मांडवीतील कॅसिनो हटविण्यासाठी सध्या पर्यायी जागाही निश्चित झालेली नाही.  

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हाला नाही का ?

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कँटीन कंत्राटदार रंजन मयेकर यांचा सवाल Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more