पदाला न्याय देणार : दयानंद सोपटे

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा घेतला ताबा


12th June 2019, 02:09 am
पदाला न्याय देणार : दयानंद सोपटे

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मंगळवारी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोपटे यांना शुभेच्छा दिल्या. भाजपकडून प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घेतला जातो. आपल्याकडे जी जबाबदारी देण्यात आली आहे, त्याला न्याय देणार असल्याचे सांगतानाच आपण या पदाबाबत समाधानी आहे, असे दयानंद सोपटे म्हणाले.
काँग्रेस पक्षातून आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले आणि पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले दयानंद सोपटे यांची पुन्हा एकदा गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोपटे यांना मंत्रिपद मिळणार अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती; परंतु सद्य:स्थितीत मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे पाऊल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उचललेले नाही. मंगळवारी सोपटे यांनी या पदाचा ताबा घेतला. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खास उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रकल्पांचा फेरआढावा घेऊन हे प्रकल्प पुढे नेण्याचे काम अध्यक्ष करतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. पर्यावरणाच्या नावाखाली प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची पद्धत सुरू झाली आहे. पर्यावरण रक्षणाची सर्वांत अधिक काळजी सरकारला आहे आणि सरकार याबाबत कटिबद्ध आहे, असेही डॉ.सावंत म्हणाले. पर्यावरण रक्षणाची बाब लक्षात घेऊनच सरकार प्रकल्पांची आखणी करते. रोजगार निर्मिती डोळ्यांसमोर ठेवून सरकार अशा प्रकल्पांना मान्यता देत असते. या प्रकल्पांना विरोध झाल्यास या रोजगाराच्या संधी गमावण्याची वेळ येत असल्याचे ते म्हणाले.

कॅसिनो पर्यटनाचा भाग
पर्यटन खात्याकडून करण्यात येणाऱ्या अधिकृत जाहिरातीत कॅसिनोंचा समावेश कसा काय, असा सवाल केला असता कॅसिनो उद्योग हा राज्याच्या पर्यटनाचा एक भाग असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. कॅसिनोमुळे अनेक पर्यटक गोव्यात येतात. कॅसिनोंकडून अधिकृत परवाना घेऊन हा उद्योग सुरू केला जातो आणि त्यामुळे त्यांना अनधिकृत संबोधणे उचित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.