फ्रान्सिस सिल्वेरांना भाजप प्रवेश नको

सांत आंद्रेतील भाजप कार्यकर्त्यांचा विरोध; प्रदेशाध्यक्षांना निवेदन


12th June 2019, 02:08 am
फ्रान्सिस सिल्वेरांना भाजप प्रवेश नको

पणजी : सांत आंद्रे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास विरोध दर्शविला आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली, त्यावेळी कोणत्याही आमदारास भाजपमध्ये घेण्यास पक्ष उत्सुक नसून, संबंधित असंतुष्ट आमदारच तशा बातम्या पसरवत असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले, असे सांत आंद्रे भाजप मंडळ प्रमुख रवींद्र बोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रवींद्र बोरकर तसेच २०१७ च्या निवडणुकीतील भाजप उमेदवार रामराव वाघ व अन्य सदस्यांनी तेंडुलकर यांची भेट घेऊन सिल्वेरा यांच्या प्रवेशाच्या वृत्ताबद्दल चर्चा केली. काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक असले, तरी घटक पक्षांनी कठीण प्रसंगावेळी केलेले सहकार्य लक्षात घेऊन आणखी आमदारांना प्रवेश न देण्याचे धोरण अवंलबिले आहे, असे तेंडुलकर यांनी त्यांना सांगितले.
आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे फ्रान्सिस सिल्वेरा स्थानिक लोकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना सांगत असून, पाठिंब्याची अपेक्षा करीत असल्याचे भाजप मंडळ पदाधिकाऱ्यांनी तेंडुलकर यांना सांगितले. सिल्वेरांच्या या कृतीमुळे गोंधळाचे वातावरण पसरले असून, लोक स्थानिक नेत्यांना याबद्दल स्पष्टीकरण विचारत आहेत. रामराव वाघ यांनी सध्या विधायक कामे हाती घेतल्याने त्यांना अधिक पाठिंबा लाभत आहे, असे कार्यकर्त्यांनी तेंडुलकर यांना सांगितल्याचे पत्रकात म्हटले आहे. वाघ यांच्या धास्तीने सिल्वेरा यांची झोप उडाली असून, ते स्वत: भाजपमध्ये प्रवेश करण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसते, त्यांना भाजपने प्रवेश देऊ नये, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. 

हेही वाचा