सलाम

भन्नाट

Story: डाॅ. प्राजक्ता कोळपकर |
08th June 2019, 11:29 am
सलाम

आयुष्य हाच मुळी एक रंगमंच आहे आणि आपण सगळेच कलाकार. कुणाच्या वाट्याला मोठ्या तर कुणाच्या छोट्या भूमिका येतात. कुणी भूमिकेत समरस होतात, तर कुणी नाही. पण, भूमिका साऱ्यांनाच बजावायच्या असतात. माझ्या आयुष्यात एका बाईला मी अनेक भूमिका बजावताना पाहिलेय. लहानपणी चंद्रपूरला आमच्या घरासमोर एक घर होते, ते त्याच बाईचे. तिचे नाव न्याकोशी ढोलकिया. आम्हाला नाव माहिती असण्याचे काहीच कारण नव्हते, कारण त्याकाळी आडनाव हीच ओळख होती. पण, या काकूंचे आडनाव बाकी चेष्टेचा विषय होता कायम. आम्ही सगळीच त्यांना ढोलक काकूच म्हणायचो. अगदी त्यांच्या तोंडासमोरही. त्यांनाही इतकी सवय झाली होती की कुणी त्यांना ढोलकिया म्हटले तर त्या चेष्टेत म्हणायच्या, ‘ढोलकिया ऑफिसला गेले, हा पण ढोलक पाहिजे असेल तर समोर उभा आहे’. हा डायलॉग आम्हा सगळ्यांनाच पाठ झाला होता.
त्यांना ढोलक का म्हणतात, हे मला मोठेपणी कळल्यावर जरा वाईटच वाटले. त्या फार जाड होत्या, जरा जास्तच सावळ्या होत्या. दंडावर मोठा काळा चट्टा होता. आतापर्यंत मला वाटत होते त्यांच्या आडनावावरून त्यांचे हे अपभ्रंशात्मक नाव पडले, पण तसे नव्हते. हे कळले हा सुद्धा किस्सा आहे. माझे लग्न झाल्यावर मी पहिल्यांदाच माहेरी गेले होते, तर आवर्जून त्या ढोलक काकूंनी मला घरी जेवणाला बोलावले. माझ्या संसाराच्या ख्याली- खुशालीच्या गप्पा झाल्यावर मी म्हणाले, ‘लग्नात माझे नाव बदलणार होती सासरची मंडळी, पण मी नाही बदलू दिले’. या वाक्यावर त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ‘बरे झाले, हे तुला सुचले तरी. मला कधीच सुचले नाही. मला माझ्या नावाचा खूपच राग आहे. मी स्वतःला रोज कोसते, पण व्यक्त व्हायची संधीच मिळाली नाही कधी आणि व्यक्त तरी कुणापुढे होऊ न??’ मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ फारसा कळला नाही, पण का कुणास ठाऊक त्यांच्या त्या पडलेल्या चेहऱ्याची आणि दबलेल्या स्वराची कथा जाणून घेण्याचीच उत्सुकता वाढली. मी काहीतरी विचारणार तेवढ्यात ढोलकिया काका आले. तसा सिगरेट आणि दारूचा भपकारा आला. मी हळूच काढता पाय घेतला.
त्यांच्याकडे जेवायला गेल्यावर आम्ही दोघीच असताना खूप हसलो. मात्र, त्यांच्या या हसण्याला कारुण्याची किनार दिसली. खूप विचारावेसे वाटत होते, पण कसे विचारायचे हा प्रश्न होता. आतापर्यंतच्या इतक्या दिवसांच्या ओळखीत पहिल्यांदा मला ढोलक काकूने त्यांच्याविषयी विचार करण्यास बाध्य केले. खरे तर मी दोनच दिवस माहेरी राहणार होते. पण, उत्सुकतेपोटी काहीतरी कारण काढून त्यांच्या घरी जाऊन यायचे. शेवटी त्यांच्याच लक्षात आले असावे. त्याच म्हणाल्या, ‘प्राजक्ता काही विचारायचेय का तुला?’ या त्यांच्या वाक्याने मी अवाक. संधी दवडायची नाही असे मी ठरवले होते. अधाश्यासारखं म्हणाले, ‘काकू, तुम्ही खूप हसता आणि हसवता. पण, मला वाटतंय की तुम्ही नाटक करता’. हे शब्द उच्चारणे मला इतके जड गेले की माझ्या डोळ्यांत पाणीच आले. आता या चिडणार हे गृहीत धरूनच मी त्यांच्याकडे पाहिले तर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा बांध फुटल्यागत वाहत होत्या. मला अपराध्यासारखे वाटले. मी त्यांचा हात हातात घेऊन ‘सॉरी’ म्हणाले. त्या आता हमसून हमसून रडायला लागल्या. बघता बघता त्यांच्या रडण्याचा आवाज वाढला आणि मला काहीच सुचेना की त्यांना शांत कसे करावे ते? त्यांचे रडणे हे साचलेल्या मळभासारखे वाटत होते. तेवढ्यातत दारावरची बेल वाजली. मोठ्याने रडणारी ही बाई क्षणात डोळे पुसून दार उघडायला गेली. पोस्टमनशी चौकशी करून अशी बोलत होती जसे क्षणापूर्वी काहीच घडले नाही. संभ्रमावस्थेत असणारी मी आणखी कोड्यात पडले.
काकू मला विदूषकच वाटल्या; क्षणात मुखवटे बदलणाऱ्या. आत आल्यावर त्या इतकेच म्हणाल्या, ‘खूप हलके वाटतंय मला...आभारी आहे तुझी’. फोन आला म्हणून मला निघावे लागले. जाताना फक्त सांगितले, ‘काकू मोकळ्या व्हा. खूप साचलेय तुमच्या मनात’. माझ्या पाठीवर आश्वासक हात ठेवून त्यांनी होकाराची मान हलवली आणि म्हणाल्या, ‘सांगेन कधीतरी’. निघताना मला बाहेरच्या खोलीत टेबलवर ताट वाढून झाकून ठेवलेले दिसले. माझे लक्ष तिकडे गेलेले पाहून त्याच म्हणाल्या, ‘ढोलकीयांचे ताट आहे. घरच्या कामवाल्या मावशीने वाढून ठेवलेय. ताट वाढण्याइतपतही माझा अधिकार नाही’. मी अनंत प्रश्नांचा गुंतवळा घेऊन बाहेर पडले. माझी उत्सुकता फारच वाढायला लागली होती.
दुसऱ्या दिवशी पुण्यात पोचले. कामाच्या गराड्यात ढोलक काकूंची प्रतिमा आठवणीतून जराशी पुसट झाली होती. कधी कधी त्या आठवणीने मेंदूत डोकवायच्या आणि विरून जायच्या. महिन्याने त्या डोक्यातून पूर्णच निघाल्या होत्या. तब्बल सात महिन्यांनी मला फोन आला. तो होता ढोलक काकूंचा. आश्चर्य होते माझ्यासाठी. त्या अतिशय सहज म्हणाल्या, ‘प्राजक्ता, आनंदाची बातमी सांगायचीय’. मी उत्सुकतेपोटी विचारायच्या आधीच त्या म्हणाल्या, ‘मि. ढोलकिया गेले. सुटले मी’. ‘म्हणजे?’ असा माझा पुढचा प्रश्न असेलच असे गृहीत धरून त्या म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्याचे पुस्तक फार फाटके होते. आता सगळे अध्याय संपले, पण ते पुस्तकच इतके जर्जर झालंय की आता त्याला रंगीबेरंगी वेष्टनही लावावेसे वाटत नाहीए. असो. ढोलकिया गेले हे सांगायला फोन नाही केला तर विचारायला केलाय, माझ्यावर पुस्तक लिहिशील का?? पुढे चित्रपट काढू. माझी कथा, कथा कसली व्यथाच... सांगताच आली नाही कधी कुणाला. इतके शंकेचे पाश भोवती होते की मी एक क्षणही मनाजोगे जगले नाहीए. आता जगायचे म्हणते. प्राजक्ता, सांग मला येईल का गं जगता? त्याहीपेक्षा जागून बघू का एकदा? तुला काय वाटतं? पण, ते जाऊ दे, मला कधी भेटतेस? माझ्यावर कधी लिहितेस?’ त्या बोलत होत्या फोनवर, पण मी त्यांना प्रत्यक्ष अनुभवत होते पुढ्यात. त्यांच्या डोळ्यांतून जो आनंद ओसंडत होता, तो मला बघता येत होता. त्यांचे शब्द कमी, पण डोळे जास्त बोलत होते. त्यांनी फोन ठेवला, मात्र माझ्या डोक्यात किडा वळवळत राहिला त्यांच्या नावाचा.
मी फोन लावला आणि म्हणाले ‘ढोलक काकू, आज तुम्हाला जितके बोलायचे तितके बोला आणि मोकळ्या व्हा’. त्या म्हणाल्या, ‘इतके महत्व आजपर्यंत कुणीही दिले नाही मला’. आणि त्या बोलायलाच लागल्या. ‘मी घरातली नववी मुलगी. तीन मुलींनंतर माझ्या सगळ्या बहिणींची नावे नकोशीच आहे. मी उगाचच कोशी हे नाव स्वत:ला ठेवलेय. नंतर वडिलांनी कुणाशीही आमची लग्न लावून दिलीत पैशांच्या बदल्यात. मी मात्र प्रेमविवाह केला. माझ्या लग्नाचे पैसे वडिलांना मिळाले नाहीत म्हणून त्यांनी नवऱ्याचा खूप अपमान केला. त्याचा बदला नवऱ्याने मरेपर्यंत घेतला. प्राजक्ता, तुला माहितीय, मला एक मुलगा आहे. समज आल्यापासून तो होस्टेलला आहे. त्याच्यासमोर माझ्या आयुष्याची लक्तरे उघडी पडू नयेत म्हणून. मला वाटायचे तो तुटेल माझ्यापासून, पण सुदैवाने त्याला माझा खूप लळा आहे. तो आता नोकरी करतो औरंगाबादला. मी उद्या त्याच्याकडे चाललेय. तिकडेच राहीन. पण, हे घर मी विकणार नाही. हे माझ्या कष्टाचे आहे.’
‘म्हणजे तुम्ही काय करायच्या?’
‘नको विचारुस. सांगितले तर तुला झेपायचे नाही’. मी हट्ट केला. मग म्हणाल्या, ‘आता लपवून तरी काय करू अगं. जेव्हा लाज वाटत होती तेव्हा लाज मी वेशीवर टांगली होती. माझ्या मुलासाठी मी ‘न्यूड आर्टिस्ट’ म्हणून काय करायचे चित्रकला विद्यालयात. पण, इमान विकला नाही गं माझा. नवऱ्याने त्याच्या अपमानाचा बदला अशा पद्धतीने घेतला. मला चित्रकला महाविद्यालयात नेऊन. पण, तिथे मिळणारी इज्जत मला हे काम करण्यास प्रवृत्त करत गेली. आणि मला आदर मिळत गेला. मात्र, लेकाच्या बालपणाला कायम पोरकी झाले. त्याला माहिती नाही हे सगळे. कधी विषय निघाला तरी सांगू नकोस.’
एेकून मी बधिर होते. ढोलक काकूंविषयी आदर खूप वाढला. त्यांच्या विषयी नक्की लिहायचे, त्यांना भेटायला जायचेच हे नक्की ठरवले होते. पण, कामाच्या गराड्यात राहून गेले. बरोबर महिन्याने मला फोन आला. म्हणाला, ‘ताई, मी मुकुल बोलतोय. ढोलक काकूंचा मुलगा. मी पुण्यात आहे जहांगीरला. आईला कॅन्सर झालाय. लास्ट स्टेजला आहे. तिला तुला भेटायचेय. येशील का?’ मी नेमकी तेव्हा चंद्रपुरात होते. माझी अडचण सांगितल्यावर तो म्हणाला, ‘ताई ,आईला घेऊन येतोय चंद्रपूरला. प्लीज आई येईपर्यंत थांबशील?’. मी त्या येईपर्यंत थांबण्याचे मान्य केले. मुकुलला मी दर तासाने फोन करायचे. तो विमानाने नागपूरला आणि तेथून चंद्रपूरला अँब्युलन्सने आला. चंद्रपुरात आल्यावर मी उर्जानागर जवळच त्याला गाठले. स्मार्ट हँडसम मुलगा. ढोलक काकुंजवळ बसला होता. मुकुलने मला पाहिले आणि आता त्याचा बांध फुटला. धो धो रडला. म्हणाला, ‘आईने फक्त जन्म दिला मला आणि पुन्हा मृत्यू दाखवायलाच भेटली. ताई मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही गं’. मीच मुकुलला म्हणाले, ‘वेळ गेलेली नाही. जितके तास ती आपल्याजवळ आहे, तेवढे तास आपण तिचे सोन्याचे, आनंदाचे करू.’ मी अँब्युलन्समध्ये बसले. काकूंना आवाज दिला. सांगितले मी आले. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. जागोजागी नळ्या घातल्या होत्या त्यांना. विचारले, ‘काकू तुमच्या सगळ्या इच्छा सांगा’. चांगली धाप लागली होती त्यांना. तरी म्हणाल्या, ‘आधी महाकाली मंदिरात घेऊन चला’. त्यांना उतरणे शक्य नव्हते. मी मंदिरात जाऊन मुकुलला व्हिडिओ कॉल लावला आणि काकूंना महाकालीचे दर्शन घडवले. मग म्हणाल्या, घरी जाऊ. घरी नेले. तिथेही मी व्हिडिओ कॉल लावून सगळे घर दाखवले.
तिथे त्यांना उतरवणार तोच त्या म्हणाल्या, ‘तिकडे जाऊ.’ मुकुलला कळत नव्हते. मी तर्क लावला, कदाचित चित्रकला महाविद्यालयात जायचे असावे. मुकुलला मी काय सांगणार? पण तरीही म्हणाले, ‘मुकुल मी सांगते तिकडे जाऊ.’ तो आश्चर्यचकीतच. तो क्षण चर्चा करण्याचा नसल्याने मी सांगेन तिकडे अँब्युलन्स वळवण्यास त्याने सांगितले. आम्ही चित्रकला महाविद्यालय गेलो. मुकुलला चित्रकला महाविद्यालयाचा आईशी काय संबंध हे कळेचना. मी फक्त इशारा केला, मग सांगते. मी महाविद्यालयात गेले. सगळी हकिकत सांगितली. मला महाविद्यालय उघडून देण्यात आले. मी व्हिडिओ कॉल लावला. काकू किलकिल्या डोळ्यांनी बघत होत्या. तिथे त्यांना ते बरेच आर्टिस्ट दिसले, ज्यांच्यासाठी त्यांनी न्यूड मॉडेल म्हणून काम केले होते. त्या आर्टिस्टनी जेव्हा ढोलक काकूंना बघितले, तेव्हा सारेच धावत अँब्युलन्सकडे गेले. सगळ्यांनी पेंट, ब्रश आणि रंगाची जणू त्यांना सलामी दिली आणि ढोलक काकूने त्याक्षणी प्राण सोडले.... चित्रकला महाविद्यालयाच्या दारात!! जिथे त्यांच्या जगण्याला खऱ्या अर्थाने आदर मिळाला होता.
आज त्या चित्रकला महाविद्यालयातील मासिकात मुखपृष्ठावर ढोलक काकूंचे चित्र छापले गेले. मुकुललाही विश्वासात घेऊन काकूंच्या न्यूड आर्टीस्टशीपबद्दल सांगितले. आता त्याच्या नजरेत त्याची आई महान तर आहेच, पण पूजनीयही आहे. आज ढोलक काकू भरून पावल्या असतील.
पण, मी माझा शब्द पाळू शकले नाही. पुस्तक लिहायचे राहून गेले. म्हणून हा लेख लिहून तुझ्या कार्याला सलामी देतेय. भविष्यात तिचे पुस्तक काढूच आणि चित्रपटही काढू, असा मुकुलने मला शब्द दिलाय. त्याला मी एकच म्हणाले, चित्रपटाचे नाव मात्र मी ठेवीन ते. ‘भन्नाट ढोलक!’ मुकुल म्हणाला, ‘याशिवाय दुसरा शब्दतरी तिच्यासाठी निर्माण झालाय का? ..हाच परफेक्ट! हीच परफेक्ट सलामी!!