खाते वाटप आणि मंत्र्यांची बोळवण

ज्या पद्धतीने खाते वाटप झाले आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई, अपक्ष रोहन खवंटे आणि अपक्ष गोविंद गावडे या घटक पक्षातील नेत्यांना खूश केले आहे. या खाते वाटपामुळे नेमके कोण खूश आणि कोण नाराज आहेत, ते येत्या सोमवारी स्पष्ट होईल कारण कोणत्याही दबावाला न झुकता आपण हे खातेवाटप त्या दिवशी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री स्पष्ट केले.

Story: दृष्टिक्षेप | पांडुरंग गावकर |
08th June 2019, 05:35 am


मुख्यमंत्री म्हणून डॉ.प्रमोद सावंत अनेक नवे निर्णय घेत आहेत. मंत्रालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्यापासून खाते वाटपापर्यंत अनेक निर्णय मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता संपल्यानंतरच्या काळात घेतले आहेत. अनुसूचित जमाती आणि जातींना १ हजार रुपये, ओबीसीला २६०० तर सर्वसामान्य गटाला ४५०० रुपये भरून ५० हजार रुपये इतके महागडे असलेले जैव शौचालय देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला. सरकार लोकांसाठी आहे असेच दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहेत. शुक्रवारी त्यांनी खाते वाटप करून टाकले ! या खाते वाटपाची चर्चा इतकी रंगली आहे की मुख्यमंत्र्यांनी यात काही घाई केली की काय असेही काही जणांना वाटत आहे.अर्थात अधिकृत घोषणा मात्र सोमवारी केली जाणार आहे. सध्याच्या बदलानुसार, वित्त मंत्री म्हणून आपल्याजवळ ठेवायचे लेखा आणि सांख्यिकी खाते त्यांनी मंत्री रोहन खवंटे यांना दिले जाईल. हे खाते वरवर साधे दिसत असले तरी आर्थिक सर्वेक्षणापासून जनगणना तसेच वित्त आयोग आणि नीति आयोग अशा साऱ्या महत्त्वाच्या खात्यांशी हे खाते संबंधित आहे, पण त्यांनी ते काढून भाजपतल्या मंत्र्यालाही न देता अपक्ष मंत्र्यांना दिली जाणार असल्याने चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांना अपेक्षेप्रमाणे वन खाते मिळणार आहे. नगर नियोजन, कृषी आणि आता वन अशी तीन अत्यंत महत्त्वाची खाती सरदेसाई यांच्याकडे आली आहेत. त्याशिवाय कारखाने आणि बाष्पक, पुराभिलेख व पुरातत्त्व ही खातीही त्यांच्याजवळ आहेत. घटक पक्षांना खूश ठेवताना मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षांमधील महत्त्वाचे नेते विजय सरदेसाई यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. उपमुख्यमंत्रिपद आणि सहा खाती सरदेसाई यांच्याकडे दिली आहेत. सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यामुळे सध्या सरदेसाईच सर्वात वजनदार मंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांनाही याची जाणीव असल्यामुळे तत्काळ सरदेसाई यांना मुख्यमंत्र्यांनी खूश केले आहे. पण दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्र्यांनी गोवा फॉरवर्डच्या अन्य दोन मंत्र्यांची बोळवण केली आहे. त्यात मंत्री विनोद पालेयकर यांच्याजवळ जलस्रोत, वजन माप आणि मत्स्यव्यवसाय अशी वजनदार खाती आहेत. त्यांना नवे खाते दिलेले नाही, पण जयेश साळगावकर यांना एखादे चांगले खाते दिले जाण्याची अपेक्षा होती. साळगावकर यांना दिलेल्या ग्रामीण विकास, बंदर आणि गृहनिर्माण या खात्यांमध्ये फारसे काम नसल्यामुळे साळगावकर यांना एखादे चांगले खाते द्यावे, अशी मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना संग्रहालय हे खाते देऊन त्यांची एका अर्थाने बोळवणच केली आहे. मंत्रालयात कायम लोकांसाठी उपलब्ध असतात असे काही मंत्री आहेत, ज्यात जयेश साळगावकर यांचा क्रमांक सर्वात आधी लागतो. पण खाते वाटपात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरच अन्याय केला आहे. गोवा फॉरवर्डच्या दोन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी डावलल्यामुळे काँग्रेसकडून आमदारांची आयात केल्यानंतर मगोची जी स्थिती केली, तीच गोवा फॉरवर्डची होते की काय अशी चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.
आमदारकीत भाजपात ज्येष्ठ असलेले मिलिंद नाईक यांना अतिरिक्त खाते वाटपात अत्यंत दुर्लक्षित असे नदी परिवहन खाते दिले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणारे विश्वजित राणे यांना कायदा आणि उद्योग अशी महत्त्वाची दोन मोठी खाती देण्यात येणार आहेत. त्यांच्याजवळ एकूण चार खाती आहेत, ज्यात आरोग्य आणि महिला व बाल कल्याण या खात्यांचा समावेश आहे. भाजपचे मॉविन गुदिन्हो यांना आता वाहतूक खाते दिल्यामुळे त्यांच्याजवळ एकूण पाच खाती झाली. पर्रीकरांनीही अशी मेहरबानी दाखवली नाही जी डॉ.सावंत यांनी दाखवली. अतिरिक्त खाते वाटप गेल्या दीडेक वर्षांपासून प्रलंबित होते. भाजपाचे निलेश काब्राल यांनाही मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण आणि विज्ञान व तंत्रज्ञान खाते दिले आहे. ही महत्त्वाची खाती आहेत. काब्राल, गुदिन्हो, राणे यांची चांगली काळजी पक्षाने घेतली आहे. पण मिलिंद नाईक सारख्या ज्येष्ठ आमदारावर किंचित अन्याय झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी अपक्ष गोविंद गावडे यांना सहकार खाते दिले आहे. त्यांच्याजवळ एकूण चार खाती झाली आहेत. कला संस्कृती, आदिवासी कल्याण, नागरी पुरवठा ही महत्त्वाची खाती यापूर्वीच त्यांच्याजवळ होती. गावडे यांनी भाजपाला लोकसभा आणि शिरोडा मतदारसंघात निवडणुकीसाठी भरीव कार्य केल्यामुळे पक्षही त्यांच्यावर खूश आहे. गावडे यांना खूश ठेवण्यासाठीच सहकार हे महत्त्वाचे खाते त्यांना दिले जाणार. शिक्षण खाते मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती पण मुख्यमंत्र्यांनी ते खाते आपल्याजवळ ठेवले आहे. ज्या पद्धतीने शुक्रवारी खाते वाटप करण्याचे ठरले, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई, अपक्ष रोहन खंवटे आणि अपक्ष गोविंद गावडे या घटक पक्षातील नेत्यांना खूश केले आहे. साळगावकर यांना डावलले तर पालयेकर यांना या अतिरिक्त खाते वाटपात स्थानच देण्यात आलेले नाही.
भाजपाच्या मंत्र्यांना खूश ठेवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांना नव्या खाते वाटपात हस्तकला व वस्त्रोद्योग आणि गोवा गॅझेटर ही खाती दिली जातील. त्यातील हस्तकला व वस्त्रोद्योग खात्यात काम करण्यास वाव आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याजवळ पर्यटन, क्रीडा ही महत्त्वाची मोठी खाती आहेत. त्यांना राजभाषा आणि सार्वजनिक गाऱ्हाणी ही खाती त्यांना दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्रिपद आणि सहा खाती असा त्यांच्याकडे सध्या पदभार आहे.
मुख्यमंत्र्यांनी खाते वाटप करण्यापूर्वी गुरुवारी बराचवेळ पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केली होती. गुरुवारी रात्रीच या खाते वाटपावर शिक्कामोर्तब झाले होते. शुक्रवारी त्याचे वितरण होईल असे वाटत होते. या खाते वाटपामुळे ज्यांची बोळवण झाली आहे, अशा मंत्र्यांकडून उघडपणे नाराजीही व्यक्त होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी आपल्याजवळ गृह, वित्त, खाण, शिक्षण, दक्षता, पर्सोनेल, सर्वसामान्य प्रशासन आणि प्रशासकीय सुधारणा अशी अनेक महत्त्वाची खाती ठेवली आहेत. या खाते वाटपामुळे नेमके कोण खूश आणि कोण नाराज आहेत, ते येत्या सोमवारी स्पष्ट होईल कारण कोणत्याही दबावाला न झुकता आपण हे खातेवाटप त्या दिवशी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री स्पष्ट केले.
-०-