सहा जून १९४४ : एक जागतिक स्मरण

डी-डेमुळे भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणून हा दिवस आपल्या स्मृतीत असावा. आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील इतिहास शिक्षकांनी या दिवसाचे महत्त्व स्वत: अभ्यास करून विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे.

Story: नंदनवन | डॉ. नंदकुमार कामत |
06th June 2019, 05:43 am

सहा जून १९४४ हा दिवस मानवी इतिहासात सुवर्णाक्षरांनी वगैरे लिहिला गेला असला तरी त्यादिवशी फ्रान्सच्या ८० कि.मी. लांब नॉर्मंडी किनारपट्टीवर दोस्त राष्ट्रांच्या ४४१४ सैनिकांनी मृत्यू पत्करला. आज युरोप व अमेरिकेत व विशेषत: इंग्लंड व फ्रान्समध्ये फार मोठ्या उत्साहाने, मोठ्या प्रमाणावर या घटनेची ७५ वर्षे साजरी केली जात आहेत. भारताच्या स्वातंत्र्याशी हा दिवस जोडला गेला आहे. आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील इतिहास शिक्षकांनी या दिवसाचे महत्त्व स्वत: अभ्यास करून विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे.
या दिवशी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा वगैरे राष्ट्रांचे मिळून एक लाख ५६ हजार सैनिक फ्रेंच किनारपट्टीवर उतरले नसते तर वर्षभरात तब्बल पाच वर्षे चाललेल्या या विनाशक महायुद्धाची समाप्ती होणे शक्य नव्हते. हिटलरने आपली सर्व ताकद पूर्व युरोपमध्ये रशियाविरुद्ध लावलेली असताना दोस्त राष्ट्रांनी फ्रान्स सीमेवरून चढाई करण्याची, दुसरी आघाडी उघडण्याची काहीही तयारी केली नव्हती. नोव्हेंबर १९४३ मध्ये तेहरान परिषदेत रशियन(तत्कालीन सोव्हिएत गणराज्य प्रमुख) हुकूमशहा जोसेफ स्टॅलीननी इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टना निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यांनी फ्रान्समधून दुसरी आघाडी उघडून दोन्ही बाजूंनी हिटलरला जेरीला आणण्याचे कबूल केले.
दोस्त राष्ट्रे कधीतरी असा हल्ला चढवतील म्हणून हिटलरने नॉर्वेपासून स्पेनपर्यंत अटलांटिक तटबंदी उभारण्याचा आदेश दिला होता. आफ्रिकेत उत्कृष्ट युद्ध नेतृत्व केलेल्या रोमेलची नेमणूक हिटरलने फ्रान्सच्या आघाडीवर केली. दोस्तांच्या बाजूने जनरल ड्वायट आयसेनहॉवर हे अमेरिकन सेनापती व जनरल बर्नार्ड मोंटेगॉमेरी हे ब्रिटिश सेनाधिकारी दुसरी आघाडी उघडण्याची तयारी करु लागले. ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’ हे दुसऱ्या आघाडीच्या चढाईचे नांव होते. त्यासाठी जर्मन सैन्याचा मारा सोसून फ्रान्सच्या नॉर्मंडी किनाऱ्यावर सैन्य उतरवण्यासाठी आखलेल्या मोहिमेचे नांव होते ऑपरेशन नेपच्यून. दोस्त राष्ट्रांनी त्यासाठी १९४३ पासून नियोजन सुरु केले होते. सैन्य कधी व कोठे उतरवणार हे रोमेल व हिटलरला कळू नये म्हणून चकवा देणाऱ्या हालचाली करण्यात आल्या. दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला, त्यामुळे महाधुरंधर रोमेलही गोंधळून गेला. पण त्या नॉर्मंडीहून सैन्य घुसणार याचा जरासा सुगावा लागला होता. त्याने ताबडतोब पाणसुरुंग, काटेरी तारा, अडथळे निर्माण करून किनारपट्टीचे संरक्षण वाढ​विले. पण प्रचंड धोका पत्करून व हानी सोसून दोस्त राष्ट्रे या ८० कि.मी. लांब किनारपट्टीवर ६ जून १९४४ रोजी पहाटे सैन्य उतरवतील याची त्याला कल्पना नव्हती. इथेच हिटरलची फार मोठी चूक झाली. दुसऱ्या बाजूने दोस्त राष्ट्रांनी फ्रान्सच्या मुक्तीयोद्ध्यांना गनिमी पद्धतीने शत्रूचा रसदपुरवठा व वाहतूक यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी मार्गदर्शन केले. या गनिमांनी ५२ रेल्वेगाड्या उद्ध्वस्त केल्या. नॉर्मंडच्या दिशेने जाणारे ५०० रेल्वेमार्ग तोडून टाकले. ओव्हरलॉर्ड मोहिमेची सुरुवात जर्मन लक्ष्यांवर प्रचंड बाँबफेक करून झाली. ‘ऑपरेशन पॉईंटब्लँक’ असे या बाँबहल्ल्याचे नांव होते. रशियन आघाडीवर भरपूर मार खाऊन आता ‘लुफ्तवॉ’ या जर्मन हवाई दलाकडे प्रतिहल्ले चढविण्यासाठी फक्त ८१५ विमाने शिल्लक होती. याउलट दोस्तांकडे ९५४३ विमाने होती. जर्मन सैन्याच्या ५० तुकड्या फ्रान्समध्ये होत्या. समजा, दोस्त राष्ट्रांच्या सैन्याकडून आक्रमण झाले तर ठिकठिकाणी फ्रान्समध्ये प्रतिकार करण्यासाठी जर्मन बचावफळीने अडथळे निर्माण करून ठेवले होते. बांध फोडून दलदल निर्माण केली होती.
ऑपरेशन नेपच्यूनसाठी हवामान, सागरी स्थिती पाहून १ मे हा दिवस आधी ठरविला गेला, पण नंतर तो पुढे ढकलून ६ जूनच्या पहाटे चढाईचा निर्णय झाला. या दिवसालाच जगात ६.६.१९४४ अथवा ‘डी-डे’ म्हटले जाते. डी-डेच्या दिवशी दोस्त राष्ट्रांनी सैन्य उतरवण्यासाठी ८० कि.मी. लांब किनारपट्टीचे पाच विभाग केले. युटा, ओमाहा, गोल्ड, जुनो व स्वॉर्ड, प्रत्येक विभागाची कामगिरी त्या त्या तुकड्यांकडे होती. ६ जून १९४४ रोजी नॉर्मंडीच्या दिशेने ६९३९ नौका निघाल्या. त्यात १२१३ युद्ध नौका, ४१२६ इतर जहाजे, ६५ विनाशिका व १९५७०० सैनिक होते. या दिवशी नेमके काय झाले, त्याचे यथार्थ चित्रण आपल्याला या मोहीमेवर आधारित डी-डे. १९५६ व २००४, हेल इन नॉर्मंडी, ओव्हरलॉर्ड १९७५ व २०१८, द लाँगेस्ट डे १९६२, सेव्हींग प्रायव्हेट रायन, १९९८, चर्चिल २०१७ इत्यादी थरारक इंग्रजी युद्धपटांतून पहायला मिळते. उतरणाऱ्या सैन्याला प्रखर प्रतिकार झाला. पहिल्याच धडाक्यात ४४१४ सैनिक मृत्यूमुखी पडले. दोस्तांच्या चढाईत ४ ते ९ हजार जर्मन सैनिक कामी आले. पण मोहीम फत्ते झाली. १२ जूनपर्यंत प्रखर प्रतिकार सोसत एकेक गल्ली, बोळ, गांव जर्मन सैन्यापासून मुक्त करीत दोस्त राष्ट्रांचे संयुक्त सैन्यदल झपाट्याने बर्लींनच्या दिशेने झेपावू लागले. १९ ऑगस्टला पॅरिस जिंकण्यासाठी घनघोर लढाई जुंपली. २५ ऑगस्टला पराभूत जर्मन सेनेने पॅरीसमध्ये शरणागती पत्करली. तेथूनच दुसऱ्या महायुद्धाचा अंत सुरु झाला असे म्हणता येईल. शेवटची लढाई ‘बॅटल ऑफ बल्ज’ डिसेंबर १९४४ मध्ये झाली. पण सगळीकडे जर्मन प्रतिकार कोसळत गेला. शेवटी ८ मे १९४५ रोजी युरोप मधील महायुद्धाचा जर्मन सैन्याच्या शरणागतीमुळे अंत झाला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आझाद हिंद सेनेची एक तुकडी जर्मन सैन्याबरोबर दोस्त राष्ट्रांविरुद्ध या मोहिमेत लढत होती. माघार घेताना हे सैनिक पकडले गेले. ६ जून १९४४ हा भारतीय लष्कराच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धात अखंड भारताने २५ लाख सैन्य पाठविले. संपूर्ण महायुद्धात ८७ हजार भारतीय सैनिकांचा बळी गेला.
दुसऱ्या महायुद्धाने गोव्यालाही आत ओढले. पोर्तुगाल तटस्थ राष्ट्र असल्याचा फायदा घेऊन ऑगस्ट १९३९ मध्ये तीन जर्मन जहाजे मुरगाव बंदरात आली. मग जून १९४० मध्ये अॅनफोरा हे इटालीयन जहाज आले. हिंदी महासागरात जर्मन यू-पाणबुड्यांनी धुमाकूळ घातला होता. कुविख्यात जर्मन गेस्टापो हेरयंत्रणेचे हस्तक रॉबर्ट कॉक पणजीत राहून हेरगिरी करायचे. एहरनफेल्स, ब्रॉन फेल्स व द्राकेनफेल्स ही तीन जर्मन जहाजे मुरगाव बंदरात होती. त्यातील एहरेनफेल्सवरून टेहळणी व्हायची. मुंबई बंदरातून सुटणाऱ्या बोटींची माहिती जर्मन पाणबुड्यांना मिळत असे. ११ मार्च १९४३ पर्यंत या पाणबुड्यांनी १२ बोटी बुडवल्या. अखेर कलकत्याहून गुपचूप पाठविलेल्या एका ब्रिटीश कमांडो तुकडीने ९ मार्च १९४३ रोजी एहरेनफेल्स बुडवली, त्यापूर्वी कर्नल लेनिस पघ व स्टीवॉर्ट यांनी पणजीतून कॉक दांपत्याचे अपहरण करून कॅसलरॉकमध्ये त्यांची हत्या केली. त्यानंतर हिंदी महासागरातील संकट टळले. दुसऱ्या महायुद्धामुळेच गोव्यात अडकलेल्या सहा जर्मन खलाशांना स्थानिकांशी विवाह करून इथेच स्थायिक व्हावे लागले. डी-डेमुळे भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. म्हणून हा दिवस आपल्या स्मृतीत असावा.