बस तिकीट दरात वाढ!

पहिल्या तीन किलोमीटरला १० रुपये, शटलसाठी १.४० रुपये प्रती किमी

Story: विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता |
30th May 2019, 12:25 pm
बस तिकीट दरात वाढ!

पणजी: सर्व प्रवासी आणि सिटी बस तसेच शटल सर्व्हिसच्या बस तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पहिल्या तीन किलोमीटरसाठी रु. १० व पुढील पाच किलोमीटला अतिरिक्त ५ रुपये असा नवा तिकीट दर सिटी बस व इतर प्रवासी बसेससाठी असेल. वाहतूक खात्याने याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. १ जूनपासून हे नवे तिकीट दर अस्तित्वात येणार आहेत. 

पहिल्या तीन किलो मीटरला रु १०, पुढील ५ किलोमीटरला रु. ५, आणि त्यानंतरच्या प्रत्येक ८ किलोमीटरला रु. ५ असा नवा तिकीट दर असल्यामुळे सिटी बस व इतर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पणजी ते डिचोलीपर्यंतचा प्रवास करायचा असल्यास पणजी-म्हापसा-डिचोली या मार्गावर सुमारे ३५ रुपये इतके बसचे तिकीट लागू होऊ शकते. 

राज्य सरकारने या तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला असून राज्य वाहतूक प्राधिकारण आणि प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाला तिकीट दरवाढीचे निर्देश दिले आहेत. त्या प्रमाणे हे नवे दर पत्रक वाहतूक खात्याने जारी केले आहे. 

शटल बस सेवेसाठी प्रती किलोमीटर १.४० रुपये असा दर असेल. तसेच वातानुकुलित शटल सेवा असल्यास त्यासाठी २ रुपये प्रती किलोमीटर असा नवा दर असेल. म्हणजे पणजी ते मडगाव या मार्गावर सुमारे ४८ रुपये शटल सेवा बसचे तिकीट असेल किंवा अंतर जास्त झाल्यास ते वाढूही शकते. तर याच मार्गावर वातानुकुलीत सेवेसाठी सुमारे ६८ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागेल. वाहतूक खात्याने विमानतळ ते कळंगुट शटल सेवा बसचे तिकीट १५० रुपये प्रती प्रवासी तर विमानतळ ते मोबोर शटल सेवा बससाठी १२५ रुपये प्रती प्रवासी निश्चित केले आहे. दरम्यान, मान्यताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सलवत असले. 

हेही वाचा