चारपैकी तीन जागांवर भाजप

पणजी पोटनिवडणुकीत बाबूशचा डंका, म्हापशात वारसा जोशुआकडे


23rd May 2019, 09:33 am

विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता

पणजी: विधानसभेच्या चार पोट निवडणुकींच्या निकालानंतर भाजपाने मांद्रे, म्हापसा आणि शिरोडा असे तीन मतदारसंघ आपल्याजवळ ठेवण्यात यश मिळवले आहे. २५ वर्षांनंतर काँग्रेसने पणजीत प्रवेश केला आहे. पोट निवडणुकींच्या निकालानंतर भाजपाच्या आमदारांची संख्या १७ झाल्यामुळे राज्यातील विद्यमान भाजप आघाडी सरकार टिकवून ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेत आता भाजपाचे १७ आमदार झाले आहेत तर काँग्रेसचे १५, गोवा फॉरवर्ड ३, मगो १, राष्ट्रवादी १ व अपक्ष ३ आमदार आहेत. मगोने अजून सरकारचा पाठिंबा काढलेला नाही त्यामुळे सध्या भाजपा आघाडी सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड, अपक्ष आणि मगो असा २४ जणांचा समावेश आहे. मगोने पाठिंबा काढला तर ही संख्या २३ वर येणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तीन मतदारसंघातील विजयामुळे सरकार मजबूत झाले आहे असे म्हटले तसेच काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपात येणार आहेत असा दावाही केला.तर, पणजीतून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेले बाबूश मॉन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डच्या आमदारांचे नाव न घेता - थांबा आणि पहा, माझे मित्र राज्याबाहेर आहेत - असे सांगत राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत.


मांद्रे :

२०१७ च्या निवडणुकीत मांद्रेतून तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर यांचा पराभव करून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले दयानंद सोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. पोट निवडणुकीत काँग्रेसपेक्षा त्यांना अपक्ष उमेदवाराकडून जास्त धोका होता पण अपक्ष आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून ३७८७ मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. तिथे अपक्ष उमेदवार जीत आरोलकर दुसऱ्या तर काँग्रेसकडे भांडून उमेदवारी मिळवणारे बाबी बागकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

म्हापसा:

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले भाजपाचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र  जोशुआ यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसचे सुधीर कांदोळकर जिंकतील असा वर्तवण्यात येणारा अंदाज फोल ठरवत जोशुआ हे सध्याच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. त्यांनी ८४२ मतांच्या आघाडीने कांदोळकर यांचा पराभव केला आहे. जोशुआला १०४४० मते मिळाली तर कांदोळकर यांना ९५६० मते मिळाली आहेत. निकालाची अंतिम आकडेवारी जाहीर व्हायची आहे.

पणजी:

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याकडून पराभूत झालेले बाबूश मॉन्सेरात यांनी यावेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा पराभव करून १७७५ मतांची आघाडी मिळवली. आपचे वाल्मिकी नाईक आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांचा फारसा प्रभाव पणजीवर राहिलेला नाही.

शिरोडा :

२०१७ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवर सुभाष शिरोडकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर पोट निवडणुकीत मगोचे दीपक ढवळीकर यांच्याशी त्यांची थेट लढत होती. काँग्रेसचे उमेदवार महादेव नाईक यांनी या निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केली. २०१७ मध्ये प्रियोळमध्ये पराभूत झालेले ढवळीकर यावेळी शिरोड्यातून लढले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत शिरोडकर यांनी त्यांचा ७६ मतांनी पराभव केला.


-०-


-२५ वर्षांनंतर पणजी काँग्रेसकडे

-१७ वर्षांत बाबूश तीन मतदारसंघात आमदार

पंचवीस वर्षांपूर्वी म्हापशातून पणजीत येऊन आमदार झालेले दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्यानंतर पुन्हा बाहेरील व्यक्ती म्हणजेच ताळगावमधील रहिवासी असलेले बाबूश मॉन्सेरात पणजीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. पणजीत राहणारे सिध्दार्थ कुंकळ्येकर, सुभाष वेलिंगकर आणि वाल्मिकी नाईक यांचा पराभव करून मॉन्सेरात यांनी पणजीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. बाबूश  हे आपल्या १७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत तीन मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००२ ते २०१२ पर्यंत ताळगाव, २०१२ मध्ये सांताक्रुझ आणि २०१७ मध्ये पणजीत पराभूत झाले पण पोट निवडणुकीची संधी घेत ते आता पणजी मतदारसंघाचे आमदार बनले आहेत.

हेही वाचा