दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग


23rd May 2019, 03:12 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
वास्को :
पॅकिंगसाठी आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग करणाऱ्यांविरोधात वजन व माप खात्याच्या वास्को कार्यालयाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. बुधवारी वास्को कार्यालयाचे निरीक्षक नितीन पुरुशन व मडगाव कार्यालयाचे निरीक्षक देमू मापारी यांनी सांकवाळ औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईत ११ लाख ६२ लाख ५०० रुपयांचा माल जप्त केला. दरम्यान, मंगळवारी वेर्णा औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईत ३ लाख २५ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
वजन व माप खात्याने सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील पिण्याचे पाणी व पाम तेल यांचे उत्पादन व पॅकिंग करणाऱ्या एका कंपनीवर छापा मारला. त्यावेळी वजन व माप कायदा २००९च्या कलम १८(१) नुसार आणि वजन व माप कायदा २०११ च्या नियम ४ व २७ नुसार पॅकिंगसाठी लागणारे नोंदणी प्रमाणपत्र न घेता पॅकिंग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथील २९ हजार ५६८ पिण्याच्या पाण्याचे व ७ हजार ४६० पाम तेलाच्या पॅकेटस् जप्त करण्यात आले.
मंगळवारी (दि. २१) वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये टीव्ही तयार करणाऱ्या उत्पादक, निर्यातदार व पॅकर्सवर छापा घालण्यात आला, त्यावेळी तेथील २ हजार ७८६ एलईडी व एलसीडी ब्रॅकेट पॅकेजीस् जप्त करण्यात आली. त्या ब्रॅकेटचा आकार मेट्रिक प्रमाणित नव्हता. तसेच त्यावर उत्पादन
केलेला महिना, वर्षासाठी रबर स्टॅम्पचा वापर करण्यात आला होता. पॅकिंगसाठी लागणारे नोंदणी प्रमाणपत्र न घेता पँकिंग करण्यात आले होते. या कारवाईत नितीन पुरुशन व देमू मापारी यांना वजन व माप खात्याचे सुधीर गावकर, पास्कोल वाझ, मेल्विन फुर्तादोव रामदास गावडे यांनी सहकार्य केले.
वजन व माप खात्याच्या वास्को व मडगाव कार्यालयांनी केलेल्या या कारवाया वजन व माप खात्याचे कंट्रोलर किरण कोसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर व प्रसाद शिरोडकर यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आल्या.