मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी


23rd May 2019, 03:11 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पेडणे :
आस्कावाडा-मांद्रे येथील सालसा बार अँड रेस्टाॅरंटजवळ बुधवारी हिरो होंडा दुचाकी आणि टाटा टर्बो या चारचाकी वाहनांत अपघात घडला. या अपघातात मार्ना-शिवोलीतील दुचाकीचालक अंकुश धारगळकर (४२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी आकांक्षा धारगळकर या गंभीररीत्या जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अंकुश धारगळकर आणि त्यांची पत्नी आकांक्षा धारगळकर या दुचाकी (जीए-०३-२५११) वरून मार्ना-शिवोली येथे जात होत्या, यावेळी समोरून येणाऱ्या टाटा टर्बो (जीए-०३-सी-७१५१) या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अंकुश धारगळकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी पूर्णपणे बाजूला फेकली गेली. अपघात घडल्यानंतर टाटा टर्बोचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. अंकुश धारगळकर हे टपाल खात्यात नोकरीला होते. ते आपल्या पत्नीसह दुचाकीवरून मांद्रेतील नातेवाईकांकडे जात होते; मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.  
या अपघाताचा पंचनामा पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आल्बिटो राॅड्रिग्स आणि उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर यांनी पोलिस निरीक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला. त्यांना हवालदार अनिल परब यांनी सहकार्य केले. पेडणे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवचिकित्सेसाठी पाठवून दिला आहे. दरम्यान, पेडणे पोलिस सध्या चारचाकीचालकाचा शोध घेत आहेत.