मतमोजणीसाठी बोर्डातील केंद्रावर सुसज्ज व्यवस्था


23rd May 2019, 03:10 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने बोर्डातील मल्टिपर्पज सरकारी महाविद्यालयाच्या संकुलातील मतमोजणी केंद्राच्या बाहेर सकाळी ७ वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत १४४ कलम लागू केले आहे. लोकांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी आवाहन केले आहे.
दक्षिण गोवा लोकसभा व शिरोडा मतदारसंघातील पोटनिवणुकीची मतमोजणी या केंद्रावर होणार आहे. त्यासाठी जुन्या बाजारातील होली स्पिरिट चर्चपासून बोर्डाला जाणारा घोगळच्या जंक्शनपर्यंतचा मार्ग गुरुवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र बोर्डा भागात राहणाऱ्या लोकांना त्या मार्गावरून जाता-येता येणार आहे. बोर्डातील क्वाद्रोस मोटर्स ते मल्टिपर्पज महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्रापर्यंत सकाळी ८ वाजल्यापासून एकाही चारचाकी वाहनाला पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच त्या भागात असलेली दुकाने, रेस्टॉरंट व व्यापाऱ्यांची दालने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे.
बोर्डाच्या पुढे घोगळ, गृहनिर्माण वसाहत व राशोल, कुडतरीला जाणारी वाहतूक होली स्पिरिट चर्चपासून फातोर्डा, आगाळी व घोगळमार्गे वळविण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी मल्टिपर्पज परिसरातील मार्ग दिवसभर वाहतुकीला बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने वाहतूक विभागाला जारी केलेला आहे. मल्टिपर्पजच्या मतमोजणी केंद्रापासून सुमारे दोनशे मीटरच्या अंतरावर रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, तर मल्टिपर्पजच्या मैदानावर पार्किंगच्या जागेत निवडणूक उमेदवार, त्यांचे निवडणूक अधिकारी व प्रत्येक मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटना प्रवेश दिला जाणार आहे. त्यांची चारचाकी वाहने व दुचाकींना मल्टिपर्पजच्या मैदानावर वाहन पार्किंगच्या जागेत परवानगी दिली जाणार आहे. त्यात पत्रकारांची वाहने उभी करण्याची सोय करण्यात आली आहे.