मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही


23rd May 2019, 03:10 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यात २३ रोजी होणाऱ्या दोन लोकसभा आणि चार विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य पोलिसांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याची दखल घेऊन गोवा पोलिसांनी मतमोजणीस्थळी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच विजेत्या उमेदवारांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मिरवणुकीवेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.
राज्यात उत्तर गोव्यात आल्तिन्हो येथील गोवा पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये मतमोजणी केली जाणार आहे, तर दक्षिण गोव्यात बोर्डा येथील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे. यावेळी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन पोलिसांनी मतमोजणीसाठी चार स्तरावर सुरक्षा कवच तैनात केले आहे. त्यात प्रथम स्तरावर स्ट्राँगरूमची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान पाहणार आहेत. दुसऱ्या स्तरावर भारतीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावर गोवा पोलिस दलाचे जवान, तर चौथ्या व अंतिम स्तरावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त उत्तर गोवा तसेच दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांनी मतमोजणी स्थळाच्या बाहेर व इतर ठिकाणी जादा पोलिस तैनात केले आहे.
गोवा पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५०० पोलिस तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सीमा सुरक्षा दलाचे जवानांच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. त्यात चार पोलिस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, २२ पोलिस उपनिरीक्षक, ४ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, १५ पोलिस हवालदार, २४८ पोलिस कॉन्स्टेबल, २८ महिला पोलिस कॉन्स्टेबल मिळून ३३२ पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त उत्तर गोवा जिल्हा राखीव दलाचे पोलिस आणि विशेष विभागाचे पोलिस, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस तैनात केले आहेत.