संजय ढवळीकर यांच्या पुस्तकांचे पणजीत शनिवारी प्रकाशन


23rd May 2019, 05:52 pm

पणजी : गोव्याच्या राजकारणावर आधारित काल्पनिक राजकीय कथांचे दालन उघडणाऱ्या संजय ढवळीकर यांच्या ‘हाती राहिले धुपाटणे’ आणि ‘राजकारण गेले चुलीत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवार, २५ मे रोजी सायं. ४.३० वा. पणजीतील हॉटेल मनोशांतीच्या सभागृहात होणार आहे.

ज्येष्ठ उद्योजक, कार्यकर्ते आणि लेखक दत्ता दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या प्रकाशन कार्यक्रमाला अभिनेत्री, मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखिका डॉ. मीनाक्षी मार्टिन्स प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

गोव्यात गेल्या चार दशकांच्या राजकारणात झालेली सत्तांतरे, पक्षांतरे, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, विधिमंडळातील तसेच बाहेरील किस्से आदी वेगवेगळ्या राजकीय घटनांवर आधारित काल्पनिक कथा या दोन्ही पुस्तकांमध्ये आहेत. ‘राही’ प्रकाशनचे वैभव फोंडेकर दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक आणि वितरक आहेत.            

‘गोवन वार्ता’चे संपादक संजय ढवळीकर यांनी ‘गोवन वार्ता’च्या ‘तरंग’ या साप्ताहिक पुरवणीत २०१८ मध्ये ‘राज-कथा’ सदरात या कथा लिहिल्या होत्या. १९७८ ते २०१८ या चाळीस वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या राजकीय घटनांवर आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांवर आधारित काल्पनिक पात्रे या कथांमधून डोकावतात. हा कार्यक्रम खुला असून सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन वैभव फोंडेकर यांनी केले आहे.