वीज वाहिनी व्यापणार पश्चिम घाटातील १७७ हेक्टर जागा

धारवाडमधून गोव्यात ४०० केव्हीची नवी वाहिनी


23rd May 2019, 05:52 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : धारवाडमधून गोव्यात येणारी ४०० केव्हीची नवी सुधारित वीज वाहिनी पश्चिम घाटातील १७७ हेक्टर जागा व्यापणार आहे. धारवाडमधून दक्षिण गोव्यात शेल्डे-केपेपर्यंत ही वीज वाहिनी येणार आहे.             

छत्तीसगडमधून गोव्याला अतिरिक्त वीज वाहून आणण्यासाठी ही ४०० केव्हीची वीज वाहिनी गोवा तामनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड मार्फत आणण्यात येणार आहे. हा प्रकल्प केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. वीज मंत्रालयाने गोव्याला अतिरिक्त ४०० केव्हीची वीज वाहिनी घालण्यासाठी २०१७ मध्ये हा प्रस्ताव केंद्रीय वीज प्राधिकरणाने तयार केला होता. त्यासाठी या वीज वाहिनीचे काम धारवाडमधील नरेंद्र गावातून सुरू होईल. बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कन्नड जिल्ह्यातून दक्षिण गोव्यात शेल्डेपर्यंत हे काम करण्यात येईल.             

औषधी वनस्पतींसंदर्भात १८ डिसेंबर २०१२ रोजी पर्यावरण मंत्रालयाला सादर केलेल्या एका प्रस्तावात गोवा-तामणार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेडने १७७.०९ हेक्टर वन क्षेत्र कामासाठी लागेल, असे म्हटले आहे. त्यातील हल्ल्याळ, बेळगाव आणि धारवाडमधील १४६.६७९ हेक्टर तर दांडेली अभयारण्याची ३०.४१२ हेक्टर जमीन जाईल, असे म्हटले आहे.            

सुमारे २६५ कोटींचा हा प्रकल्प असून पर्यावरणाचा समतोल राखून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल, असे कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.