चोर्ला घाटात अपघातामुळे तब्बल सात तास वाहतूक ठप्प


23rd May 2019, 05:51 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वाळपई : चोर्ला घाटात बुधवारी मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातामुळे बेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल सात तास ठप्प झाली. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परिणामी रखरखत्या उन्हाच्या तडाख्यात चालक अन् प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

अनमोड घाटतील महामार्गाची दुरुस्ती करण्यात येत असल्याने बेळगाव-गोवा दरम्यानची संपूर्ण वाहतूक सध्या चोर्ला घाटातून सुरू आहे. परिणामी या महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. असाच एक अपघात बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला. केए-२२बी-१७१८ हा मालवाहू ट्रक बेळगावहून गोव्याच्या दिशेने येत होता तर, एमएच-१०सीए-४९८६ ही कार बेळगावच्या दिशेने जात होती. चोर्ला घाटातील एका वळणावर या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, महामार्गावरील वाहतूक तब्बल सात तास ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अपघातग्रस्त ट्रक हलवण्यासाठी क्रेनची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचा अंदाज घेऊन वाहनांची रांग वाढू नये, यासाठी त्यांनी दुपारी १२ वा. साखळी-दत्तवाडी या मार्गावरून जाणारी वाहतूक अडवून ती डिचोलीमार्गे आंबोली व तिलारी घाटातून वळविण्यात आली होती.

अपघातग्रस्त ट्रक हटवण्यासाठी पोलिसांना क्रेनची आवश्यकता होती. सकाळी १० वाजल्यापासून क्रेनचाच शोध सुरू होता. त्यासाठी पोलिसांनी डिचोली, साखळीसह आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. अखेर दुपारच्या वेळी त्यांना साखळी येथे काम करणारी क्रेन मिळाली. त्यानंतर सायंकाळी ३.३० वाजेपर्यंत क्रेन घटनास्थळी पोहोचली आणि ट्रक हटवण्याचे काम सुरू झाले. सायंकाळी ५.३० वाजता ट्रक हटवल्यानंतर ठप्प झालेली वाहतून पूर्वपदावर आली. 

बंदी असताना अवजड ट्रक घाटात कसा ? 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशावरून चोर्ला घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत खडी मालाची वाहतूक करण्यास परवानगी आहे. असे असताना हा अवजड ट्रक कोणाच्या आशीर्वादाने सकाळी ८ वाजता घाटात शिरला, असा संतप्त सवाल प्रवाशांनी आणि स्थानिकांनी विचारला आहे.

तळपत्या उन्हात सुमारे सात तास अडकून पडलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या मार्गावर खाद्यपदार्थच नव्हे तर साधी पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. 

वाहतूक पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी प्रवाशांना काही प्रमाणात पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्याने त्यांना दिलासा मिळाला.      

अपघातानंतर पोलिस २ तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप प्रवाशांनी केला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या सुमारे आठ किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. 

वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे दोनशेपेक्षा जास्त वाहने रांगेत अडकली होती. सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा मार्ग खुला झाला.