विश्वजीत यांच्यावर अपात्रतेची तलवार कायम

निवाडा अचानक लांबणीवर; निकाल कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ‌: लोबो


23rd May 2019, 05:49 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरुद्ध असलेल्या अपात्रता याचिकेवरील निवाडा देण्याची पूर्ण तयारी झालेली असताना बुधवारी अचानक प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी विधानसभा सचिवालयात येण्याचे टाळले. कायदेशीर अभ्यास करूनच काही दिवसानंतर निवाडा देण्यात येईल असे लोबो यांनी सांगितले.            

अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी दि. २७ जुलै २०१७ रोजी राणे यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आतापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली आहे. त्यावर बुधवारी निवाडा देण्यात येईल, असे प्रभारी सभापती लोबो यांनी मंगळवारी सांगितले होते, पण बुधवारी ते विधानसभेत आलेच नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधला असता निवाड्याबाबत कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे काही दिवसानंतर निवाडा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.             

गुरुवार, २३ मे रोजी विधानसभेच्या चार पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी होऊ शकतात. त्यापूर्वी राणे यांनी अपात्रता याचिकेतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न चालवले होते. पण अचानकपणे लोबो यांनी निवाडा देण्याचा निर्णय बदलल्यामुळे यामागेही काही राजकारण असल्याचे तर्क काढले जात आहेत. राणे यांना ही याचिका प्रलंबित ठेवून काँग्रेसच्या हाती कोलीत द्यायचे नव्हते, पण भाजपमधील काही नेत्यांना ही याचिका इतक्यात निकालात निघालेली नको. त्यावर २३ मेच्या निकालानंतरच निवाडा यावा, असे भाजपच्या काहीनेत्यांना वाटते.             

दरम्यान राणे यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका दाखल झाली होती, त्यावेळी ते आमदार नव्हते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच म्हणजे दि. १६ मार्च २०१७ रोजी राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते मंत्री झाले. राजीनामा दिल्यानंतर सुमारे चार महिन्यानी ही याचिका दाखल झाली होती. आतापर्यंत या प्रकरणी तीन सुनावण्या झाल्या आहेत. फक्त निवाडा येणे बाकी आहे.