रमजान : त्याग, प्रेम, सहानुभूतीचा महिना

Story: शकिरा खान |
22nd May 2019, 11:25 am
रमजान : त्याग, प्रेम, सहानुभूतीचा महिना


इस्लाममध्ये रमजान महिना हा उपवासाचा महिना आहे. ‘रम्ज’ म्हणजे ‘जळून ‘जाणे .जेव्हा अतिउष्ण हवा वाहते, तेव्हा जीवजंतू जळून भस्म होतात. तसेच रमजान महिना चालू झाला की लोकांचे वर्षाभरातील पाप जळून जाते. म्हणूनच रमजान महिन्याला ‘पवित्र महिना’ म्हटले आहे.
रमजान चालू झाल्यावर वातावरण खूपच सुखद होते. रोजा या शब्दाचा अर्थ आहे ‘सौम’ म्हणजे थांबणे. रोजा करण्याचे लक्ष्य आहे, स्वतःच्या आत्म्याला पवित्र करणे. तसेच ‘तकवा ‘करणे. ‘तकवा’ म्हणजे अल्लाहने सांगितलेल्या काही गोष्टींपासून दूर राहणे. ज्या गोष्टींसाठी धर्म तुम्हाला थांबवतो, त्या गोष्टी न करणे. रोजा म्हणजे दिवसभर उपाशी राहून सूर्यास्तानंतर खा-खा खाणे नव्हे. रोजा म्हणजे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सूर्योदयापूर्वी थोडेफार खाणे. सूर्याेदय झाला की पूर्ण दिवस अन्न-पाण्याचा त्याग करणे. फक्त उपाशी राहूनच रोजा पूर्ण होत नाही. भांडण-तंटा, कोणाला त्रास देऊ नये, स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवणे, घाणेरड्या व्यसनांपासून दूर राहणे, चहाड्या न करणे वगैरे गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
या महिन्यात मनुष्याला व्यक्तिमत्त्व उजळण्यासाठी चांगली संधी मिळते. निसर्गाने मानवी शरीराची अशी अद्भुत रचना केली आहे की मरणाऱ्या पेशींपैकी अनेक पेशी मानवी शरीरातच खाद्य म्हणून वापरल्या जातात. व्यापक अर्थानं या प्रक्रियेला ‘स्वजातिभक्षण’ वा ‘नरमांसभक्षण’ असंही म्हणता येईल. मानवी देहातील पेशींच्या निर्मिती व अंताची गुंतागुंत विज्ञानामध्ये ‘ऑटोफेजी’ म्हणून ओळखली जाते. ‘ऑटोफेजी’ या विषयासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे जपानचे जैवशास्त्रज्ञ योशीनेरी ओशीमी यांना २०१६ चा वैद्यकशास्र नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कर्करोगावर एक उपाय शोधला आहे. औषध नाही उपाय. त्यांच्या म्हणण्यानुसार मनुष्य जेव्हा वर्षात २० ते २५ दिवस १४ ते १५ तास उपाशी राहतो, तेव्हा शरीरातील पोषण भरून काढण्यासाठी त्याच्या शरीरातील जो भाग सडला आहे, ज्या पेशी मरण पावल्या आहेत, त्यांना आपले शरीर खाऊ लागते आणि शरीरातील सर्व घाण स्वच्छ होते. म्हणजेच विज्ञानानेही हे मान्य केले आहे की इस्लाममधील पाच स्तंभांपैकी रोजा हा स्तंभ, फक्त आत्म्यालाच नाही तर माणसाच्या शरीरालाही शुद्ध करण्याचा एक स्रोत आहे.
रमजानला प्रेषित महंमद यांनी ‘शहरुल्लाह’ म्हटले आहे. महिना म्हणजे अरबीत ‘शहर’ आणि अल्लाह म्हणजे ‘परमेश्वर’. याचा अर्थ आहे, ‘अल्लाहचा महिना’. कारण रोजा करणारा मुसलमान परमेश्वराची भक्ती करतो, त्याच्या आज्ञेचे पालन करतो. परमेश्वराची आज्ञा आहे की गरिबांना पोटभर जेवण द्या, दीनदुबळ्यांची राखण करा, सृष्टीत जे काही आहे, त्याचे संरक्षण करा. ही सुद्धा ईश्वराची भक्तीच झाली. रमजानमध्ये स्वर्गाचे द्वार उघडले जाते आणि नरकाचे द्वार बंद केले जाते. सूर्यास्तानंतर जेव्हा रोजा इफ्तार म्हणजे उपवास सोडला जातो, त्यानंतर रात्रीच्या वेळेला ‘तरावीह ‘ ची नमाज होते. तरावीह फक्त रमजान महिन्यातच होते. यात सर्व पुरुष मशिदीत आणि महिला घरी नमाज पढतात. एकंदरीत पूर्ण दिवस ईशआज्ञेचे पालन करून संपतो.
प्रेषित मुहंमद म्हणतात, जो मनुष्य दिवसभर उपाशी राहून ईश्वराच्या आज्ञेचे पालन करणार नाही त्या माणसाच्या उपाशी राहण्याची परमेश्वराला काहीच गरज नाही. रोजा लहान मुले, गरोदर स्त्रिया, वेडी माणसे, वृद्ध व्यक्ती बंधनकारक नाही. रमजानला जास्त महिमा प्राप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे मुहंमद ही साधारण व्यक्ती नसून अल्लाहच्या आज्ञेचे पालन करून, त्याने दाखविलेल्या सन्मार्गावर कसे चालावे हे शिकवणारे लोकांचे मार्गदर्शक, प्रेषित आहेत ही घोषणा या महिन्यात झाली. दुसरे कारण म्हणजे ‘लैलतुलकद्र.’ लैल म्हणजे रात्र. ही अशी रात्र असते, जिला सन्मान व प्रतिष्ठा मिळाली आहे. या रात्री पवित्र आत्मा अर्थात ‘देवदूत ‘जमिनीवर उतरतात आणि ईशआज्ञेने कामे पूर्ण करतात. या रात्रीतच ‘पवित्र कुराण’ अवतरले. ‘कुराण’ काही नवीन ग्रंथ नव्हे. प्रेषित मुहंमद यांच्या अगोदर जे प्रेषित झाले, त्यांना जे ग्रंथ प्राप्त झाले तेच ‘दिव्य कुराण’. या ग्रंथात मनुष्याने जीवन कसे व्यतीत करावे, याचे मार्गदर्शन केले आहे. या महिन्यातील आरंभिक भाग परमेश्वराच्या दया-दृष्टीचा असतो. मधला भाग क्षमायाचना आणि अखेरचा भाग नरकाच्या आगीपासून बचाव करण्याचा असतो.
या महिन्यात जास्तीत -जास्त ‘सदका ए फित्र’ दिला जातो. आपल्या मालमत्तेतील थोडा माल परिवाराचे पालनपोषण करण्याचे काहीच साधन नसलेल्यांना, गरीब विधवा, अनाथ मुले यांना दिला जातो. रमजान संपल्यावर दिवस उजाडतो तो ‘ईद -उल-फित्र’ चा. म्हणजेच निकालाचा. पूर्ण महिन्यात जी परीक्षा दिली, त्यात कोणी किती पुण्य कमावले आणि कोणाचे व्यक्तिमत्त्व विस्कळीत झाले, याचे परिणाम मिळतात. पण ते सर्व त्या सर्वेश्वरालाच ठाऊक की कोण त्याच्या आज्ञेवर खरा उतरला. एकंदरीत हा महिना त्याग, प्रेम, सहानुभूती, शिस्त आणि ईश्वराशी आपली जवळीक साधणारा आहे.
(लेखिका गृहिणी आहेत.)