‘मायेचा पदर’ नका हरवू...!

स्वच्छंद

Story: रमेश सावईकर |
22nd May 2019, 11:24 am
‘मायेचा पदर’ नका हरवू...!


-
कालचक्र आपल्या गतीनं फिरत असतं. काळानुरूप होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. आता आधुनिकतेनं माणसाचं जीवन व्यापलं आहे. त्यामुळे जीवन मूल्यांची जपणूक करण्याकडे गौणत्वानं पाहिलं जातं. जीवनांत मूल्य-नीतीपेक्षा व्यवहाराला अधिक महत्व प्राप्त झालं आहे. किंबहुना व्यवहाराच्या नावाखाली मूल्यं, नीतिमत्ता, माणुसकीचा धर्म आदी बाबींना निम्न स्थान दिलं जात आहे. आजची नवीन पिढी गांभीर्यानं याकडे बघण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. त्याला कारणंही अनेक असू शकतील. जीवनशैलीत बदल झाला आहे, तो भविष्यात समस्यांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.
अशा पार्श्वभूमीवर माझं विचारचक्र सुरु झालं, त्यालाही तसं निमित्त घडलं. गेल्याच आठवड्यात आमचे एक मित्र पत्नी, पत्नीच्या मैत्रिणीसह घरी आले होते. योगायोगानंच घरी येणं झालं होतं. हल्ली पाहुणचार सुद्धा करण्याची संधी मिळणं दुरापास्त झालं आहे. परंपरागत पद्धतीनुसार कोणी ओळखीचं वा अनोळखी माणूस घरी आलं की पाणी व गूळ किंवा साखर दिली जायची. त्यालाही कारण असायचं. गाड्या नसल्यानं पाहुण्यांना किमान एक वा अर्धा किलोमीटर किंवा अधिक अंतर चालून जाणं क्रमप्राप्त असायचं. त्यामुळं शक्ती खर्ची पडायची. तेवढे ‘कॅलरीज’ भरुन काढण्यासाठी, श्रमपरिहारार्थ पाणी व गूळ (गुळाच्या खड्यात सारखेरपेक्षा जास्त कॅलरीज म्हणून) दिलं जायचं.
घरात पाहुणा वा अन्य कोणी अवचित आले तर पाणी पाहिजेे का? असा प्रश्न केला जातो. या प्रश्नावर बहुधा उत्तर अपेक्षित असतं ते असं की ‘नको, पाणी वगैरे काही नको! नुकताच चहा घेतला आहे. गाडीत बसलो ते थेट तुमच्या घरी आलो. नुसतं बसून होतो’. ही ठराविक साचेबद्ध वाक्ये एेकावी लागतात. ‘चहा एवढा नको. कमी करा,’ असं पाहुण्याचं बाेलणं झालं की मग ‘नाही, नाही, थोडासा घ्याच,’ असं म्हणत आग्रह होतो. एक सोपस्कार म्हणून तो चहा घेण्याची कृती घडते.
गत पिढीतली माणसं आठवली तर आजची माणसं किती कृत्रिमपणानं वर्तन करतात, याची खंत वाटते. घरी आलेल्या पाहुणे मंडळींना वा शेजाऱ्यांना पिण्यासाठी पाण्याबरोबर दिल्या जाणाऱ्या गुळाच्या खड्याला त्याच्या गोडीशिवाय आपुलकीची, प्रेमाची अवीट गोडी असायची. ती ओळखणारी माणसं उमेदीनं पाणी घ्यायची. चहाचा आग्रह मोडायचा नाही, असा जणू नेमच होता. यातून नेमकं काय साधलं जायचं? नुसतं चहा-पाणी देणं नि घेणं? नाही तर घरची माणसं नि पाहुणे मंडळी यांच्यामध्ये आपुलकी, प्रेम, मानवतायुक्त अनुबंधाची साखळी गुंफली जायची. असलेल्या साखळीचे दुवे आणखी मजबूत व्हायचे. पण, दुर्दैव म्हणा हवं तर, पण ही निकोप संस्कृतीची लक्षणं आज लोप पावत आहे. त्याला माणसांची आधुनिकतेची किनार लाभलेली विचारसरणी नि जीवनशैली कारणीभूत आहे. असो, त्या पाहुण्याचं स्वागत करताना पुढं काय घडलं तेही तितकंच महत्त्वाचं.
आमची गृहलक्ष्मी विचारकर्ती झाली. म्हणााली, ‘त्यांना काय द्यायचे? चहा-काॅफी नको म्हणतात’. मी तिला म्हटलं, चहा-काॅफीत गोडी नसेल तर आंबे खायला दे. मानकुराद आंबे, गोव्याचा फळांचा राजा. त्यांना त्या आंब्याच्या गोडीतून आंबे खाल्ल्याचं थोडं तरी समाधान लाभेल. अगदी तसंच घडलं. त्यांनी आंब्याचं चविष्ट गोडीयुक्त शब्दांनी कौतुक केलं!
घरी सवाष्ण बाई आली तर तिची खणा-नारळानं ओटी भरण्याची पद्धत काही घराण्यांनी अजून जतन करुन ठेवली आहे. पण, हल्ली ही ओटी भरण्याचीही पंचाईत होते. सवाष्ण बायका नऊवारी लुगडं सोडाच, पाचवारीही साडी नेसत नाहीत. ड्रेसयुक्त पेहराव करतात. त्यामुळे खणा-नारळासाठी पदर कुठचा सापडणार? देणाऱ्या घेणाऱ्याची पंचाईत! माझे मित्र म्हणाले, ‘हल्ली ‘पदर’ च नसतो. त्यावरती मी म्हटलं. ‘मायेचा पदर’ असला की झालं! जीवनात तो पदर अधिक महत्त्वाचा! ड्रेस धारण करणाऱ्याच्या खांद्याभोवती ओढणी असते. तोच त्यांचा पदर! ती पाहुणे मंडळी निघून गेली. तथापि माझं मन मात्र अस्वस्थ होतं.
माणसा-माणसांमधील माया-आपुलकी -प्रेम आदी भावनांचे स्रोत आटत चालले आहेत. म्हणूनच की काय जीवनातला सुख-समाधानाचा ओलावा अनुभवण्याचा योग लाभत नाही. जीवन मूल्यांचं जतन करीत परस्परांमधील नात्याचे (रक्ताचं नातं अन् जोडलेलं नातं) अनुबंध असे तुटू देता कामा नयेत. ते अधिक मजबूत व्हायला हवेत. त्यासाठी आपण एकमेकांकडे व्यवहार करताना, वर्तन- आचरण करताना आम्ही सारी माणसंच आहोत या ‘मानवता’ वादी संकल्पनेला तडा जाणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. ती घेतली तरच मायेच्या पदराच्या सावलीत विसावण्याचा योग आपणाला लाभू शकेल. मातृवात्सल्याचे झरे जसे केव्हाही आटत नाहीत, तसे वात्सल्याचे झरे मानवी जीवनात प्रवाही ठेवण्यात खरं सात्विक समाधान आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)