प्रुडंट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अनावरण


20th May 2019, 03:33 pm

पणजी :इंडियन ऑयल - प्रुडंटतर्पे पहिल्या अखिल गोवा टेनिस बॉल (हार्ड बॉल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पंचायत आणि नगरपालिकास्तरीय संघ असून स्पर्धा २७ मे ते ३१ मे दरम्यान एसएजी मैदान, कांपाल पणजी येथे आयोजित होणार आहे. ३२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून विजेत्या संघाला १ लाख रुपये व चषक शिवाय वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत संघांना ‘ए’, ‘बी’, ‘सी’ पंचायतस्तरीय व ‘डी’ गटातील संघांना नगरपालिकास्तरीय गटात ठेवण्यात आले आहे. सर्व पंचायतस्तरीय संघ आपले सामने २७ ते २९ मे दरम्यान खेळतील तर नगरपालिकास्तरीय संघांचे सामने ३० मे रोजी होतील. उपांत्य सामना व अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवण्यात येईल. सोमवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करून जर्सी व चषकाचे अनावरण करण्यात आले.
स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये रोख व उपांत्य फेरीतील पराभूत संघांना १५ हजार रुपये प्रत्येकी व चषक प्रदान करण्यात येईल. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये प्रत्येक सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार, अंतिम फेरीतील सामनावीराला क्रिकेट बॅट देण्यात येईल. मालिकावीराला ४० इंच एलईडी टीव्ही व चषक देण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज यांना विशेष पारितोषिक व चषक देण्यात येईल.
स्पर्धेला इंडियन ऑयल टायटल पुरस्कर्ते आहेत. नित्यानंद स्पोर्टस्, दिल्ली दरबादर, तळावलीकर इलेक्ट्रिकल्स - पणजी, हॉटेल म्हार्दोळ, डॉ. केतन भाटीकर एसपीएआरसी, एजी गार्मेंट्स, स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ गोवा यांचेही प्रुडंटच्या या प्रयत्नांना सहकार्य लाभले आहे.