भारतीय महिला हॉकी संघाकडून दक्षिण कोरिया पराभूत


20th May 2019, 03:32 pm
भारतीय महिला हॉकी संघाकडून दक्षिण कोरिया पराभूत

जिंचियोन :भारतीय महिला हॉकी संघाने तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण कोरियाचा २-१ गोलने पराभव केला. युवा स्ट्रायकर लालरेम्सियामीने २०व्या व नवनीत कौरने ४०व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण कोरियातर्फे शिन हेजेयोंगने ४८व्या मिनिटाला गाेल केला.
या वर्षाच्या सुरुवातीला स्पेन व मलेशियाविरुद्ध प्रभावी प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर गमावल्यानंतर भारताने २०व्या मिनिटाला मैदानी गोल करत आघाडी घेतली.
भारताची आघाडी नवनीतने ४०व्या मिनिटाला दुप्पट केली. दक्षिण कोरियाला सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले व अखेरच्या क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोकही मिळाला व ४८व्या मिनिटाला एक गोल करण्यात त्यांना यश आले. भारतीय गोलरक्षक सविताने शानदार प्रदर्शन केले.
भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी सामना जिंकल्यानंतर सांगितले, हा आमचा पहिला सामना होता व निकालही चांगला लागला. प्रदर्शन आणखी चांगले होऊ शकते. आम्ही काही नवे प्रयोगही केले आहेत व संघ त्यावर खरा उतरला आहे. भारताचा आता दुसरा सामना बुधवारी होणार आहे.