इंग्लंडकडून पाकिस्तानचा सुफडा साफ

पाचव्या एकदिवसीयमध्ये ५४ धावांनी विजय; मालिका ४-०ने खिशात


20th May 2019, 03:32 pm
इंग्लंडकडून पाकिस्तानचा सुफडा साफ

हेडिंग्ले : इंग्लंडने लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ५४ धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका ४-०ने आपल्या नावावर केली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना मालिकेत सलग चौथ्यांदा ३०० धावांचा टप्पा गाठला व ५० षटकांत ९ गडी गमावून ३५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २९७ धावा करून आटोपला. ख्रिस वोक्सला (५४ धावांत ५ बळी) शानदार गाेलंदाजीबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले तर जेसन रॉयला (३ सामन्यांत २७७ धावा) त्याच्या शानदार फलंदाजीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स विंस (३३) व जॉनी बेयरेस्टोने (३२) संघाला ६३ धावांची वेगवान सुरुवात करून दिली. १२व्या षटकात संघाच्या १०५ धावा झाल्या असता बेयस्टोच्या रुपात इंग्लंडला दुसरा धक्का बसला. मात्र यानंतर जो रूट (८४) व कर्णधार इयान मॉर्गनने (७६) तिसऱ्या गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी केली व आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. ४०व्या षटकानंतर इंग्लंडची स्थिती ६ बाद २७६ अशी होती मात्र अखेरच्या १० षटकांमध्ये पाकिस्तानने पुनरागमन केले व यजमान संघाला केवळ ७५ धावाच करू दिल्या.
जोस बटलरने ३४ व अखेर टॉम करनने १५ चेंडूत २९ धावांची वेगवान खेळी केली. पाकिस्तानतर्फे शाहीन शाह आफ्रिदीने चार, इमाद वसीमने तीन व हसन अली व महम्मद हसनैनने एक गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली व ६ धावांपर्यंत तीन गडी त्यांनी गमावले, परंतु कर्णधार सरफराज अहमदने बाबर आझमसोबत (८०) चौथ्या गड्यासाठी १४६ धावा केल्या व संघाच्या विजयाची आशा कायम राखली. २७व्या षटकात बाबर आझम, ३१व्या षटकात शऐएब मलिक (२५) व ३२व्या षटकात सरफराज अहमद बाद झाल्यामुळे पाकिस्तानचा संघ दबावात आला.
सरफराज अहमद दुर्दैवी ठरला व आपले शतक पूर्ण करू शकला नाही. ९७ धावांवर तो धावबाद झाला. २५० धावांवर पाकिस्तानने ९ गडी गमावले होते मात्र अखेरच्या गड्यासाठी महम्मद हसनैन (२८) व साहीन आफ्रिदीने (१९) ४७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी आपल्या संघाला विजय ​मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही व पाकिस्तानचा संघ ४६.५ षटकांत २९७ धावा करून आटोपला.
इंग्लंडतर्फे ख्रिस वोक्सने सर्वाधिक ५ गडी बाद केले तर आदिल राशिदने दोन व डेव्हिड विलीने एक गडी बाद केला.
इंग्रूंडच्या जेसन रॉय व पाकिस्तानच्या बाबर आझमने मालिकेत सर्वाधिक २७७ धावा केल्या तर ख्रिस वोक्सने सर्वाधिक १० गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : ५० षटकांत ९ बाद ३५१ धावा : जेम्स विंस झे. फखर गो. शाहीन ३३, जॉनी बेयरस्टो झे. शाहीन गो. इमाद ४२, जो रूट झे. आसिफ गो. हसनैन ८४, इयॉन मॉर्गन झे. आबिद गो. शाहीन ७६, टॉम करन (नाबाद) २९, आदिल राशिद (नाबाद) २. गोलंदाजी : हसन अली १०-०-७०-१, शाहीन आफ्रिदी १०-०-८२-४, इमाद वसीम १०-०-५३-३.
पाकिस्तान : ४६.५ षटकांत सर्वबाद २९७ धावा : फखर झमान झे. रूट गो. वोक्स ०, बाबर आझम धावबाद (बटलर/ राशिद) ८०, सरफराझ अहमद धावबाद (बटलर) ९७, आसिफ अली झे. स्टोक्स गो. विली २२, शाहीन आफ्रिदी (नाबाद) १९. गोलंदाजी : ख्रिस वाेक्स १०-२-५४-५, डेव्हिड​ विली ९-१-५५-१, आदिल राशिद ७.५-०-५४-२.