अखेर नगरहवेली स्वतंत्र झाली

गोमंतगाथा

Story: मनोहर जोशी |
18th May 2019, 11:23 am
अखेर नगरहवेली स्वतंत्र झाली


--
दादरा सर केल्यावर दलाच्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. आता त्यांचे लक्ष्य होते नगरहवेलीची मुक्तता. नगरहवेली घेणार तर राजधानी सिल्व्हासा ताब्यात येणे आवश्यक होते. सिल्व्हासाची माहिती काढण्याची जबाबदारी दत्ताराम देसाई यांच्यावर सोपविली. ते कुंकळ्ळी गावचे. राजेंद्र देसाई व काशिनाथ देसाई हे त्यांचे शेजारी पोर्तुगीज पोलिसात होते. त्यामुळे माहिती मिळविणे सोपे झाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पोर्तुगीज पोलिस घाबरले आहेत व पोलिस प्रमुख फिदाल्गो यांनी सर्व ठाण्यातील पोलिसांना सिल्व्हासात आणून ठेवले असून त्यांची संख्या दोनशेहून अधिक आहे.
ही माहिती मिळताच दुसऱ्याच दिवशी दोन तुकड्या नरोलीहून सिल्व्हासाच्या दिशेने निघाल्या. पहिल्या तुकडीचे नेतृत्व प्रभाकर सिनारी करत होते. वाटेत एक ओढा व त्यापलीकडे पोलीस चौकी होती. ही तुकडी ओढ्यापाशी पोहोचताच त्यांना पाहून पोलिस घाबरून पळून गेले. ती ताब्यात घेऊन तुकडीने पिपरियाच्या दिशेने आगेकूच केली. पिपरियाच्या पोलिस चौकीपाशी पोहोचताच सिनारींनी ‘शरण या नाहीतर फुकट मराल,’ असे दरडावून सांगितले. त्याबरोबर घाबरून ते पोलिस बाहेर आले व त्यांनी लेखी शरणागती दिली. त्या चौकीवर मोठ्या प्रमाणात दारुगोळा होता. तो आयताच दलाच्या सैनिकांना मिळाला.
एव्हढ्यात सिल्व्हासाच्या बाजूने एक जीप येताना दिसली. त्यात पोर्तुगीज सैनिक असतील या समजुतीने दलाच्या सैनिकांनी हवेत बार काढून जीप थांबविली. जीपमध्ये एक पुरुष व दोन स्त्रिया होत्या. तो पुरुष म्हणजे नगरहवेलीतील कावस नावाचा काँट्रॅक्टर होता. त्या दोन स्त्रियांपैकी एक त्याची नातेवाईक तर दुसरी नगरहवेलीचे अॅडमिनिस्ट्रेटर फिदाल्गो यांची पत्नी होती. दलाच्या कारवाईला घाबरून पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तो निघाला होता.
लवंदे यांनी त्या दोन स्त्रियांना ओलीस ठेवून घेतले. कावस यांना फिदाल्गो यांच्यासाठी ‘त्यांनी सर्व पोलिसांसह एक तासाच्या आत शरण यावे, नाहीतर दलसैनिकांच्या हल्ल्याला त्यांना तोंड द्यावे लागेल’, असा निरोप देऊन परत सिल्व्हासाला पाठविले. हा निरोप मिळाल्यावर ‘दमणचे गव्हर्नर आमचे वरिष्ठ आहेत. त्यांच्याशी बोलून निर्णय घेऊ. तोपर्यंत आम्हाला वेळ द्या’, असा उलट निरोप फिदाल्गोंनी कावस यांच्या बरोबर पाठविला. ही केवळ वेळ काढण्यासाठी व आणखी तयारी करण्यासाठीची सबब आहे हे दलाच्या नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्वरित हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
याच दरम्यान राजाभाऊ वाकणकर यांनी पुण्याहून रा. स्व. संघाच्या ५० स्वयंसेवकांची कुमक मागविली. प्रभाकर सिनारी, विश्वनाथ लवंदे व श्यामराव लाड यांच्या नेतृत्वाखाली तीन तुकड्या करून तीन बाजूंनी सिल्व्हासावर हल्ला करण्याचे ठरले. सिल्व्हासाच्या पोलिस ठाण्यापासून सुमारे ५०० यार्ड अंतरावर पोहोचताच कानठळ्या बसविणारे आवाज करणारे हातबाँब पोलिस ठाण्याच्या दिशेने फेकले. हवेत बंदुकीचे बार काढले. यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली.
पोर्तुगीज पोलिसांनीही संरक्षणाची सिद्धता केली होती. पोलिस ठाण्याभोवती वाळूच्या पोत्यांची संरक्षक भिंत उभी केली होती. त्याच्याआड शस्त्रसज्ज पोलिस लपले होते. त्यांनी गोळीबार केला असता तर उघड्या मैदानावर असलेल्या दलाच्या सैनिकांसमोर मृत्युशिवाय पर्याय नव्हता. परंतु देशभक्तीने प्रचंड भारावलेल्या दलाच्या सैनिकांना त्याची क्षिती नव्हती. पोर्तुगीज पोलिसांना हल्ला करण्याची संधी मिळू नये या उद्देशाने साक्षात समोर मृत्यू दिसत असतानाही दलाच्या सैनिकांनी त्वेषाने आणि मोठमोठ्या गर्जना करत पोलीस ठाण्यावर चाल केली. खिडक्यांतून, दारातून मिळेल त्या मार्गाने पोलीस ठाण्यात प्रवेश केला. या धुमश्चक्रीत पोर्तुगीजांचे तीन सैनिक ठार झाले. दलसैनिकांचा तो आवेश पाहून पोर्तुगीज पोलिस गर्भगळित झाले. हातात असलेली बंदूक चालविण्याचे भानही त्यांना राहिले नाही. बंदुका जमिनीवर टाकून व हात वर करून ते शरण आले. अखेर नगरहवेली दलसैनिकांच्या ताब्यात आली.
१७८३ साली नगरहवेलीच्या पायात पडलेली पारतंत्र्याची बेडी अखेर स्वातंत्र्यवीरांनी १९५८ साली तोडली. दलाच्या सैनिकांनी आनंदाने व उत्साहाने ‘जयहिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सिल्व्हासा सर झाले. ५५ पोलिसांना कैद करण्यात आले. भरपूर शस्त्रसामग्री मिळाली. पण अॅडमिनिस्ट्रेटर कॅप्टन फिदाल्गो, कमांडंट फाल्काव व पोलीस चीफ पेगादू हे १५० सैनिक, स्टेनगन्स व दारुगोळ्यासह पळून गेले होते. ते जोपर्यंत ताब्यात येत नाहीत तोपर्यंत नगरहवेली मुक्त झाली, असे म्हणता येणार नव्हते. कारण आणखी कुमक घेऊन ते परत हल्ला करण्याची शक्यता होती. पण, प्रत्यक्षात त्यांचा दमणगंगा पार करून दापाडा किंवा खांडवेल इथे आश्रय घेण्याचा विचार होता. त्यांचे दुर्दैव असे की रखोली गावातल्या नदीला पूर आल्याने ते तिथेच अडकून पडले. ही बातमी कळताच प्रभाकर सिनारी, मोहन रानडे यांच्यासह अवघे ३५ सैनिक शस्त्रसज्ज अशा १५० पोर्तुगीज सैनिकांचा सामना करण्यासाठी निघाले.
दि. ५ ऑगस्टच्या रात्री दलाच्या सैनिकांनी पहिला हल्ला चढविला. त्यात काही पोर्तुगीज सैनिक जबर जखमी झाले. अंधाराचा फायदा घेऊन ते सर्वजण नदी पार करून खांडवेलच्या दिशेने पळाले. त्यांचा पाठलाग करत ६ रोजी रात्री दलसैनिकांनी हल्ला चढविला. काही काळ गोळीबार झाला व दलाच्या सैनिकांनी चौकी काबिज केली. ८० सैनिक शरण आले. या आनंदात भर घालणारी आणखी एक बातमी कळली. फिदाल्गो, फाल्काव, पेगादो व उरलेले सैनिक भारतीय पोलिसांना शरण आले. १५ ऑगस्ट १९५४ रोजी त्रिश्तांव ब्रागांस द कुन्य यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. केवळ ३५ स्वातंत्र्यसैनिकांनी तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने १५० हून अधिक, आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या प्रशिक्षित सैन्याला पिटाळून लावले, त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याला व धैर्याला स्वतंत्र गोमंतकाचा सलाम. (क्रमश :)
(संदर्भ : स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, खंड- २, भाग- १, पृष्ठ- ५३ ते ७१)