कव्हर स्टोरी जोड


18th May 2019, 11:22 am
कव्हर स्टोरी जोड

गटांगळ्या खाल्ल्या, पण पोहायला शिकलो
-
दोन वर्षांपूर्वी सालाबादाप्रमाणे मे महिन्याची सुट्टी लागली, मनात पूर्वीपासूनच घोळत होतं की या सुट्टीत तरी पोहायला शिकायचंच. बाकीच्या मोकळ्यावेळी असे विचार येणे कमीच किंबहुना नाहीच, पण अभ्यासाला बसलं की हे असे विचार हमखास येतातच, पोहायला जायचा, एरव्ही न दिसणारी पण, परीक्षेच्या दिवसांनी येता जाता खुणावणारी व्यायामशाळा, फुलबागेतील मोकळी जागाही नेमकी परीक्षेच्याच दिवसांनी नजरेस पडते. आजूबाजूच्या मुलांना गोळा करून बॅटमिंटन, क्रिकेट हेही नेमके याच परीक्षेच्या दिवसांनी खेळायचे सुचते. पुस्तक एरव्ही रोज कपाट उघडताना दृष्टीसही येत नाहीत, पण अभ्यासाच्या मधेमध्ये एक- एक परिच्छेद वाचायचा मोह काही केल्या सुटत नाही.
मलाच न्यूनगंड वाटायचा, लहान पोरंसुद्धा अगदी सफाईने न डगमगता पाण्यात उंचावरून उड्या टाकून पोहतात, पण आपल्याला येत नाही. पोहण्याचे अनेक फायदे आहेतच ते जाणून होतोच म्हणून त्यावर्षी अगदी मनाशी दृढ निश्चय केला. काहीही झाले तरी पोहायला शिकायचेच. त्या दृष्टीने मी बालमित्राला विचारले, जो सफाईने पोहायचा. त्याने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला, पण पूर्वकल्पना देताना म्हणाला की या वयात जमेल ना? ते लहानपणीच शिकल्यास अधिक चांगले असते. या सर्व गोष्टी व्यावहारिक दृष्टीने जरी बरोबर असल्या तरी मला आतून उर्मी जागृत झाल्यामुळे वाटत होतं की प्रयत्न तर करू, पण पोहायला शिकूच.
दुपारचं ऊन कमी झाल्यावर आम्ही दोघे जाऊ लागलो. सुरवातीला भीती वाटलीच, पण मित्राच्या साहाय्याने अनेकदा पाणी पोटात गेल्यावर श्वासोच्श्वास योग्य न घेतल्याने अनेकदा गटांगळ्या खाऊन एका आठवड्यात अगदी सफाईने पोहू लागलो. मनाला भरपूर समाधान तर मिळाले, आत्मविश्वास वाढलाच, बरोबरच स्वतः स्वतःसाठीच एक मानक ठरवून घेतला आणि एक गोष्ट प्रत्ययास आली ती म्हणजे गुणेशु नच लिंगम नच वयां'. पोहण्याच्या आनंदाने यावर्षी सुद्धा सुट्टी पडल्या पडल्या जायचा व बरोबर इतर न येणाऱ्या मित्रांनाही न्यायचा निश्चय केला.
- ओंकार भावे
------
(photos)
-
निसर्गाचं रौद्र व मनोहारी रुप
-
नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा निरोपसमारंभात मी म्हणाले होते, आता मला वाचन, लेखन व प्रवास करायचा आहे. तशी मला प्रवासाची पूर्वीपासूनच आवड. भटकायला मोकळी होते मी आता. ऑक्टोबर २०१६ ला आम्ही चार मैत्रिणी मिळून स्पितीला जायची टूम काढली. दहा दिवसांचा दौरा.
चंडिगढवरून स्पितीचा प्रवास सुरू झाला. पोचायला पूर्ण दोन दिवस लागतात. रस्ते अरूंद आणि वळणं तर जीवघेणी. समोरून वाहन आलं तर काय होईल, अशी सतत भीती. पण, पवन कौशल्याने गाडी चालवत होता. रामपूर तरंडा रस्त्यावर जबरदस्त बोगदा आहे. तिथे थांबून आम्ही फोटो काढले. स्पितीचा हा संपूर्ण प्रवास आम्हाला अशाच रस्त्यांवरून करायचा होता, काही वेळा अगदी जीव मुठीत घेऊन. कारण इथे कित्येकदा दरड कोसळून रस्ते बंद होतात.
मग रिकांगपिओ, कल्पा, काझाला थांबलो. दुसऱ्या दिवशी जगातील सर्वात उंच अशा कोमीक गावात गेलो. उंचावरील रस्ता आहे इथे. ऑक्सिजनची कमी जाणवते. त्यानंतर नाको. तेथील तलाव अतिशय सुंदर. फॉलचे सोनेरी रंग अप्रतिम दिसत होते. थंडी तर एवढी होती की बापरे बाप. नाकोवरून सकाळी निघालो काझाच्या दिशेने. साधारण दोनच्या आसपास पुढे वाहनांच्या रांगा दिसल्या. चौकशी करता समजलं की दरड कोसळल्याने पुढे जाता येणार नाही. एका बाजूला खोल दरी, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड कडा. मागून पुढून वाहनांच्या रांगा. त्यामुळे बाहेर जाऊन पाय मोकळे करणं, पण शक्य नव्हतं. रात्रीचे अकरा वाजले रस्ता मोकळा व्हायला. मग सरळ पुढे सरहानला निघालो. जेवण नाही, चहा नाही, काहीच नाही. कारण हिमाचलच्या त्या अरुंद रस्त्यांवर कुठेही चहाची साधी टपरीदेखील नाही. पहाटे सरहानला पोचलो. तिथल्या भीमाकाली मंदिराला भेट देऊन परतीच्या वाटेला लागलो.
हा संपूर्ण प्रवास वेगळाच अनुभव देणारा होता. सतत निसर्ग सोबत होता. त्याचं रौद्र आणि सुंदर अशी दोन्ही रुपं अनुभवायला मिळाली. स्पितीची ही भेट खरंच अविस्मरणीय अशी.
- सुनेत्रा जोग
------

-------------------------------
ती पावसाळी रात्र
-
स्वर्गीय लेणे घेऊन अवतरलेला कोकण सागर किनारा. हिरवी गर्द झाडी, लाल माती, गर्जत येणारा दर्या, रुपेरी वाळू .... जणू आपल्याला साद घालीत आहे. दुतर्फा आकाशाला गुदगुल्या करणारे उंच माड, अथांग पसरलेली नारळ-पोफळीची दाट झाडी, त्यातून डोकावणारी कौलारु घरे, प्राचीन मंदिरे.... गुहागर. वाळकेश्वर दीपगृहाचा प्रकाशझोत, शांत सागर लहरी हे जादुई वातावरण अनुभवताना कवीवर्य पाडगावकरांच्या ओळी स्मरतात, ‘अबोध शांती, हलके ठिबक केशर कांती, लहरी चुंबित शांत वारा शांत किनारा...’ खरेच ओंकाराचे शांत ध्यान लागते. रहिवाशांचा प्रेमळ स्वभाव, साधेपणा मनाला भावून गेला.
असेच एकदा उन्हाळ्याची सुठ्टी संपता संपता जूनमध्ये गणपती पुळेला निघालो होतो. आम्ही तिघे व यांचा मित्र. रात्रीची वेळ, भयाण अंधकार, धो धो पाऊस. पावसामुळे गाडी पुढे सरकत नव्हती. त्यात कडक पोलिस बंदोबस्त. सागरी मार्गाने अतिरेकी येतील, अशी सूचना मिळाली होती. अखेरीस पोलिसांनीच आम्हाला गणपती पुळेच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहचवले. लाईट नव्हते. बाहेर पाऊस. खूप भीती वाटत होती. कसेतरी झोपलो. सकाळी गणपतीचे दर्शन घेऊन लगेच निघालो. वाटेत धबधबे, घाट रस्ता, समुद्र. पाऊस कोसळतच होता.
अचानक गाडी थांबली. नदीला पूर आल्यामुळे गाडी पुढे जाणार नव्हती. महाडला दोन दिवस लाॅजवर काढावे लागले. आम्ही कोकणात नवीन, पण यांच्या मित्राला माहीत होते. नंतर पूर ओसरला. गोव्याला जायचा बेत होता. पण, पावसाने त्यावर पाणी फेरले. आजही कधी कोकणात जातो, तेव्हा त्या आठवणी जाग्या होतात.
- नीता कुमठेकर