हे देवा उमेदवारा....

काहीबाही

Story: विस्मय विघ्नसंतोषी |
18th May 2019, 11:21 am


--
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा तोंडाच्या, बारा तत्त्वांच्या, बारा विचारांच्या, बारा पक्षांच्या देवा उमेदवारा...
होय उमेदवारा.....
हे देवा भाजपा, काँग्रेसा... शिवसेना, जनता दला... देवा बसपा, आपा.... पंचवार्षिक पद्धतीने आम्ही आमच्या कुवतीनुसार, सोशल मीडियावर आपल्या सर्व उमेदवारांची सेवा केलेली आहे. तुमची बाजू घेऊन भांडलेलो आहे. नाती बिघडवून घेतली आहेत. मित्रांना शत्रू केले आहे. फेसबूक, ट्विटरवर बोगस बातम्या शेअर केल्या आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला जो कोणी शिव्या देईल, त्याला भक्त, पिगी, गोमूत्र पिऊ, पप्पू, फेकू, डायन म्हटले आहे. तेव्हा माझी अडचण समजून घेरे उमदेवारा....
होय उमेदवारा....
हे देवा उमेदवारा, माझ्यावर, माझ्या घरावर, मुलाबाळांवर, मालमत्तेवर, धंद्यावर, आमच्या चांगल्या, वाईट कर्मावर लक्ष ठेवून राखण कर रे देवा उमेदवारा...
होय उमेदवारा.....
हे देवा उमेदवारा, माझी कंत्राटे, फायली वगैरे सुरळीत पास होऊ दे आणि जी काय इडापिडा, वाकडे-नाकडे आहे ते दूर होऊन बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे. मग मी जो काही सूर-रोट, विडा ठेवायचा असेल तो ठेवीन रे देवा उमेदवारा....
होय उमेदवारा...
देवा उमेदवारा, आमच्या वाड्यावर चौघांची लग्ने आहेत. काहींचे वाढदिवस. त्यांना ते साजरे करण्यासाठी देणगी दे. सर्वांच्या कामाधंद्यांना यश दे, मुलांना शाळेत अ‍ॅडमिशन मिळू दे. वीज, पाणी बिले भरून दे. सरकारी नोकरी शोधत आहेत, त्यांना ती तुझ्या कृपेने मिळू दे रे देवा उमेदवारा...
होय, उमेदवारा.....
हे देवा उमेदवारा, जे कोण सोशल मीडियावर तुझी बाजू घेऊन लढले, भांडले, त्यांना सरकारी कंत्राटे मिळू देत. गेल्या वेळी मिळाली आहेत, त्यांना यावेळी दुप्पट मिळू देत. त्यांची मुले, बायका नोकरी शोधत आहेत, तर त्यांना नोकऱ्या मिळू देत. मिळालेल्या आहेत, त्यांना बढती मिळू दे. ज्यांना महामंडळे, अकादम्या मिळायच्या आहेत, त्यांना त्या निर्विघ्नपणे मिळू देत रे, देवा उमेदवारा....
होय, उमेदवारा...
हे देवा उमेदवारा, गेल्या वेळी तू आम्हाला मतामागे पाच हजार दिलेस. यंदा सहा हजार. जास्त द्यायला हवे होते, पण, कसलीही आशा चांगली नव्हे. मात्र, माझ्या कामांचे तेवढे बघ. १५ टक्केची दक्षिणा तुला न विसरता दरवेळी देईन रे देवा उमेदवारा....
होय, उमेदवारा....
हे देवा उमेदवारा, आमच्या राज्याच्या, देशाच्या अनेक समस्या आहेत. पण, त्या सुटल्या तर आपले आणि आमचेही दुकान बंद होईल. तेव्हा त्या तशाच राहू दे. तुझी कृपादृष्टी सर्वांवर अशीच ठेव. माझ्यावर जरा जास्तच. कारण सोशल मीडियावर मी चार मित्रांसह ट्रोलर बनून पक्षाची सेवा केली. पण, हातात एक पैसाही पडला नाही. गेल्या प्रचारावेळी ओ. सी. सी. सी (आॅफिसर चाॅइस, चिकन चिली) दिली म्हणून खाल्ल्या मिठाला जागून काम केले. यंदाही काही तरी दे रे देवा उमेदवारा....
होय, उमेदवारा....
हे देवा उमेदवारा, जात, धर्माचे फॅड जास्तीत जास्त वाढू दे. म्हणजे पक्षाला चांगले दिवस येतील. तत्त्वे, निष्ठा ठेवून काही फायदा नाही. संधीचा फायदा घ्यायला हवा. शेवटी पैसा महत्त्वाचा. आपल्या कृपेने माझ्या नातेवाईकांना नोकरी, व्यवसाय मिळाला. ते करोडपती झाले आहेत. आम्ही दोघा मित्रांनी एका मंत्र्याला भागीदार घेऊन कंपनी काढली आहे. तिची भरभराट होऊ दे. माझे मित्र चार आण्याची विकासकामे करून पाचशे रुपये खर्च दाखवता... असे लोणी खाल्ल्याशिवाय पाच वर्षांत श्रीमंत होता येत नाही रे देवा उमेदवारा...
होय, उमेदवारा...
हे देवा उमेदवारा, गोव्यात गेल्या अनेक वर्षांत गैरव्यवहार वाढला आहे, त्याने लोकांना काहीही फरक पडलेला नाही. कॅसिनो हाकलणाऱ्यांनी नवे बिग डॅडी आणले आहेत. जागोजागी ड्रग्सचे तांडव व वेश्यांचे मांडव... जमिनींचे रुपांतर होत आहे. गोंय, गोंयकारपण आटत आहे. सोबत गोंयकारही. गोवा कोणी नेणार नाही, तो आपोआप नष्ट होणार, असे पोर्तुगीज पाद्र्याने म्हटले होते. आम्हाला काय, आमचे पोट भरले की झाले. देवा उमेदवारा, आता २३ मे रोजी तुमचा उत्सव आहे. यंदा केलेली सेवा गोड मानून घे आणि आम्हा पामरांवर सदैव लक्ष ठेव आणि बरं कर, देवा उमेदवारा...
होय उमेदवारा....