सशयितांविरुद्ध आरोप निश्चित करा

न्यायालयाचा आदेश : रेस्टॉरंटला आग लावल्याचे प्रकरण


15th May 2019, 06:15 pm

---------------------------------------
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव :
शेळी-लोलये काणकोण येथील फिशलँड रेस्टॉरंटला आग लावून नुकसान केल्या प्रकरणी ज्युस्तिन फर्नांडिस याच्याविरुद्ध येत्या ६ जून रोजी आरोप निश्चित करण्याचा आदेश येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे. सरकारी पक्षातर्फे वकील सुभाष देसाई युक्तिवाद करीत आहेत.
काणकोण पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार ६ मे २०१७ रोजी सकाळी ९.४० वाजता शेळी-लोलये येथील फिशलँड रेस्टॉरंटला आग लागल्याने रेस्टॉरंट पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. हॉटेलच्या कामगारांना वेतन देण्यासाठी आणून ठेवलेली रोख रक्कम ४.९० लाख रुपये आगीत खाक झाले होते. ५ मोबाईल्स फोन, दोन ओनिडा टीव्ही, ६ फ्रिज, दोन जनरेटर, तीन मिक्सर, दोन ग्राईंडर व इतर वस्तू मिळून मालकाचे १६ लाखांचे नुकसान झाले होते. त्यावेळी फिशलँड रेस्टॉरंटचे मालक मिलाग्रीस कॉर्त यांनी ज्युस्तिन फर्नांडीस याने रेस्टॉरंटला आग लावल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
प्रतिवादीच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज सादर करून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने ही सुनावणी बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती. या अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी जोरदार विरोध केला. या खटल्यात एकूण ९ साक्षीदार असून त्यात वरील संशयित लायटर पेटवून रेस्टॉरंटला आग लावताना पाहणारे प्रत्यक्ष साक्षीदार ही आहेत. या आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून राख झालेल्या सर्व वस्तूंची सविस्तर माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. त्यामुळे भा.दं.सं.च्या ४३६ कलमान्वये (मानवी वास्तव्य असलेल्या इमारतीला आग लावून नुकसान करण्याची आगळीक करणे) खाली आरोप निश्चित करण्याइतके सबळ पुरावे सरकारी पक्षाकडे असल्याने आरोपीचा अर्ज फेटाळून लावून आरोप निश्चित करण्यात यावे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी मान्य करून येत्या ६ जून रोजी आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
---------------------------------------------------------------------