भारतीय हॉकी संघाचे राणी रामपालकडे नेतृत्व


10th May 2019, 03:46 pm

नवी दिल्ली :हॉकी इंडियाने २० मे पासून कोरियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी शुक्रवारी १८ सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली आहे. राणी रामपालकडे या संघाची कमान देण्यात आली आहे.
प्रमुख प्रशिक्षक सोर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघात सविता उपकर्णधार असणार आहे. राणी दुखापतीमुळे मलेशिया दौऱ्याला मुकली होती. हे सामने जपानच्या हिरोशिमामध्ये १५ ते २३ जून दरम्यान चालणाऱ्या एफआयएच म​हिला सीरिज फायनल्सच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ स्पेन व आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. भारताने दोन सामने जिंकले तर तीन ड्रॉ खेळले होते व एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय भारताने मलेशियाचा दौराही केला होता व तेथे ४-०ने विजय मिळवला होता.
सविता व रजनी इतिमारपू यांच्याकडे कोरिया दौऱ्यात गोलरक्षणाची जबाबदारी असणार आहे तर दुखापतीमुळे मलेशिया दौऱ्याला मुकलेली गुरजीत कौर पुनरागमन करणार आहे. प्रशिक्षक मारिनश यांनी सांगितले, राणी व गुरजीतसारख्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे मी आनंदी आहे. या दोघी ही मालिका खेळण्यास पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. एफआयएच महिला सीरिज फायनल्स हिरोशिमा २०१९च्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे.
भारतीय संघ याप्रमाणे : गोलरक्षक : सविता, रजनी इतिमारपू. बचावपटू : सलीमा टेटे, सुनीता लकडा, दीप ग्रेस एक्का, करिश्मा यादव, गुरजीत कौर, सुशीला चानू पुखराम्बाम. मध्यरक्षक : मोनिका, नवजौत कौर, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंज. आघाडीपटू : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, ज्योति व नवनीत कौर.