नेमबाजी ​विश्वचषकात शिराजची शानदार सुरुवात


10th May 2019, 03:45 pm

नवी दिल्ली : भारताच्या शिराज शेखने कोरियाच्या चांगवानमध्ये चालू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केली. त्याने पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत ५० पैकी पूर्ण ५० स्कोअर केला.
८४ खेळाडूंमध्ये शिराज कुवैत, अर्जेंटिना आणि नॉर्वेच्या इतर नेमबाजांसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. या स्पर्धेत इतर भारतीय मेराज अहमद खानने ४९ चा स्कोअर केला व सातव्या स्थानावर राहिला तर तब्येत खराब झाल्यामुळे अंगद बाजवा स्पर्धेतून बाजूला झाला. अजून पुरुषांच्या स्कीटमध्ये क्वालिफिकेशनच्या तीन फेऱ्या बाकी आहेत व यानंतर सहा अंतिम खेळाडूंचा निर्णय होईल. शिराज व मेराज २०२० टोकिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
तत्पूर्वी महिलांच्या स्कीटमध्ये युवा गनेमत शेखोने क्वालिफिकेशन फेरीत १२५ पैकी ११५चा स्कोअर केला व २१व्या स्थानावर राहिली. चंदीगढच्या या नेमबाजाने गेल्या वर्षी सिडनीत ज्युनिअर विश्वचषकात कांस्य पदक पटकावले होते. आपल्या प​हिल्या सिनियर आयएसएसएफ फायनलमध्ये तिने ७५ पैकी ७२चा स्कोअर नोंदवत चांगली सुरुवात केली होती मात्र २१व्या व २२व्या फेरीत ती पिछाडीवर पडली. सहावे अंतिम स्थान अमेरिकेच्या किम्बर्ली रोडला मिळाले. तिने ११९चा स्कोअर नोंदवला व सलग तिसऱ्या वर्षी विश्वचषकात सुवर्ण पटकावले. या स्पर्धेतील दोन ऑलिम्पिक कोटा इटलीच्या हिश्श्यात गेले. यातील एक कोटा माजी ऑलिम्पिक चॅम्पियन डायना बाकोसीला मिळाले.