समांतर अर्थव्यवस्थेचा पणजीवर कब्जा

अनैतिक व्यवसायांचा पाया इतर शहरांप्रमाणे पणजीतही होता. आता उण्यापुऱ्या साठ वर्षात त्याच बीजाचा विषवृक्ष झालेला आहे. करचुकवेपणा व करबुडवेपणामुळे पणजीत दरवर्षी सरासरी पाचशे कोटी रूपयांचा सरकारी महसूल वसूल होत नाही. ह्यातील महानगरपालिकेचा हिस्सा तब्बल वार्षिक दीडशे कोटी रूपयांचा आहे.

Story: नंदनवन | डॉ. नंदकुमार कामत | 09th May 2019, 05:14 Hrs

गोव्यातील ‘पॅरलॅल इकोनॉमी’ म्हणजे समांतर अर्थव्यवस्था हा माझा सखोल अभ्यासाचा विषय आहे. वैध मार्गाने राज्यात निर्माण होणारे उत्पन्न राष्ट्रीय परिमाणानुसार योजना व सांख्यिकी विभाग ‘नेट व ग्रॉस स्टेट डोमेस्टीक प्रॉडक्ट’ घरात आहे. पण तेवढ्यावरून राज्याची सुबत्ता दिसून येत नाही. लोकांच्या हाती खेळणारा वा उधळला जाणारा पैसा पांढराही असतो व काळाही असतो. काळा पैसा बेहिशेबी व्यवसाय, उपक्रम, धंदे, उपद््व्यापातून तयार होतो. आयकर खात्याचे हात तिथे पोहोचत नाहीत. वाढत्या नागरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे समांतर अर्थव्यवस्थेची चिक्कार भरभराट.
शहर व उपनगरात ‘भाईगिरी’ वाढू लागली की ते या अर्थव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण समजावे. पोर्तुगीजकालातही पणजीत समांतर अर्थव्यवस्था होती. स्मगलिंग हा शब्द संपूर्ण २० व्या शतकात गोमंतकीयांच्या पचनी पडलेला होता. पणजीत किती प्रतिष्ठित स्मगलर्स आहेत व ते कसे गब्बर झाले याच्या कहाण्या अजून ऐकायला मिळतात. अनैतिक व्यवसायांचा पाया इतर शहरांप्रमाणे पणजीतही होता. आता उण्यापुऱ्या साठ वर्षात त्याच बीजाचा विषवृक्ष झालेला आहे. करचुकवेपणा व करबुडवेपणामुळे पणजीत दरवर्षी सरासरी पाचशे कोटी रूपयांचा सरकारी महसूल वसूल होत नाही. ह्यातील महानगरपालिकेचा हिस्सा तब्बल वार्षिक दीडशे कोटी रूपयांचा आहे.
शेकडो आस्थापनांतून ग्राहकांकडून जीएसटी वसुली केली जाते पण कायद्याप्रमाणे तपशीलवार छापील बिले दिली जात नाहीत. शेकडो आस्थापनांची वार्षिक उलाढाल वार्षिक वीस लाखांहून, काहींची ५० लाखांहून अधिक असताना त्यांना जीएसटी कलम लावले जात नाही. महानगरपालिकेचे अंदाजपत्रक अजुनही महसूल, खर्च धरून वार्षिक ४० कोटी रूपयांची सीमा ओलांडू शकलेले नाही, याचे कारण करबुडवेपणामुळे समांतर अर्थव्यवस्थेकडे वळविला जाणारा पैसा. वार्षिक दीडशे कोटी रूपये. ज्या शहरातील नागरिकांचे सरासरी दरडोई उत्पन्न अडीच लाख रूपयांवर आहे, तिथल्या महानगरपालिकेचा महसूल अजून १० ते १५ कोटी रूपये एवढा नगण्य कसा असू शकतो हे कोडे जो उलगडेल त्याला पणजीवर सत्ता गाजविणाऱ्यांचे रहस्य समजू शकेल. अनैतिक व्यवसायातून पणजीत प्रचंड संपत्तीची निर्मिती होत आहे. या व्यवसायातील व्यक्ती आमच्या तुमच्यासारख्यांच्या वाटेला जाणार नाहीत. पणजीतील समांतर अर्थव्यवस्था या विषयावर वेगवेगळे खंड लिहिता येतील. सध्या सर्वत्र चलती आहे, पणजीत फोफावलेल्या वेश्याव्यवसायाची. यात किमान पाचशे व्यक्ती पूर्ण वेळ गुंतलेल्या आहेत. कदंब बसस्थानक ते मिरामार असा संध्याकाळी मांडवी नदीच्या किनाऱ्यावरून फेरफटका मारला तर किमान अर्धा डझन दलाल भेटतील. त्यांच्याकडे सर्व तऱ्हेच्या स्त्री, पुरुष, तृतीयपंथी वेश्या व दरपत्रक उपलब्ध असते. पणजी पोलिस स्थानकाच्या अर्धा कि.मी. परिघात दलालांची सर्वाधिक गर्दी आहे. तंग, तोकड्या कपड्यात वेश्या जवळपास बसलेल्या असतात. त्यांना कुणी, काही, कधी विचारल्याचे दिसत नाही. एस्कॉर्ट म्हणजे भाडोत्री स्त्रीचे भाडे देऊन संभावितपणे मौजमजा करणे गुगलवर पणजी एस्कॉर्ट शोधल्यावर ८० हजार लींक्स मिळतील. पणजी डेटींग वर १ लाख ३४ हजार लिंक्स आहेत. असंतुष्ट स्त्रियांची कामतृप्ती करणारे ‘गिगोलो ’ शोधले तर ९३०० लिंक्स आहेत, एवढेच नव्हे तर पणजीत अशा पुरुष वेश्यांचा ‘गिगोलो क्लब’ देखील आहे. सर्व लैंगिकदृष्ट्या सक्षम वयाच्या पणजी ‘कॉल गर्ल्स’ संबंधित २ लाख ६३ हजार लिंक्स आहेत. सुंदर रशियन स्त्रियांना भेटा म्हणून जाहिराती आहेत. नेत्रदीपक थाई वेश्या उपलब्ध म्हणून पणजी शहराची कामुकतेची राजधानी म्हणून प्रसिद्ध करणाऱ्या जाहिराती आहेत. उगीचच ५० लाख पर्यटक पणजीत पाऊल ठेवत नाहीत. समांतर अर्थव्यवस्था त्यांच्या स्वागताला उभी आहे.
चालू द्या तुमच्या चर्चा, वाद, राजकारण, निवडणुका. ही अर्थव्यवस्था परस्पर संमतीने पैसा कमावते. फक्त नोंदणीसाठी काही धाडी टाकल्या जातात. पण ते असते हिमनगाचे एक बारीकसे टोक. काळ्या काचांच्या किमान पाचशे आलिशान गाड्या वेश्याव्यसायासाठी दिवसरात्र पणजी व परिसरात बिनधास्त वापरल्या जातात. आत गिऱ्हाईकांसाठी सगळी ‘सोय’ असते. ‘कार सेक्स’ हा राजधानीला लागलेला महाभयंकर कलंक आहे, पण या सर्वामुळे कुणाचेही हिंदुत्व, धार्मिकता कधी दुखावलेली दिसलेली नाही. दुसरा मोठा अनैतिक व्यवसाय आहे गांजा, अफु, मारियुना, चरस, हशीश, भांग या सर्व पदार्थांची प्रचंड उलाढाल पणजी व पंचक्रोशीत होते व यात अनेक अनुभवी प्रशिक्षित व कडव्या गुंडांचा सहभाग आहे. पणजीत किमान पाच सहा टोळ्या व दीड दोनशे व्यक्ती या व्यवहारात गुंतल्याचा संशय आहे. रशियन माफीयाने पणजीत कोकेन विक्री सुरु केल्यापासून पणजी युरोपच्या नकाशावर आली. या कोकेन माफियाची पाळेमुळे खणून काढणे फार जोखमीचे आहे. त्यात पोलिसांचे मुडदे पडू शकतील.
पणजीतील सर्व तऱ्हेच्या जुगारावर किमात पाच हजार लोकांचा चरितार्थ चालतो. त्यात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असलेले सहाशे मटका एजंट्स आहेत. पणजी पोलिस स्थानक ते मार्केट परिसरात मटका बेटस घेणारे पन्नास एजंटस आहेत. काँप्युटर गेम्स, इलेक्ट्रॉनिक गेम्सवर दुकानांच्या आडोश्याआड जुगार चालतो. पत्यांचा जुगार तर भरदिवसा दिसतो. क्रिकेट, फुटबॉलवर बेटींग घेणाऱ्या टोळ्या आहेत. विदेशी चलन बेकायदेशीरपणे बदलून देणाऱ्यांच्या टोळ्या आहेत. भेसळयुक्त पेट्रोल, सराईत भुरटे चोर आहेत, पर्यटकांना लुबाडणाऱ्या पंधरा-वीस टोळ्या आहेत. गंमत अशी आहे की महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा कसल्याही निवडणुकीत पणजीतील भरभराटीला आलेल्या समांतर अर्थव्यवस्थेचा उल्लेख होत नाही. कारण शेवटी सगळ्याच राजकीय पक्षांचे नीतीशून्य, स्वार्थी, ढोंगी राजकारण या संभावितांच्या खांद्यावरच उभे आहे.       

Related news

राजकारणातील ‘तळमळ’!

कोणत्याही व कोणाच्याही भ्रष्टाचाराची चौकशी व्हायलाच हवी. मात्र असे करताना ‘आपलेच दात, आपलेच ओठ’ अशी स्थिती उद्भवणार नाही, याची खबरदारी मंत्र्यांना घ्यावी लागेल. Read more

दावण सुटलेले मंत्री

मिळालेल्या पदाचा आणि संधीचा राज्याच्या व्यापक कल्याणासाठी कसा वापर करावा याचा ताण घेण्याऐवजी सारी सत्ता स्वकल्याणाभोवती कशी फिरवत ठेवावी याचे धडे घालून देणाऱ्या राजकारण्यांचा जमाना आता आला आहे. Read more

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी

भाजपसेना युतीबद्दल आता कोणताही पण-परंतु राहिलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ अधिक एकोप्याने उर्वरित काळात काम करेल. विधानसभा निवडणुकीचे महायुतीतील जागावाटप झाल्यातच जमा आहे. कारण भाजपसेनेचे त्याबाबतीत लोकसभा निवडणुकीपूर्वीच मतैक्य झाले आहे. Read more

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more