महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी

भाजपसेना युतीबद्दल आता कोणताही पण-परंतु राहिलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ अधिक एकोप्याने उर्वरित काळात काम करेल. विधानसभा निवडणुकीचे महायुतीतील जागावाटप झाल्यातच जमा आहे. कारण भाजपसेनेचे त्याबाबतीत लोकसभा निवडणुकीपूर्वीच मतैक्य झाले आहे.

Story: अक्षांश रेखांश | लक्ष्मण जोशी |
08th May 2019, 05:09 am

लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांची चार टप्प्यात झालेली निवडणूक आटोपली असली व आता २३ मेच्या निकालांची प्रतीक्षा असली तरी राज्यातील सत्तारुढ व विरोधी आघाड्यांनी उसंत न घेता येत्या सप्टेबर आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान आटोपताच दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त परिसराला दिलेली भेट आणि दुष्काळाच्या संदर्भात आचारसंहिता शिथिल करण्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविलेले पत्र या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय ठरते. महायुतीच्या पाच वर्षांच्या कारभाराबरोबरच दुष्काळ हाही या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहण्याची शक्यताही त्यातून दिसून येते.आजच्या घडीला राज्यात महायुतीचे सरकार भक्कम स्थितीत उभे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर या सरकारमध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य बदलाबाबत आताच काही सांगता येणार नसले तरी राजकीय शक्तींची फेरमांडणी अपरिहार्य दिसते व ती मुख्यत: लोकसभा निकालावरच अवलंबून असणार आहे. मात्र तिची प्रक्रिया निवडणूक काळातच सुरु झाली आहे. त्यातील लक्षणीय घटना म्हणजे भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला पाडलेले भगदाड. साखर कारखाने परिसरातील मोहिते पाटील, विखे पाटील, नाईक निंबळकर या मातब्बर राजकीय घराणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपात आली आहेत. दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अद्याप भाजपात रीतसर आले नसले तरी भाजप उमेदवार असलेल्या त्यांच्या सुपुत्रासाठी त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडले आणि भाजपचा प्रचारही केला. त्यामुळे मुळात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचेच समीकरण बदलले आहे. विखे पाटलांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच ते विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगतील. त्या स्थितीत काँग्रेसची काय भूमिका राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
माझे तर असे मत आहे की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मार खाल्ला तर तिच्या वेगळ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहील. कारण महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यात राष्ट्रवादीला दुर्बिणीतूनच शोधावे लागते. तेथे जर तिला धक्का बसला तर ती पुन्हा उभी राहणे कठिण राहील. अर्थात ते लोकसभा निकालांनंतरच कळेल. महायुतीमध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काय बदल होऊ शकतात हेही सांगता आज येणार नाही. मात्र एक बाब निश्चित की, निकालांनंतर फडणवीस सरकार अधिक मजबूत बनू शकेल व त्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपरिहार्य आहे. एक बाब तर स्पष्टच आहे की, भाजपसेना युतीबद्दल आता कोणताही पण-परंतु राहिलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ अधिक एकोप्याने उर्वरित काळात काम करेल. विधानसभा निवडणुकीचे महायुतीतील जागावाटप झाल्यातच जमा आहे. कारण भाजपसेनेचे त्याबाबतीत लोकसभा निवडणुकीपूर्वीच मतैक्य झाले आहे. इतर मित्र पक्षांना दिलेल्या जागा वगळता उर्वरित जागा भाजप सेनेने सारख्या प्रमाणात लढाव्यात असे ते सूत्र आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत मात्र अद्याप शंभर टक्के स्पष्टता नाही. पण युतीमधील प्रस्थापित सूत्र असे आहे की, ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. त्यात मित्रपक्षांच्या भूमिकेचा कुठेही उल्लेख नाही. पण भविष्यात तो मुद्दा येणारच नाही असे नाही.
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील वैशिष्ट्य म्हणजे सत्तारुढ भाजप सेना रिपब्लिकन पार्टी,रासप, शिवसंग्राम आदी पक्षांच्या महायुतीने ही निवडणूक जशी सामूहिक नेतृत्वाच्या बळावर लढविली तशी ती काँग्रेस राष्ट्रवादीला लढविता आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रामदास जानकर, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हे खांद्याला खांदा भिडवून हिरिरीने प्रचार करीत होते. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मात्र तसे चित्र अजिबात दिसत नव्हते. काँग्रेसची तर या निवडणुकीत खूपच फरफट झाली. तो पक्ष शरद पवारांनी अक्षरश: खिशात घातला होता. अगदी जागावाटपापासून तर काँग्रेसच्या तिकिटवाटपावरही शरद पवारांचाच वरचष्मा होता. प्रचाराची धुरा तर शरद पवार आणि आघाडीशी संबंध नसलेले आणि काँग्रेसने नाकारलेले राज ठाकरे यांनीच सांभाळली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण व काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मल्लिकार्जुन खरगे कुठे दिसतही नव्हते. मतदान आटोपल्याबद्दल जशी इतरत्र निकालांबद्दल गणिते मांडली जातात तशीच महाराष्ट्रातही मांडली जात आहेत. त्यांचा कानोसा घेतला तर महायुतीला ४८ पैकी किमान ३६ जागा व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला जास्तीतजास्त दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाहू या घोडामैदान आता फार दूर नाही.