मनू भाकर, सौरभ चौधरीला सुवर्ण

आयआयएसएफ विश्वचषक; मिश्र सांघिक प्रकारात मिळाले यश


25th April 2019, 03:40 pm
मनू भाकर, सौरभ चौधरीला सुवर्ण

बीजिंग :येथे चालू असलेल्या आयआयएसएफ विश्वचषकात (रायफल/ पिस्तुल) भारताचे स्टार नेमबाज सौरभ चौधरी व मनू भाकर यांनी सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. या दोघांनी १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. भारतीय जाेडीने चीनच्या यांग रेंक्सिन व पांग वेई या जोडीचा १६-६ने पराभव केला.
मनू व सौरभसोबतच अंजूम मोदगिल व दिव्यांश पवार या जाेडीनेही सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. नेमबाजी विश्वचषकात भारताला पहिले सुवर्ण अंजूम व दिव्यांश पवार यांनी मिळवून दिले. यानंतर १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात मनू भाकर व सौरभ चौधरी यांनी सुवर्ण पटकावले.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या हाती निराशा लागली होती. भारतातर्फे सर्वात चांगले प्रदर्शन महिला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात यशस्वीनी सिंग देसवालने केले होते. तिने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर ५७७ गुणांची कमाई केली होती, तर पात्र ठरण्यासाठी ५७८ गुणांची गरज होती. या प्रदर्शनामुळे ती १०व्या स्थानावर राहिली. तिच्या व्य​तिरिक्त मनू भाकर व हिना सिद्धूने अनुक्रमे ५७५ व ५७२ गुणांची कमाई केली होती. या दोघी अनुक्रमे १७व्या व २६व्या स्थानावर होते.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या क्वालिफाईंगमध्ये भारताच्या चैन सिंगने ​निराश केले व ११६५ गुणांसह तो २७व्या स्थानावर राहिला. पारूरही विशेष प्रदर्शन करू शकला नाही व ११६४ गुणांसह ३३व्या स्थानावर राहिला. वरिष्ठ नेमबाज संजीव राजपूतनेही निराशाजनक काम​गिरी केली व केवळ ११४५ गुण तो मिळवू शकला व ५८व्या स्थानावर राहिला.