सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत दाखल


25th April 2019, 03:39 pm
सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत दाखल

हान :भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल व पुरुषांमध्ये समीर वर्माने गुरुवारी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीमध्ये मात्र भारताला निराशा हातील लागली आहे. रिओ ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेता सिंधूने महिलांच्या एकेरीत दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या चोईरुनिसियाचा २१-१५, २१-१९ने पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या काई यानयानशी होणार आहे. तिने हाँगकाँगच्या यिप पुई यिनचा २१-९, २१-१५ने पराभव केला होता. पुरुषांच्या एकेरी गटात दुसऱ्या फेरीतील सामन्यात समीर वर्माने हाँगकाँगच्या लोंग अंगुसचा २१-१२, २१-१९ने पराभव केला. सायना नेहवालने दक्षिण कोरियाच्या किम गा इनचा २१-१३, २१-१३ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
मिश्र दुहेरीत भारताचा उत्कर्ष अरोडा व करिश्मा वाडकर या जोडीला इंडोनेशियाच्या हाफिज फैझल व ग्लोरिया विडजाजा या जोडीने २१-१०, २१-१५ने पराभूत करत स्पर्धेबाहेर केले. याच गटात भारताच्या व्यंकट गौरव प्रसाद व जुही दिवांगन या जोडीलाही चीनच्या वांग यिलयू व यांग चिंग टून या जोडीने २१-१०, २१-९ने पराभूत केले.