चेन्नई - मुंबईत शुक्रवारी लढत


25th April 2019, 03:38 pm
चेन्नई - मुंबईत शुक्रवारी लढत

चेन्नई :चेन्नई सुपर किंग्जचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले असले तरी शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून आपले पहिले स्थान अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या या संघाने दोन सलग पराभवानंतर विजय विजय ​मिळवत पुनरागमन केले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने सलामीवीर शेन वॉट्सनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मंगळवारी रात्र सनरायझर्स हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला होता. आता यजमान संघ विजयाची लय मुंबईविरुद्धही कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे मुंबईचा संघ १० सामन्यांमध्ये १२ गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे व ते राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला सामना गमावून चेन्नईत पोहोचलेले आहेत. प्लेऑफमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी मुंबई कोणत्याही स्थितीत विजय ​मिळवण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नई सुपर किंग्जने वॉट्सनने मिळवलेल्या फॉर्मचे स्वागत केले आहे मात्र संघाला सुरेश रैना, अंबाती रायडू व केदार जाधव यांच्याकडून बाद फेरीपूर्वी चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. जाधवचे फॉर्ममध्ये परतणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण या स्पर्धेनंतर भारतीय संघ विश्वचषकासाठी निघणार आहे.
चेन्नईच्या विजयात गोलंदाजांनी अतापर्यंत मोठी भूमिका बजावली आहे. खास करून घरच्या संथ खेळपट्टीवर त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. आपल्या गोलंदाजीत सुधारणा करणारा दीपक चार येणाऱ्या सामन्यांमध्ये सुरुवातीला व अखेरच्या षटकांत आपल्या चतुर गाेलंदाजीने महत्त्वाच ठरू शकतो.
१६ गडी बाद करून स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर असणारा गोलंदाज इम्रान ताहीर सनरायझर्स हैदराबाद​विरुद्ध सामन्यात गडी बाद करण्यात यशस्वी झाला नव्हता, मात्र दक्षिण आफ्रिकेचा हा अनुभवी गोलंदाजासोबत मिळून रवींद्र जडेजा व हरभजन सिंग मुंबई इंडियन्सच्या बळकट फलंदाजीला लगाम घालू शकतात.
मुंबई इंडियन्सच्या अभियानात अनेक चढ उतार आले आहेत व त्यांना आता प्रत्येक सामन्यात आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करावे लागणार आहे. रोहित शर्माच्या रुपात संघाकडे एक चांगला कर्णधार आहे जो पुढे येऊन संघाने नेतृत्व करतो. याशिवाय त्यांच्याकडे मजबूत फलंदाज असून यात क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड व पांड्या बंधू हार्दिक व कृणाल आहेत. जसप्रीत बुमराह आणि कंपनीकडून चेन्नईच्या फलंदाजांना सावध रहावे लागेल. तीन वेळचे या दोन चॅम्पियन्समध्ये होणारा हा सामना निश्चितच रोमहर्षक होणार आहे.