मतदानाच्या विश्लेषणातील काही निष्कर्ष

गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. असह्य उकाड्यामुळे मतदान कमी होणार हे माझे भाकीत अचूक ठरले. त्याचप्रमाणे २३ मे रोजी तिन्ही पोटनिवडणुका व दोन लोकसभा मतदारसंघांत भाजपचा विजय होईल, हेही भाकीत अचूक ठरणार आहे.

Story: नंदनवन | डॉ. नंदकुमार कामत |
25th April 2019, 05:21 am

निवडणूक निकालाच्या दिवशी २३ मे रोजी राष्ट्रीय पातळीवर काही चमत्कार घडून येणार नाही हे याच स्तंभात मी लिहिले आहे. लोकसभेच्या दोन जागा व तीन पोटनिवडणुका(पणजीबद्दल नंतर लिहावे लागेल) यासंदर्भात अनेक पैजा लागल्या असल्या तरी गोवा हे एवढे छोटे राज्य आहे की इथे अतर्क्य असे काही नाही. वेगवेगळ्या वाहिन्यांवर ज्या उथळ पद्धतीने चर्चा चाललेली असते ती पाहिल्यावर हे सगळे अंदाज किती चुकीचे आहेत ते आजवरच्या निवडणुकांचा संख्याशास्त्रीय व वर्तवणूकशास्त्रीय अभ्यास केल्यावर समजूत येते. गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. असह्य उकाड्यामुळे मतदान कमी होणार हे माझे भाकीत अचूक ठरले. त्याचप्रमाणे २३ मे रोजी तिन्ही पोटनिवडणुका व दोन लोकसभा मतदारसंघांत भाजपचा विजय होईल, हेही भाकीत अचूक ठरणार आहे. पोटनिवडणुका पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष झाल्या. लोकसभा निवडणुका पक्षसापेक्ष झाल्या. तिथे लोकांनी सबळ, स्थिर सरकारचा आधी विचार केला. दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मिळून यावर्षी ११३५८११ मतदार होते. २०१४ साली ही संख्या होती १०६०७७७. म्हणजे पाच वर्षात ७५०३४ मतदार वाढले. २०१४ साली एकूण मतदान झाले ८१७४४० तर यंदा ८४८६३० म्हणजे पाच वर्षांत ७५०३४ मतदार वाढले.
उत्तर गोव्यातील २० विधानसभा मतदारसंघात मिळून २०१४ च्या तुलनेने फक्त १९५१६ मते वाढली. याचा अर्थ फार मोठ्या उत्साहाने विद्यमान खासदारांच्या पराभवासाठी काही कुणी घराबाहेर पडले नाही. दोन्ही मतदारसंघांत प्रमुख लढती आहेत भाजप व काँग्रेसमध्ये. त्यात गिरीश चोडणकर उत्तर गोवा मतदारसंघाला अपरिचित. राजकारणात चार दशके काढलेल्या रवी नाईकांना २०१४ साली १३१९०४ मते मिळाली होती. यावेळेला मतदान झाले ४२६४६१ म्हणजे काँग्रेसला स्पष्ट विजय मिळायला आधी १ लाख ७५ हजारांचा टप्पा पार करावा लागेल. २०१४ व २०१९ ची मतदानाची तुलनात्मक आकडेवारी दाखवते की भाजपचे सगळे गड शाबूत असतील.
आता तालुकानिहाय मतदान बघा. पेडण्यात ४१०६ जादा मतदान झाले. इथे मागच्यावेळी श्रीपाद यांनी २१५८५ ची आघाडी घेतली होती. ही जादा मते जरी सर्वच्या सर्व काँग्रेसला गेली तरी भाजपची आघाडी १७-१८ हजारांखाली येणे कठीण. डिचोलीत ३३२४ जादा मतदान झाले. इथे भाजपची आघाडी होती २५२०२. नूतन मुख्यमंत्री इथलेच तर मतदार त्यांच्याविरुद्ध का म्हणून जातील? म्हणजे वाढीव मते मिळूनही काँग्रेसला इथे भाजपची आघाडी २० हजारांपेक्षा कमी करणे अशक्य आहे. सगळे पत्रकार बार्देशमध्ये ‘चमत्कार’ म्हणजे भाजपविरोधी मतदानाची अपेक्षा बाळगून आहेत. गोवा फॉरवर्डच्या दोन मंत्र्यांनी निरुत्साह दाखविला तरी मागच्यावेळी इथे भाजपची असलेली ३३८६६ मतांची आघाडी किती कमी होणार? फारतर ती २० हजारांपर्यंत खाली येईल. इथेही काँग्रेसची धडगत नाही. इथे ७९८८ वाढीव मतदान झाले. ते सगळे भाजपविरोधी धरले तरी मोठा फरक पडत नाही. तिसवाडीत यावेळेस पूर्ण निरुत्साह दिसला. फक्त २५८१ मते वाढली. पण या तालुक्यातील पाच मतदारसंघांत मिळून भाजपला २०१४ साली घसघशीत १६८८८ मतांची आघाडी मिळाली होती. ती यावेळेला ५ ते ६ हजारांपर्यंत खाली येऊ शकते. पण खरी गंमत प्रियोळ मतदारसंघात दिसेल. इथे श्रीपाद नाईक यांनी विक्रमी १३००२ मतांची आघाडी घेतली होती. यावेळेस भाजपबरोबर अपक्ष, विद्यमान आमदार, मंत्री गोविंद गावडे होते. इथे गिरीश चोडणकरांपेक्षा जास्त परिचित रवी नाईकांना २०१४ साली फक्त ४१२७ मते मिळाली होती. यावेळेला दीपक ढवळीकरांच्या निष्ठावंत मतदारांनी पाठिंबा दिला तर ते जास्तीतजास्त ८००० पर्यंत जातील, पण श्रीपाद नाईकांची आघाडी ६-७ हजारांहून कमी होणे अशक्य. तालुकानिहाय मतदानाप्रमाणे भाजपला अपेक्षित मतदान झाले आहे. २३ मे रोजी असे चित्र दिसेल-भाजप २४०००६, काँग्रेस १ लाख ५५ हजार व इतर सर्व मिळून ३१४६१. श्रीपाद नाईकांना सहज ८५ हजारांची आघाडी मिळेल. २०२४ साली खासदारकीचा रौप्यमहोत्सव ते साजरा करू शकतील.
आता दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची स्थिती पाहू. तिथे विजयासाठी सार्दिनबाबना तिरंगी लढतीत किमान १ लाख ९० हजार मते मिळवावी लागतील. पण कुठून येणार ही मते? २०१४ पेक्षा यावेळेला फक्त ११६७४ मते वाढली. फोंडा तालुक्यात सावईकरांना १७९९३ चे मताधिक्य मिळाले होते. यंदा तिथे ४११७ जादा मतदान झाले. ढवळीकर, रवी, सार्दिन युतीमुळे ही सगळी मते भाजपविरोधात गेली व मडकईत कमी पाठिंबा मिळाला तरीही सावईकर तालुक्यात आघाडी घेतील. सासष्टीच्या मतदार याद्या पत्रकारांनी जरुर अभ्यासाव्यात. तिथे मोठ्या संख्येने आता नवगोमंतकीय हिंदू मतदार वाढलेत. सासष्टीमध्ये यंदा फक्त ६२२७ मते वाढली. त्यामुळे सावईकरांना काहीही फटका बसणार नाहीत. २०१४ मध्ये संपूर्ण सासष्टीमध्ये काँग्रेसने २८५६४ मतांची आघाडी घेतली होती. ती यावेळेस धक्कादायकपणे कमी होईल. मुरगावमध्ये फक्त १८५५ जादा मतदान झाले. इथे भाजपला ९५४९ मतांची आघाडी होती. यंदा ती १० हजारांवर जाईल. कारण दाभोळी मतदारसंघ. केपेत यावेळेला १३७६ मते वाढली. विरोधी पक्षनेत्यांच्या या मतदारसंघात भाजपने २०१४ साली १७२३ मतांची आघाडी घेतली होती. ती कमी होऊन काँग्रेस वरचढ राहील. सांगेत यावर्षी ३१८९ जादा मतदान झाले. इथे भाजपची आघाडी घटून पाच हजारांवर येईल. भाजपला अनुकूल विधानसभा मतदारसंघात यावेळेला १०५३७ जादा मतदान झाले आहे. मागच्यावेळेला २८५६४ची पिछाडी सासष्टी वगळून इतर तालुक्यात ६०६१६ ची आघाडी घेऊन भाजपने भरून काढली होती. यावेळेला आपचे गॉमीस चांगली टक्कर देतील व स्वाती केरकरपेक्षा दुप्पट मते घेतील. त्याचा सावईकरांनाच फायदा होणार. त्यामुळे दक्षिण गोवा मतदारसंघ भाजपकडे जाईल. पोटनिवडणुकात मांद्रेत सोपटे बाजी मारतील. शिरोड्यात सुभाष व म्हापशात जोशुआ यांचा विजय कमी फरकाने झालेला दिसेल. एकूण २३ मे रोजी काही चमत्कार होणार नाही.