निवडणूक आयोगाच्या कमतरता

निवडणुकीच्या बराच काळ आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध असतात. यंत्रे तपासूनच मतदानासाठी ठेवणे अपेक्षित असते. तरी मतदानावेळी यंत्रे बिघडतात कशी या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.

Story: अग्रलेख |
25th April 2019, 05:19 am

लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांच्या निवडणुकीचे मतदान मंगळवारी पार पडल्यानंतर मतदानाचे विश्लेषण सर्वत्र आपापल्या परीने करण्यात आले. २०१४ मधील आकडेवारीच्या तुलनेत यावेळचे मतदान काही टक्क्यांनी कमी झाले, त्यामुळे मतदानाचा टक्का उतरला. उतरलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसेल इथपासून काही विधानसभा मतदारसंघांत वाढलेल्या मतदानाचा लाभ कोणाला होईल याबाबतचे अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्याचबरोबर मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने योजलेल्या अनेक उपायांबाबतही चर्चा होत आहे. पैंगीण विधानसभा मतदारसंघातील मार्ले-तिरवळ गावातील तसेच पर्ये विधानसभा मतदारसंघातील अनसोळे गावच्या मतदारांनी रस्ता न केल्याचा निषेध म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठरविले होते. निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांनंतर अनसोळेच्या ग्रामस्थांनी मतदानात भाग घेतला, परंतु मार्ले-तिरवळचे मतदार बहिष्कारावर ठाम राहिले. मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या मतदारसंघांत विधानसभेची पोटनिवडणूक असल्यामुळे तेथील मतदान जास्त असेल असे वाटले होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तीनही ठिकाणी मतदान काही टक्क्यांनी कमीच झाले. कमालीच्या उन्हाळ्यामुळे काही मतदार मतदानासाठी आले नसतील. यावेळी राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची एवढी अदलाबदली झाली की काही ठिकाणी मतदार काही प्रमाणात गोंधळून मतदानाला आलेच नसण्याचीही शक्यता वाटली.
निवडणूक आयोगाने जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे सर्वदूर कौतुक झाले. परंतु मतदानासाठी वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांमध्ये अनेक ठिकाणी ऐन मतदानावेळी घोळ झाले, मतदान यंत्रे बंद पडली, उशिराने सुरू झाली, काही ठिकाणी यंत्रे बदलावी लागली. या घोटाळ्यांची जबाबदारी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. निवडणुकीच्या बराच काळ आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध असतात. सारी यंत्रे तपासून आणि चाचणी घेऊनच मतदानासाठी ठेवणे अपेक्षित असते. तरी मतदानावेळी यंत्रे बिघडतात कशी या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. मंगळवारी मतदानावेळी शिवोली, कुंकळ्ळी, केपे, नावेली, नुवे, कुडतरी, केपे अशा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड झाला आणि मतदारांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागला. दुसरे म्हणजे बिघडलेल्या यंत्रात नोंदविलेले मत योग्य उमेदवारालाच मिळाले की काय अशा शंका मतदारांच्या मनात निर्माण झाल्या. जिथे चुरशीच्या लढती असतील तिथे एकेक मताचे महत्व वाढत जाते. आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे निवडणुकीच्या कामासाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाचा. मतदान यंत्रे संबधित अधिकारिणीकडे परत करण्याची प्रक्रिया एवढी कंटाळवाणी आणि लांबलचक होती की रात्री उशिरापर्यंत ही यंत्रे परत करण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी चालू होती. ही प्रक्रिया अधिक सुटसुटित करून शेकडो कर्मचाऱ्यांना या त्रासातून सोडविता आले असते. मतदारांच्या सोयीसाठी अनेक उपाय योजणाऱ्या निवडणूक आयोगाच्या दिमतीला हवे तेवढे कर्मचारी होते. मग मतदानानंतरच्या प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी निवडणूक आयोगाने लक्ष घालणे गरजेचे होते.