‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण


25th April 2019, 06:08 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी :
टपाल खात्याने १५ लाख रुपयांवरील ठेवी तथा बचत खात्यातील पैसे काढण्यावर लागू केलेले निर्बंध हे खातेधारकांच्या सुरक्षेखातीरच आहेत. बँकिंग व्यवहारांसाठी ‘केव्हायसी’ची पूर्तता अनिवार्य आहे. या अटीच्या पूर्ततेसाठीच हे निर्बंध जारी केले आहेत. केव्हायसीची पूर्तता केल्यानंतर पैसे काढण्याची मोकळीक ग्राहकांना दिली जात आहे.
टपाल खात्यातील ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यास निर्बंध लागू केल्याचे वृत्त ‘गोवन वार्ता’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तीची माहिती टपाल खात्याच्या ट्वीटरद्वारे पाठविण्यात आली असता टपाल खात्याकडून यासंबंधीचे स्पष्टीकरण पाठविण्यात आले आहे. ग्राहक तथा खातेधारकांच्या सुरक्षेखातर ही प्रक्रिया आहे आणि त्यात ग्राहक किंवा खातेधारकांना सतावण्याचा अजिबात हेतू नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने देशातील सर्व टपाल कार्यालयांना बँकिंगचे अधिकार दिले आहेत. टपाल खात्याचा चेहरामोहराच बदलला आहे. विश्वासाहर्ता ही टपाल खात्याची जमेची बाजू असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक टपाल खात्याकडे व्यवहार करतात. टपाल खात्याच्या बचत अथवा कायम ठेव खात्यांमध्ये ज्या खातेधारकांची १५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आहे, त्यांना ती रक्कम काढता येत नसल्याने संबंधित खात्याधारकांनी नाराजी व्यक्त केली होती. कोणतीही आगाऊ सूचना किंवा माहिती न देता हे निर्बंध लागू केल्याने खातेधारक संतप्त बनले होते. खुद्द टपाल खात्याचे वरिष्ठ अधिकारीच या निर्बंधाबाबत अनभिज्ञ असल्याचे जाणवल्याने ग्राहकांत चिंतेचे वातावरण पसरले होते.
टपाल बचत खात्यातून ठराविक मर्यादेबाहेरील पैसे काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सुरक्षा उपाययोजनांखातर लागू झाले आहेत. मुख्यालयाकडून तसे निर्देश जारी करण्यात आल्याची माहिती टपाल कार्यालयाच्या वरिष्ठ अधीक्षक अर्चना गोविनाथ यांनी दिली होती. आता टपाल खात्याने त्याबाबत स्पष्टीकरण देऊन केव्हायसीच्या पूर्ततेसाठी हे निर्बंध असल्याचे म्हटले आहे.