राज्य सरकारचे भवितव्य पोटनिवडणुकीच्या निकालावर


24th April 2019, 07:26 pm

विशेष प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : मांद्रे, म्हापसा आणि शिरोडा पोटनिवडणुकीचे निकाल अनुकूल लागले तर राज्यातील भाजप आघाडी सरकार भक्कम बनेल. परंतु निकाल विरोधात गेले तर सरकारचे भवितव्य अनिश्चित बनू शकते. सध्या भाजप आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १४ आमदार आहेत. तीनही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना अटीतटीची लढत द्यावी लागली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीचा निकाल राज्य सरकारचे भवितव्य ठरवेल. त्यातही लोकसभा निवडणुकीतून केंद्रात सत्ताबदल झाला तर गोव्यातही बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते.      

शक्यता -१                   

म्हापशात काँग्रेसचा उमेदवार, मांद्रेत अपक्ष आणि शिरोड्यात मगोचे दीपक ढवळीकर जर विजयी झाले तर हा निकाल काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी थेट मदत करू शकतो. काँग्रेसकडे आता १४ आमदार आहेत. म्हापशाची एक जागा  काँग्रेसला मिळाली तर आमदारांचा आकडा १५ होईल. मगोच्या आमदारांची संख्या पुन्हा २ झाली तर तेही काँग्रेससोबत राहू शकतात. तशाच प्रकारची सध्या मगो आणि काँग्रेसची बोलणी झाली आहे. मांद्रेत अपक्ष निवडून आल्यास तोही काँग्रेससोबत येऊ शकतो. याचा काँग्रेसला याचा थेट लाभ होईल.       

असा निकाल लागल्यास  राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव काँग्रेससोबत आहेतच, सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे काँग्रेस सोबत येऊ शकतात. गावकर यांचा पाठिंबा घेऊनही भाजपने त्यांना दुर्लक्षित ठेवले आहे. त्यामुळे ते संधी मिळाल्यास काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. हे सारे गणित जुळून आल्यास ३९ आमदारांच्या विधानसभेत काँग्रेस आघाडी २० चा आकडा गाठू शकते. पुढे पणजीची जागा जिंकल्यास किंवा एका अपक्षाचा अथवा गोवा फॉरवर्डचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेस स्पष्ट बहुमताचा २१ आकडा गाठू शकते.                  

शक्यता -२                   

मांद्रेत दयानंद सोपटे, शिरोड्यात सुभाष शिरोडकर आणि म्हापशात जोशुआ डिसोझा यांपैकी भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले तर भाजपच्या आमदारांची (पान ४ वर)

संख्या १६ होईल. त्यानंतर भाजपला सरकार टिकवण्यासाठी फक्त ५ आमदारांची  आवश्यकता भासेल. सध्या ३ गोवा फॉरवर्ड आणि ३ अपक्ष आमदार असे सहाजण त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपकडे २२ जणांचा आकडा असेल, जे पूर्ण बहुमत असेल.  त्या परिस्थितीत भाजपला मगोची गरज भासणार नाही.                   

शक्यता - ३                   

केंद्रात भाजपचे सरकार बदलले तर गोव्यात भाजप आघाडीच्या सरकारला धोका आहे. केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले तर गोवा फॉरवर्ड भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत जाणे पसंत करू शकतो. अपक्षही तीच भूमिका घेऊ शकतात. गोविंद गावडे वगळता गोवा फॉरवर्डच्या आमदारांसह अपक्ष रोहन खंवटे आणि प्रसाद गावकर हे जाहीरपणे भाजपच्या प्रचारासाठी फारसे आलेले नाहीत. या सर्वांचे लक्ष पोटनिवडणुकीचा निकाल आणि केंद्रातील सत्ता यांकडे आहे. काँग्रेसने पोटनिवडणुकीत आपला आकडा वाढवला आणि केंद्रात सत्ता मिळाली तर, काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होईल. काही अपक्ष व गोवा फॉरवर्डचे आमदार हे या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

आता पणजीवर भर  

पणजीत पोटनिवडणूक १९ मे रोजी होणार आहे. मंगळवारी झालेल्या तीन पोटनिवडणुकांच्या मतदानाची काय स्थिती आहे, त्याचा अंदाज घेऊन राजकीय पक्ष विशेषत: भाजप आणि काँग्रेस पणजीत कामाला लागतील. पणजीची जागा ही दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असेल. त्यामुळे दोन्ही पक्ष सर्व ताकदीनिशी पणजीत उतरतील.

पणजीतून निवडणूक लढण्यासाठी माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने आपला उमेदवार अजून निश्चित केलेला नाही, पण उत्पल मनोहर पर्रीकर यांना भाजप आपला उमेदवार म्हणून पुढे आणू शकते. तसे झाल्यास मोन्सेरात विरुद्ध उत्पल अशी लढत होईल. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक अाहेत. उत्पल आणि सिद्धार्थ यांच्यातील कोण अधिक प्रभावी ठरेल, याचा अंदाज घेण्याचे काम पक्षात चालू आहे. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे १९९४ पासून पणजीचे आमदार राहिले आहेत. मध्यंतरी सुमारे अडीच वर्षे ते केेंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले, तेव्हा कुंकळ्ळ्येकर आमदार होते. 

विधानसभेतील सध्याचे 

पक्षीय बलाबल      

एकूण जागा ३६      

(४ जागा रिकाम्या)      

भाजप १४      

गोवा फॉरवर्ड ३      

अपक्ष ३      

काँग्रेस १४      

राष्ट्रवादी काँग्रेस १      

मगो

हेही वाचा