डॉ. गायतोंडे यांना अटक

गोमंतगाथा

Story: मनोहर जोशी |
20th April 2019, 09:23 am
डॉ. गायतोंडे यांना अटक


-
दलाचे आंबोलीचे शिबीर यशस्वी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. ‘नॅशनल काँग्रेस गोवा’ नेही स्वातंत्र्यलढ्याचा पुनर्विचार करण्यासाठी गोव्याजवळील वझरी या गावात अधिवेशन बोलाविले होते. पीटर आल्व्हरीस, अँथनी सौझ, विश्वनाथ लवंदे, माधव बीर यासारखी दिग्गज मंडळी अधिवेशनाला हजर होती. गोव्यात नॅ. काँ. गोवा च्या कामात मरगळ आली होती. ती दूर करून कार्याला गती कशी द्यावी हाच अधिवेशनाचा मुख्य विषय होता. आल्व्हरीस हे समाजवादी विचारसरणीचे असल्याने शांततेच्या मार्गाने चळवळ पुढे न्यावी असा त्यांचा आग्रह होता. परंतु, या मार्गाने पोर्तुगीज वठणीवर येणार नाहीत. त्यांना समजेल अशा भाषेत म्हणजे ‘बंदुकीला बंदुकीनेच’ उत्तर द्यावे लागेल, असा विश्वनाथ लवंदे यांचा ठाम विश्वास होता. पण, आल्व्हरीस त्याला अनुकूल नव्हते. दोघांचे ध्येय एकच होते ते प्राप्त करण्याचे मार्ग भिन्न होते.
नॅ. काँ. गोवाची कार्यपद्धती न पटल्याने दलाच्या प्रमुखांनी आपली स्वतंत्र कार्यपद्धती तयार केली. स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच जनतेला जागृत करणे आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी मानसिक दृष्ट्या त्यांना तयार करणे, पोर्तुगिजांबद्दलची भीती घालविणे हेही तितकेच आवश्यक होते. यासाठी विविध पत्रके, वृत्तपत्रे त्यांच्यापर्यंत पोहोचणे जरुरीचे होते. परंतु महाराष्ट्रातून येणाऱ्या राष्ट्रीय वृत्तीच्या वृत्तपत्रांना सरकारने बंदी घातली होती. त्यामुळे अशा प्रकारचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दलाने आपली यंत्रणा उभी केली. विविध पत्रके, बॅ. तेलु मास्कारेन्यश संपादित करत असलेले ‘Ressurji Goa’ चे अंक यासारखे साहित्य गावोगावच्या तरुणांची साखळी तयार करून तिच्याद्वारे पाठविण्याची व्यवस्था केली. यासाठी अनेकांनी धोका पत्करून हे काम केले. सगळ्यांचीच नावे देता येणे शक्य नाही पण त्यातील काहीजण असे. सर्वश्री काशिनाथ तेंडुलकर, महाबळेश्वर नाईक, डॉ. गणबा दुभाषी, दत्ताराम देसाई, तेवतोनियु बॉर्जीस, रमण भट जोशी, गोविंदशास्त्री भावे इत्यादी.
आझाद गोमंतक दलात सामील झाल्या नसल्या तरी अनेक छोट्या मोठ्या संघटना त्यांच्या क्षेत्रात काम करत होत्या. कोलवाळची संघटना ही त्यापैकी एक. बांदा येथून कार्य करणाऱ्या ‘क्वीट गोवा’ या संघटनेशी ती संलग्न होती. तेथील श्रीराम मंदिरात स्वातंत्र्यसैनिकांच्या बैठका होत. मूळचे सत्तरीतील आंबेली गावचे, मंदिराचे पुजारी विष्णुपंत वझे यांचे त्यांना पूर्ण सहकार्य तसेच पाठिंबा होता. जयद्रथ चोडणकर हा संघटनेतील अठरा वर्षांचा तरुण कोलवाळ- म्हापसा बसवर काम करत होता. वेगवेगळी पत्रके वा अन्य साहित्य म्हापश्यात योग्य स्थळी पोहोचविण्याचे काम तो चोखपणे बजावत असे. पोलिसांना हे साहित्य मिळू नये म्हणून बसच्या सीटखाली, चॉकलेटच्या डब्यात वा प्रसंगी अंडरवेअरमध्ये लपवून तो नेत असे. म्हापशातील रवींद्र गवंडळकर, डिसौजा, मारुती मंदिराचे पुजारी आपटे यांच्याकडे हे साहित्य जात असे.
२६ जानेवारीला दलाने आणखी एक क्रांतिकारक पाऊल टाकले. ‘आझाद गोवा नभोवाणी’ हे गुप्त नभोवाणी केंद्र आंबोली इथे सुरु केले. सुभाषचंद्र बोस यांच्या आय. एन. ए. मध्ये कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या डी. के. गोळे यांनी दाभोलकर हे नाव धारण करून मोठ्या मेहनतीने हे केंद्र सुरु केले होते. वर्षभर आंबोली इथून हे केंद्र चालविल्यानंतर पारगड किल्ला, सातार्डा, कृष्णापूर, बेळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते हलविण्यात आले. माधव बीर यांनी वर्षभर ते ब्रॉडकास्ट करण्याचे काम केले. नंतर गोवा मुक्त होईपर्यंत सतत सहा वर्षे ते काम गजानन देसाई यांनी केले. जनजागृती करण्याचे व देशभक्ती रुजविण्याचे महत्त्वाचे काम या केंद्राने केले.
१७ फेब्रुवारी १९५४ रोजी एक महत्त्वाची घटना घडली. डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना पोलिसांनी अटक केली. ते निष्णात सर्जन होते. पोर्तुगालमध्ये उच्च शिक्षण घेऊन गोव्यात परतल्यावर त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली. त्याचबरोबर देशभक्तीने प्रेरित होऊन नॅ. काँग्रेस गोवाचे कार्य सुरु केले. डॉक्टर, वकील या सारख्या उच्चविद्याविभूषित लोकांमध्ये जागृती करून त्यांची संघटना बांधली. डॉक्टरांचा वावर उच्च स्तरावरील लोकांमध्ये होता. शिवाय त्यांची पत्नी पोर्तुगीज होती. त्यामुळे पोलिसांचे लक्ष त्यांच्याकडे गेले नाही. परंतु एका कार्यक्रमामध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली आणि पोलिस सावध झाले. ताबडतोब सरकारने त्यांना अटक केली आणि पत्नीसह पोर्तुगालला रवाना केले.
डॉ. गायतोंडे यांच्यावर कोणताही आरोप न ठेवता किंवा तो सिद्ध न होता तडकाफडकी त्यांना पोर्तुगालला पाठविले याचे तीव्र पडसाद जनसामान्यात तसेच उर्वरित भारतात उमटले. भारत सरकारने याबद्दल कडक खलिता पाठविला. परंतु, नेहमीप्रमाणेच तो फेटाळून लावताना ‘गोव्यात शांतता नांदत आहे. आम्ही कायद्यानुसार वागतो आणि परकी राष्ट्रांनी त्यात हस्तक्षेप करू नये,’ असे मग्रुरीचे उत्तर पाठवले. त्यांची दडपशाही चालूच होती. श्री. देशपांडे यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन पोर्तुगालला रवाना केले. परंतु त्यांना तुरुंगात न ठेवता चक्क वेड्यांच्या इस्पितळात ठेवले. त्यांचे आरोग्य बिघडले असता त्यांच्यावर योग्य ते उपचार न करता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते आरोग्याच्या तक्रारी करत आहेत असा सरकारने दावा केला. त्या इस्पितळात असताना त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले.
श्री. देशपांडे आणि डॉ. गायतोंडे यांच्यावर झालेल्या अन्यायावर भारतीय वृत्तपत्रांनी सडकून टीका केली. ‘फ्रान्स प्रेस’ ने त्याला जगभर प्रसिद्धी दिली. इतके होऊनही पोर्तुगीज सरकार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. एवढेच नव्हे तर ‘भारत सरकारने काही कारवाई केलीच आणि पोर्तुगीजांना गोवा सोडावा लागला तर त्यांना फक्त उध्वस्त झालेला गोवा पाहावा लागेल,’ अशी धमकी दिली.
पोर्तुगीज सरकारने कितीही धमक्या दिल्या तरी शूर स्वातंत्र्यसैनिकांनी त्याला भीक न घालता आपले कार्य जोमाने चालूच ठेवले. (क्रमश:)
(संदर्भ : स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, खंड- १, भाग- ३, पृष्ठ- ५१७ ते ५३१)
(लेखक साहित्यिक आहेत.)