मैफिलीचा बादशहा

वाचु आनंदे

Story: महेश दिवेकर |
20th April 2019, 09:22 am
मैफिलीचा बादशहा


-
कवी, नाटककार, वक्ते, अभिनेते, व्यंगचित्रकार....विष्णू वाघ हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे काही साहित्य अप्रकाशित होते. गेल्या मार्चमध्ये त्यांचे ‘हे सुरांनो जितेंद्र व्हा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनपट उलगडला आहे.
अभिषेकीबुवा धीरगंभीर आवाजाचे, अत्यंत गुणी गायक, संगीतकार. भक्तिगीते, नाट्यसंगीतात त्यांनी चांगले यश मिळविले. ते स्वरसंपन्न आयुष्य जगले. राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, रामदास कामत, फैय्याज, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, रघुनाथ फडके, रमेश सुखठणकर असे अनेक गायक शिष्य त्यांनी घडवले.
लेखक विष्णू वाघ यांचा संगीताचा, नाटकांचा अभ्यास असल्याने त्यांनी त्यावर सविस्तर लिहिले आहे. अभिषेकी आणि मी, इतिहास अभिषेकी घराण्याचा, हे मंगेशाचे देणे, बायजींची छत्रछाया, अवलिया उस्ताद अजमत खाँसाहेब, रंगुनी शिष्यांत साऱ्या, हे बंध संगीताचे, का धरिला परदेस, मत्स्यगंधेचा दिग्विजय, लागे कलेजवा कट्यार वगैरे अनेक प्रकरणे या पुस्तकात आहेत. त्यावरून वाचकांना पुस्तकाचा अंदाज आलाच असेल.
अभिषेकींबुवांनी मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, मीरा मधुरा, कट्यार काळजात घुसली, तू तर चाफेकळी, कधीतरी कोठेतरी, हे बंध रेशमाचे, धाडिला राम तिने का वनी, संत गोरा कुंभार, महानंदा, अमृतमोहिनी अशी एकाहून एक अजरामर नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. त्याशिवाय भावगीते, भक्तिगीतेही गायली. विशेष म्हणजे ती मधुर गीते रसिकांनी उचलून धरली. उदा. देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय हे, साद देती हिमशिखरे, नको विसरू संकेत मिलनाचा, गर्द सभोवती रान साजणी, अर्थशून्य भासे मज हा, यती मन मम मानित त्या, हे सुरांनो चंद्र व्हा, सूरत पिया की, या भवनातील गीत पुराणे, सर्वात्मका सर्वेश्वरा, कैवल्याच्या चांदण्याला.... किती सांगावीत?
मित्रांसमवेत शिकारीला जाऊन नंतर सशाचे मटण खाल्ल्याने अभिषेकींचा वडिलांशी वाद झाला. त्या रागात ते पुण्याला गेले. वार लावून जेवले, मॅट्रिकची परीक्षा पास झाले, गायन शिकले. मध्ये त्यांचा आवाज गेला. तेव्हा ते गोव्यात परतले. पण, घरी न जाता बांदोड्याला गिरीजाबाई केळेकर यांच्याकडे राहिले. रियाजाद्वारे आवाज परत येताच मुंबईला गेले. अनेक नोकऱ्या केल्या. ख्रिश्चन मुलांना पोर्तुगीज भाषा शिकवली. मुंबई आकाशवाणीच्या कोकणी विभागात त्यांना नोकरी मिळाली. तेथे मंगेश पाडगावकर, बा. भ. बोरकर व इतर अनेकांशी ओळख झाली. येथे त्यांनी संगीत, गायन तर केलेच, पण बातम्या वाचणे, संपादन, डबिंग वगैरे केले. मंद मंद वाजत आयलीं पायजणां, गोंयचें नाव व्हड... ही त्यांची तेथील गाजलेली गाणी.
संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मिळताच, त्यांनी ही नोकरी सोडली. ते मैफिली करत असतानाच गोपाळकृष्ण भोबे यांच्या शिफारशीवरून त्यांना गोवा हिंदू असोसिएशनचे ‘मत्स्यगंधा’ नाटक मिळाले आणि पुढचा इतिहास ज्ञात आहे. त्यांच्या या कारकिर्दीचा आलेख विष्णू वाघ यांनी छान चित्रित केला आहे. मुखपृष्ठ संजय हरमलकर यांचे आहे. कुटुंबवत्सल पिता, गुरू, गायक, संगीतकार अभिषेकींचे सर्वांगी दर्शन पुस्तकात घडते.
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे सहसंपादक (पुरवणी) आहेत.)
---
हे सुरांनो जितेंद्र व्हा
लेखक : विष्णू सुर्या वाघ
प्रकाशक : सृष्टी प्रकाशन, डोंगरी (मो. ९५४५२ ६१९०९)
पाने : १२३, किंमत : ३०० रुपये.