वाळईत भाजप प्रचार सुसाट, काँग्रेसचा घरोघरी भेटीवर भर


15th April 2019, 02:15 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वाळपई : वाळपई मतदारसंघात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा प्रचार सुसाट पद्धतीने सुरू आहे तर काँग्रेसने सध्यातरी वेगवेगळ्या ठिकाणी कोपरा बैठका व घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेसदरम्यान चांगल्या प्रकारे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

विश्वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस व विश्वजीत अशी विरोध निर्माण करणारी फळी उभी राहिली आहे. काँग्रेसतर्फे सध्या कोपरा बैठकांवर भर दिला जात असला तरी पक्षाची यंत्रणा घरोघरी प्रचारावर भर देत आहे.

वाळपईतून भाजपचे नरहरी हळदणकर दोनवेळा निवडून आले होते व त्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. विश्‍वजित यांनी वाळपईतून निवडून येऊन वाळपईत चांगल्याप्रकारे काँग्रेसची यंत्रणा उभी केली. २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत याच मतदारसंघात विश्‍वजित यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येत आमदार बनले होते, मात्र नंतर लगेचच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्यावतीने पुन्हा निवडणूक लढवून त्यांनी भाजपचे आमदार म्हणून विद्यमान सरकारात सामील होत सध्या ते आरोग्य, बालविकास व महिला कल्याण या खात्यांच्या मंत्रिपदाचा ताबा सांभाळत आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सत्तरीतील दोन्ही मतदारसंघांतून भाजपसाठी किमान २५ हजार मतांची आघाडी घेऊन देण्याच्या निर्धार केला असल्यामुळे विश्वजीत सध्या मतदारसंघामध्ये प्रचारावर भर देत आहेत. वाळपई मतदारसंघात वाळपई पालिका व इतर चार पंचायतींचा समावेश आहे. वाळपई पालिका क्षेत्र हे मतदानाच्या दृष्टिकोनातून मोठे असल्यामुळे या पालिका क्षेत्रातून भाजपला चांगल्याप्रकारे मतांची अपेक्षा आहे.

अल्पसंख्यांकांच्या मतांकडे भाजपचे लक्ष

वाळपई मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या अल्पसंख्यांक मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक मतदारांनी प्रामुख्याने काँग्रेसच्या बाजूने राहण्यास अधिक पसंती दिली होती, मात्र विश्‍वजित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही अल्पसंख्याकांची मते काही प्रमाणात भाजपकडे वळविण्यास त्यांना यश आले आहे. यंदा ही अल्पसंख्यांकांची मते कशा प्रकारचे वळवतात यावर भाजपच्या उमेदवारांची मतांची आघाडी निश्चित होणार आहे.

काँग्रेसने या अल्पसंख्यांक मतावर आपला दावा केला असून निदान ८० टक्के मते काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पडतील, अशी अपेक्षा काँग्रेसच्या यंत्रणेला आहे. या निवडणुकीत अल्पसंख्यांकांची मते कुणाच्या बाजूने राहतात यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. सध्या विश्‍वजित यांनी नगरगाव, सावर्डे, गुळेली आदी पंचायतींचा दौरा पूर्ण केलेला आहे तर वाळपई पालिका क्षेत्रातील काही प्रभागांमध्ये त्यांनी आतापर्यंत कोपरा बैठका घेण्यावर अधिक भर दिलेला आहे.

काँग्रेसचे घटना समिती अध्यक्ष दशरथ मांजरेकर, महिला समितीच्या अध्यक्ष रोशन देसाई, अल्पसंख्यांक अध्यक्ष हर्षद शेख, युवा अध्यक्ष अर्जुन गुरव, सेवादल अध्यक्ष कृष्णा नेने त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केलेले रणजित राणे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.

काँग्रेसला चांगला प्रतिसाद : मांजरेकर

गिरीश चोडणकर यांना सत्तरीत मताधिक्य मिळावे, यासाठी काँग्रेसतर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना दशरथ मांजरेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत वाळपईच्या बऱ्याच भागांत काँग्रेसची यंत्रणा मतदारांशी थेट संपर्क साधण्यात चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे. काँग्रेसच्या प्रचाराला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत असून भाजपच्या सत्तेला कंटाळलेल्या मतदारांनी यंदा काँग्रेसच्या बाजूने राहणार असल्याचे अभिवचन दिल्याचे यावेळी त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा