मगोच्या भूमिकेचा भाजपवर परिणाम नाही


15th April 2019, 02:11 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : मगो पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधातही उमेदवार उभा करून दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. हा सर्व प्रकार त्यांच्याच अंगलट आला असून काँग्रेसला दिलेला पाठिंब्याचा भाजपवर कसलाही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी डिचोलीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
मगोने दुटप्पी व जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे. डिचोलीच नव्हे तर इतरही ठिकाणी मगोच्या काँग्रेस पाठिंब्याचा भाजपवर परिणाम जाणवणार नाही, अशी खात्री पाटणेकर यांनी व्यक्त केली. डिचोली मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी मिळणार आहे तसेच उत्तर गोव्यातून जी कामे झाली आहेत त्याचा भाजपाला मोठा लाभ होत आहे, असे पाटणेकर म्हणाले.
यावेळी प्रेमानंद म्हांबरे यांनी सांगितले, देशाला कणखर व देश मजबूत करणारा नेता हवा आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात जनतेला हवा आहे. त्यामुळे कोण पक्ष कुणाला पाठिंबा देतो, ही बाब चिल्लर असून भाजपला मोठी आघाडी मिळणार आहे, असे सांगितले.
डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघांत भाजपला मोठी आघाडी मिळणार असून प्रचाराचा पाहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टापा सुरू असून १७ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची डिचोलीत सभा होणार आहे तसेच १८ व १९ रोजी श्रीपाद नाईक मये व डिचोलीचा दौऱ्यात घरोघरी भेट देणार आहेत, असे यावेळी प्रेमानंद म्हांबरे, प्रवीण झांटये, राजेश पाटणेकर यांनी सांगितले. यावेळी प्रवीण झांटये, राजेश पाटणेकर, अरुण नाईक, वल्लभ साळकर, विश्वास गावकर, विठ्ठल वेर्णेकर दयानंद कारबोटकर आदींनी प्रचाराबाबत सविस्तर माहिती दिली. मयेतील कार्यकर्ता बूथ मेळावा १९ एप्रिल रोजी संध्या. ४ वाजता झांटये महाविद्यालय जिमखाना सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात सतीश धोंड कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.